आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरथरत्या हातांना आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी-व्यवसाय, संसार, पैसा कमावण्याची साठवण्याची धावपळ यामधून थकलेल्या आईवडलांची सेवा करणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जवळचे नातेवाईक अशी संकल्पनाही राहिलेली नाही. मग अशा अगतिक क्षणी कोणीतरी आपलं म्हणून आधार देणारं, थकलेल्या आईवडलांची आपुलकीने सेवा करणारं कोणीतरी असावं असं वाटल्यास चुकीचं नव्हे. याचाच विचार करून डॉ. नंदा शिवगुंडे यांनी ‘आधार केअर सेंटर’ सुरू केले. अर्धांगवात वा फ्रॅक्चरमुळे पलंगाला खिळलेल्या वा डेमेन्शिया, स्किझोफ्रेनिया, अल्झायमर यांसारख्या मानसिक व्याधींनी खचलेल्या रुग्णांसाठी निवासी रुग्णसेवा ‘आधार’मध्ये केली जाते.
देवाने घेतली परीक्षा - सुरुवातीच्या काळात या रुग्णांची सेवा करण्यासाठी कर्मचारीसुद्धा मिळायचे नाही. तेव्हा डॉ. शिवगुंडे यांनी रुग्णांचे कपडे धुण्यापासून स्वयंपाकापर्यंत सर्व कामे केली आहेत. ‘देव जणू माझी परीक्षाच घेत होता. मीसुद्धा देवाला आव्हान दिले, कोण हरते तेच पाहू. सतत काही ना काही अडचणी येत होत्या.
डॉक्टर या नात्याने रुग्णांवर उपचार करायचे, आईच्या भावनेने त्यांना जेवायला घालायचे, आंघोळही घालायची. नातलग बनून त्यांची इतर देखभालही करायची. सगळं मला करावं लागे. इतर दवाखान्यांत वा रुग्णालयांत रुग्णांची काळजी घ्यायला, जबाबदारी घ्यायला त्यांचे नातेवाईक असतात. येथे तसे नसते. या सर्व भूमिका मलाच कराव्या लागतात,’ असेही डॉ. नंदा यांनी सांगितले.
‘आधार’मध्ये भरती रुग्णाला पौष्टिक आहार, आपुलकी, स्वच्छता, औषधोपचार यामुळे जगण्यासाठी उभारी येते. सकाळ-संध्याकाळ चहा-नाश्ता, दुपारी व रात्री जेवण हे सर्व जण एकत्र घेतात. प्रत्येक वृद्ध म्हणजे जणू एक लहान मूल समजून त्यांच्याशी वागावे लागते. प्रत्येकाची तर्‍हा वेगळीच असते. लहान मुलांप्रमाणे त्यांच्यात होणारी भांडणेही सोडवावी लागतात. अल्झायमर (स्मृतिभ्रंश) झालेल्या वृद्धांना आपण जेवल्याचे आठवत नाही की आंघोळ केल्याचे. त्यांच्या समजुतीसाठी त्यांना परत जेवायला वाढावे लागते, आंघोळ घालावी लागते. आपल्या घरातील वृद्ध जर असे वागत असतील तर आपण चिडतो. पण अशा 20 ते 25 वृद्धांना त्यांच्या कलाने घेत सांभाळण्याचे कौशल्य डॉ. नंदा यांच्याकडे आहे. डॉ. नंदा यांना कुटुंबातला प्रत्येक सदस्य या वृद्धांना सांभाळण्यासाठी मदत करत असतो. तसेच या रुग्णांना इतर वैद्यकीय चिकित्सा करण्यासाठी बाहेरच्या दवाखान्यात वा रुग्णालयात न्यावे लागते. शहरातील अनेक डॉक्टरांचे त्यांना यासाठी सहकार्य मिळते. येथे भरती झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती चांगली असतेच असे नाही. काही जण महिना 2 ते 3 हजार रुपये भरतात तर काही जण अजिबात पैसे भरू शकत नाहीत. अशा वृद्धांनाही येथे सर्वांप्रमाणेच वागणूक मिळते. आतापर्यंत संस्थेचा 400 हून अधिक वृद्धांनी लाभ घेतला आहे.
आपुलकीची वागणूक - येथे उपचार घेत असलेल्या 25 रुग्णांपैकी काही रुग्ण एवढे वृद्ध आणि विकलांग आहेत की त्यांना अंथरुणावर कूस बदलायलाही दुसर्‍यांची मदत घ्यावी लागते. सर्व क्रियाकर्म अंथरुणातच पार पाडावे लागतात. शंभरीच्या जवळपास पोचलेल्या वृद्धांचे उरलेले जीवन समाधानात पार पाडावे, या वृद्धांना आपुलकीची वागणूक मिळावी यासाठी येथील सेवकवर्गही आत्मीयतेने काम करत असतो.
समवयस्क लोकांची सोबत - नातेवाइकांच्या गोतावळय़ात वाढलेले हे वृद्ध उतारवयात जोडीदार निघून गेल्यावर असहाय होतात. आपल्याच लोकांना आपण नकोसे झालो, वाटतो ही भावना त्यांच्या दुखण्याचे कारण बनते. मुले नोकरीसाठी बाहेरगावी गेली असता वृद्धांचे मन एकाकीपणामुळे उदास, बेचैन होते. एकाकी खडतर जीवनाचा प्रवास नकोसा वाटायला लागतो. अशा वृद्धांना समवयस्क लोकांची सोबत मिळाल्यावर स्वत:चे दु:ख क्षुल्लक वाटते. इतरांचा त्रास जास्त असल्याची जाणीव झाल्यावर आपले दुखणे हे वृद्ध विसरतात.
संस्थेत भरती झालेल्या एका आजींचा जिभेवर ताबा नव्हता. त्यांना वेगवेगळे पदार्थ खावे वाटायचे. मात्र त्यांना ते सोसायचे नाहीत. मुलगा, सून नोकरीसाठी गेले की त्या पदार्थ बनवून खात. त्यांना लावलेला डायपरसुद्धा काढून टाकत. पूर्ण स्वयंपाकघर खराब करून टाकत. वैतागून मुलाने त्यांना येथे आणले. दोन ते तीन दिवसांत त्यांचे रूटीन येथे बसले.
त्या व्यवस्थित खाऊ लागल्या. दैनंदिन कामे त्यांच्या त्या करू लागल्या. औषधोपचार व आपुलकीने त्यांना समजावल्यावर त्यांच्यात बदल झाला. डॉ. शिवगुंडे यांनी सखी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस सुरू करून दहावी पास/ नापास विद्यार्थिनींना दोन वर्षांचे नर्सिंगचे प्रशिक्षण देऊन अनेकांना स्वावलंबी बनवले.
madhavi.kulkarni0@gmail.com