आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यवती दामिनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यपणे घरकाम करणाऱ्या मोलकरणीला नगण्य समजले जाते. मात्र अशा महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून तिला न्याय मिळवून देण्यासाठी जिवाचं रान करणारी ‘दामिनी’. सत्याची बाजू घेऊन, प्रसंगी सर्व नाती पणाला लावणारी ‘दामिनी’. १९९२-९३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट म्हणजे मीनाक्षी शेषाद्री या गुणी अभिनेत्रीच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड.

एक सुखी कुटुंब. त्या कुटुंबातील आपलेपणाचे नातेसंबंध आणि एका घटनेनंतर विस्कटलेली त्या कुटुंबाची घडी, याभोवती ‘दामिनी’ चित्रपटाची कथा फिरत राहते. नव्वदच्या दशकात आलेल्या राजकुमार संतोषी यांच्या या सिनेमानं त्या काळी खळबळ माजवली होती. कारण होतं, या चित्रपटातली मीनाक्षी शेषाद्री यांची बंडखोर भूमिका. एखादी स्त्री जेव्हा ठामपणे सत्याचा पाठपुरावा करते आणि आपल्यासारख्याच एका स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसून उभी राहते त्या वेळी कुटुंब आणि समाजात होणारी उलथापालथ या चित्रपटात दाखवण्यात आली होती.

आपल्याकडे घरकाम करणाऱ्या मोलकरीवर अन्याय झालाय. याला कारणीभूत आपला दीर आहे, हे समजल्यानंतर दामिनी त्या गरीब महिलेला न्याय मिळवून देण्याचा चंग बांधते. शेवटी जिंकतेही. मात्र या सगळ्या प्रवासात तिचं कुटुंब तिच्या विरोधात जातं. अगदी नवराही. दामिनीनं सत्य कथन करू नये यासाठी वेडी ठरवण्याचेही प्रयत्न होतात. मात्र दामिनी कोणत्याही प्रतिकाराला, दबावाला बळी पडत नाही. मीनाक्षी शेषाद्रीने चित्रपट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका यात साकारली आहे. याआधी आणि नंंतरही एवढ्या ताकदीचा चित्रपट तिच्या खात्यावर नाही. स्त्रीकेंद्रित अशी ही तिची पहिलीच भूमिका. या चित्रपटाने लोकांना सत्याचा पाठपुरावा करायला शिकवले. एखादी स्त्री जेव्हा सत्याचा पाठपुरावा करते तेव्हा तिला कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते हे या चित्रपटात दाखवण्यात आले. वेड्यांच्या रुग्णालयात तिला दाखल केल्यानंतर ती तेथून निसटते. बाहेर आल्यावर ती देवीचं दर्शन घेते, त्याक्षणी तिला तिच्यातल्या ताकदीची जाणीव होते. सरकारी वकील गोविंद दामिनीला मदत करतात. सनी देओल याने या भूमिकेला खूप छान न्याय दिला आहे. सिनेमातली सर्वात अवघड भूूमिका म्हणजेच दामिनीच्या नवऱ्याची भूमिका ऋषी कपूरने केली.

एकीकडे आपले संपूर्ण कुटुंब आणि दुसरीकडे सत्याचा पाठपुरावा करणारी पत्नी या कात्रीत सापडलेल्या ऋषी कपूरची घुसमट पडद्यावर त्यांनी चांगली उभी केलीय. मीनाक्षी शेषाद्री आपले नातेबंध तोडून पीडित मोलकरणीला न्याय मिळवून देते. स्त्री म्हणून कुटुंबाला, संसाराला प्राधान्य न देता ती त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व बंधने झुगारून देते. खोटेपणाविरोधात उभी राहते. न्यायालयात जेव्हा ती सातत्याने तिच्या साक्षीवर ठाम राहते, पीडितेवरच्या अत्याचाराला वाचा फोडते, तेव्हा निकाल देणारे न्यायाधीशही, इतिहासामध्ये हा खटला दामिनीच्या नावाने ओळखला जाईल, म्हणत दामिनीबद्दल गौरवोद्गार काढतात.

दामिनी झळकला तेव्हा दाक्षिणात्य चित्रपटांची काॅपी करून हिंदी चित्रपट आणण्याची लाट आली होती. त्याचा ठरावीक प्रेक्षकवर्ग होता. तरीही दामिनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटातल्या मीनाक्षीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. खोटेपणा सहन न करता अन्यायाला वाचा फोडणारी दामिनी. प्रत्येक घरात असावी अशीच.

माधवी कुलकर्णी, सोलापूर
madhavi.kulkarni0@gmail.com
बातम्या आणखी आहेत...