आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वा. रा. कांतांची कविता चळवळीतून फुलली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे वर्ष वा. रा. कांत (जन्म 1913-1991 मृत्यू) यांच्या जन्मशताब्दीचे आहे. हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या दिनानिमित्त आपला जल्लोष-आनंद साजरा करताना कवी वा.रा. कांतांनी ‘उघड ऊर्मिले कवाड’ ही आपली कविता लिहिली असून तिचा त्यांनी ‘वेलांटी’ या आपल्या कवितासंग्रहात समावेश केला आहे. आज रोजी कांतांची जन्मशताब्दी आणि या कवितेचे नव्याने स्मरण होते.

मराठवाड्यात पहिले राजकीय आंदोलन 1938-39 मध्ये झाले. निजामाच्या सत्तेला आव्हान देणारे नि:शस्त्र वीर पाहून त्या वेळच्या जनतेने उत्स्फूर्तपणे केलेला त्याचा जयजयकार व त्यातून त्यांना आलेला निर्भयतेचा साक्षात्कार कांतांच्या या कवितेतून व्यक्त झाला आहे. हा साक्षात्कार कांत पुढील ओळीत व्यक्त करतात.
धन्य आज दिन भीती सुटली
प्रभा नवी रविबिंब चढली
त्याग कांतिज्योतीत प्रगटली
जळता शलभ अपार - (वेलांटी)
अशा ओजस्वी आत्माहुतीतून प्रगट होणारा निर्धार या अचूक ओळीतून व्यक्त झालेला आहे. मराठवाडा निझामी तावडीतून मुक्त झाला 17 सप्टेंबर 1948 रोजी. त्या दिवशी पोलिस कारवाईच्या दिवशी ‘उघड ऊर्मिले कवाड’ या कवितेचा जन्म झाला. या कवितेत कवीने साफल्याच्या व कृतार्थतेच्या भावनेचे रंग दाखवले आहेत. ही कविता आणि पोलिस कारवाई (हैदराबाद) यांचा संबंध दाखवू शकत असली तरी तिला कविता म्हणून स्वतंत्र प्रतिभाविलास आहे. या कवितेतील काही कल्पना व ऊर्मिलेला घातलेला साद मोठा सूचक आहे. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा लढा लढणारे वीर विजय संपादन करून म्हणत आहेत. ‘उघड ऊर्मिले कवाड’- त्यांच्या या त्यागाचे व बलिदानाचे आज चीज झाले आहे. तो हाच दिवस जो 17 सप्टेंबर 1948 या नावाने ओळखला जातो. या ऊर्मिलेला जिचे नष्टचर्य संपलेले आहे तिला साद देत कवी म्हणतो-
लखलखते, धगधगते
कनकचक्र नभि फिरते
रविबिंब न अनिसद्धा गतिच युग युगाची
उघड ऊर्मिले कवाड उजळतसे प्राची
या ओळीत कालचक्राच्या गतिमानतेची, मराठवाड्याच्या इतिहासात एक नवी पहाट व्यक्त झालेली आहे. कवीने या कवितेचा शेवट करताना म्हटले आहे-
रात्रीचे तम पिऊन
ये पहाट ही हरखून
विष पचवूनि जय हसिले फुलति शंकराची
उघड ऊर्मिले कवाड उजळतिसे प्राची
यात नवी पहाट (हैदराबाद मुक्तिसंग्राम संपलेला दिवस) उगवलेली दिसेल. ही समग्र कविता आपल्या या प्रतिभा वैभवाने तिच्या आशयाशी एकरूप झाली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर ही कविता वाचली तर तिचा आशय अधिक सखोल व सूचक दिसेल. किंबहुना यामुळेच तिचे सौदर्य वाढलेले दिसेल.
कांतांचा ‘रुद्रविना’ ज्या दिवशी प्रसिद्ध झाला त्या दिवशी औरंगाबाद येथे पोलिस कारवाई झाली होती. ‘रुद्रविना’ 1947 मध्ये प्रसिद्ध झाला होता. या कवीने आपल्या भोवतालच्या जीवनातून, जे जीवन त्या काळाच्या समस्येशी व्यापलेले आहे. हे अनुभव घेतले आहे. आपली स्वप्ने साकार करण्याची धडपड या कवितेतून दिसून येते. ही कविता आपल्या प्रतिभेने काळ निरपेक्षही होते व आपल्या ओजस्वी काळाचे दर्शनही घडवते. कुसुमाग्रजांच्या कवितेचा काळ आणि कांतांच्या कवितेचा काळ समांतर असल्याने हे दोघे कवी एकाच भावानुभावाचे धनी आहेत.

त्या दोघांत तुलना होऊच शकत नाही. या कवितेचा विचार जनमानसाचा हुंकार म्हणून करता येईल. त्यातील भावना एकरंगी असली व स्थूल असली तरी तिचा संदर्भ लक्षणीय झाला आहे. कांतांनी या कवितेतून आपल्या समर्पणाची व बलिदानाची भावना उत्कटतेने आळवलेली दिसेल. स्वातंत्र्याकरिता, नवयुग निर्माणकरिता निरपेक्षवृत्तीने प्राण वेचण्याची कवीची तयारी आहे.

कांतांनी आपले विचारानुभव मांडताना अनेक मिथकं वापरून आपली कविता काळाशी सुसंगत ठेवून तिचे सार्वत्रीकरण केलेले आहे. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे ती खवळून उठते.

आपल्या कवितेतील प्रयोगशीलता काळाशी सुसंगत करीत त्याने तिचे अभिजातपण जपले. मराठी कवितेच्या वाटचालीत आपली स्वतंत्र वाट ठसठशीत केली. आज वर्ष जन्मशताब्दी निमित्ताने तरी त्यांच्या कवितेचा नव्याने विचार व्हायला हवा. हे सांस्कृतिक परिवर्तन नव्य प्रेरणेचे बळ देत राहील, यात शंका नाही.