आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांबचा पल्ला गाठायचाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला महाराष्ट्र अग्रेसर
— सरोज शेवडे, नाशिक.
आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रांत पुढे आहे. अगदी ऐतिहासिक काळात, महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यामुळे ज्या वेळी महाराष्ट्रावर अनेक परकीय जुलमी सत्ता राज्य करत होत्या, त्या वेळी त्यातून योग्य मार्गदर्शन करणाऱ्या संतांमुळे आपला प्रदेश सन्मार्गाने जाण्यात अग्रेसर ठरला. शिवाजी राजे, शहाजीराजे अनेक मराठी सरदार व त्यानंतर पेशवे यांनी राजकीय क्षेत्रात आपल्याला संरक्षण व उत्तम राज्यकर्ते की जे ‘सकल जनासी आधारू’ ठरले व आपण त्यात अग्रेसर ठरलो. १ मे या दिवशी महाराष्ट्र नावाचे राज्य तयार झाले. शेती, उद्योगधंदे व शैक्षणिक क्षेत्रात आपण अग्रेसर ठरलो; पण तरीही काही वेळेस येणाऱ्या अनियमित पाऊस व गारपीट यांच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतात. हे मात्र हृदय द्रावक आहे. पण त्यावर आता मात करण्यासरख्या योजना बनवून त्यातून शेतकरी मित्राला दिलासा देण्यात आपण यशस्वी होवो हीच इच्छा. म्हणजे मग खऱ्या अर्थाने आपण उद्योगधंदे शैक्षणिक, कृषी, तंत्रज्ञान इ. सर्व क्षेत्रांत आपण अग्रेसर ठरू.


बराच पल्ला गाठायचा आहे
— भारती गुळवे, नाशिक.

आपला महाराष्ट्र खरोखर सर्व क्षेत्रांत अग्रेसर आहे का? की अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे? शेतीत अग्रेसर असलेलं राज्य सध्या दुष्काळ, अवकाळीनं गलितगात्र झालं आहे. मूलभूत शेती विकासाच्या मुद्द्याबाबत शासन उदासीन आहे. केरळप्रमाणे संपूर्ण राज्य अजून साक्षर नाही. महिला बालकल्याणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी नाही. बालकामगारांचा प्रश्न गंभीर आहे. शासनाची आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे. गोरगरीब आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत, कुपोषणाचे उच्चाटन नाही. जलसंपदा विभागाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र पाण्यासाठी तहानलेला आहे. जादूटोणाविरुद्ध अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी नाही. राजस्थानच्या धर्तीवर किल्ल्यांना मानांकन मिळवून देण्यासाठी वर्ल्ड हेरिटेजमध्ये किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान सरकारवर आहे. अजून महाराष्ट्राला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

गर्जा महाराष्ट्र माझा?
— संजीवनी कुलकर्णी, नाशिक.

गेल्या ५५ वर्षांत महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत मोठी कामगिरी केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय आहे; पण प्रगतीने संतुष्ट होणे म्हणजे प्रगती थांबवणे होय. त्यामुळे आपल्यातीलच उणिवा आणि कमतरता शोधणेही गरजेचे आहे. सरकारचे कृषीविषयक धोरण स्पष्ट नाही. सरकारची कृषी धोरणे फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतात. अन्नदात्याला वगळून झालेल्या प्रगतीला काहीही अर्थ नसतो. शौचालय बांधणीसाठी प्रसारमाध्यमांद्वारे सरकारला आवाहन करावे लागते. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनांची रोज नव्याने भर पडत आहे. पण ग्रामीण भागात रुग्णांना डॉक्टर मिळत नाही. शाळांची संख्या भरमसाट वाढली आहे; परंतु सरकारी आणि खासगी शाळेमधलं शिक्षण मुलांच्या मनात विषमता निर्माण करीत आहे. भारतीय प्रशासन सेवेत मराठी टक्का अजून दोन आकडीही झालेला नाही. खेड्यातील मुलींना लग्न करून शहरात यावेसे वाटते व शहरातील मुलींना परदेशात जावेसे वाटते. ‘मधुरिमाने’ ग्रामीण जीवन समृद्ध करणाऱ्या महिलाही दाखवल्या आहेत. पण याचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. राजकारणी लोकांनी भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद अशा निरर्थक मुद्द्यांवरून लोकांची माथी भडकवू नयेत.

जबाबदारी आपलीही
— मानसी जोशी, औरंगाबाद

महाराष्ट्र कोणत्या क्षेत्रात अग्रेसर आणि कोणत्या क्षेत्रात मागे हा विषयच खूप अंतर्मुख करणारा आहे. आधी नकारात्मक बाबींचा विचार करुया.पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक स्वच्छता. आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ ठेवावे असे वाटले पाहिजे. तसेच पर्यटनामधे बरेच मागे आहोत. महाराष्ट्रातल्या किल्ले, मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंचं जतन झालं पाहिजे. या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज व सुरक्षा या गोष्टींचे नीट व्यवस्थापन असेल तर पर्यटक येतील. स्थानिक लोकांना या कामात सामावून घेतल्यास त्यांनाही रोजगारही मिळेल. आता सकारात्मक गोष्टींचा विचार करूया. महाराष्ट्र संपूर्ण देशात औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्र शेती उद्योग, सुती कापड, साखर, वाहन निर्मिती, रासायनिक उद्योग यात अग्रस्थानी आहे. माहिती तंत्रज्ञानात पुण्याने बंगळुरू व हैदराबादला मागे टाकले आहे. शिक्षण क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे. अनेक गोष्टीत महाराष्ट्र अग्रेसर असला तरी अनेक क्षेत्रंात अजूनही लांबचा पल्ला गाठायचाय. त्यासाठी सगळी जबाबदारी सरकारची आहे, अशी मानसिकता न ठेवता आपण सर्वांनी सरकारबरोबर सहभागी होऊन कृतिशील झाले पाहिजे.

कसला आलाय विकास
— गौरव श्रीखंडे

कसल्या विकासाच्या गप्पा मारतो आपण? अंगात ब्रँडेड कंपनीचे कपडे, हातात अँड्रॉइड मोबाइल, कोरी करकरीत विदेशी बाइक, हे सगळं असलं म्हणजे झाला विकास? ग्लोबल वॉिर्मंग, प्रदूषण, आजपर्यंत किती जमीन आलीय ओलिताखाली महाराष्ट्राची... इतक्या सर्व समस्या असताना कोण म्हणतंय महाराष्ट्राचा विकास झालाय म्हणून? राज्यातली युवा पिढी फॅशनेबल दिसली म्हणजे महाराष्ट्राचा विकास झालाय अशी तर समजूत नाही ना लोकांची

आणि तरुण पिढीचीसुद्धा...
कुठे नेऊन ठेवलाय...
— अॅड. दर्शन इंगळे, नाशिक

भारतमातेच्या ‘महाराष्ट्र’ या लाडक्या पुत्राची निर्मिती असंख्य बलिदाने आणि चळवळी यांतून झाली. देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या गाथा ऐकल्या की मराठी जनाचे अतुल्य योगदान आणि जाज्ज्वल्य देशप्रेमाने डोळ्यात अश्रू येतात. एके काळी ‘सुजलाम्, सुफलाम्, संपन्न’ माझा महाराष्ट्र स्वत:चे अस्तित्व शोधण्यासाठी धडपडतोय असे वाटतेय. परप्रांतीयांचे लोंढे, अवास्तव शहरीकरण, बेरोजगारी, भ्रष्टाचार, ढासळलेली सुरक्षा आणि कायदा व्यवस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग व्यापारांचे स्थलांतर असे एक ना अनेक प्रश्न सध्या ‘आ’ वासून उभे आहेत. दिवसाढवळ्या होणारे बलात्कार, खून, चोरी, अशा गंभीर गुन्ह्यांनी महाराष्ट्र ग्रस्त आहे. वर्षानुवर्षे खून खटल्यांचे मारेकरी सापडत नाहीत. राजकारणाचे अध:पतन झाले आहे. सरकारच्या धोरणामुळे अनेक उद्योग राज्याबाहेर गेले. करण्यासारखे खूप काही आहे. पण इच्छाशक्तीचा अभाव अाहे. परंतु, विद्यमान सरकारचे गोहत्याबंदी, टोल नाके बंद करण्याचा निर्णय, मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘राखीव’ खेळाचा निर्णय स्तुत्य आहे. उद्योगांसाठी पूरक वातावरणनिर्मिती, पर्यावरण समतोल, शेतकरी आत्महत्या रोखणे, अशी अनेक आव्हानात्मक कामे करण्याची कसरत शासनाला करायची आहे. परंतु, ही जबाबदारी केवळ शासनाची नसून, राज्याच्या प्रत्येक नागरिकाने यासाठी पुढे यायला हवे.

महाराष्ट्र दिन चिरायु होवो
— देवयानी अरबट, अकोला

१ मे १९६० रोजी निर्मिती झालेल्या महाराष्ट्र राज्याने अनेक क्षेत्रांत भरारी घेतली आहे. शेती क्षेत्रात, उद्योगधंद्यांत भरारी घेतली तरी दिवसेंदिवस लोकसंख्येच्या विस्फोटामुळे व बाहेर राज्यांतून येणाऱ्या लोंढ्यांमुळे कोणत्याही क्षेत्रातील प्रगती दिसत नाही. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांवर ताण पडतो. दिवसेंदिवस होणाऱ्या नागरीकरणामुळे उपलब्ध सुविधा तुटपुंज्या पडतात, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील दूरगामी वाढ लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. एखादे शहर स्मार्ट सिटी करण्यापेक्षा प्रत्येक खेडे स्मार्ट व्हिलेज करण्यावर भर द्यावा लागेल त्यामुळे शहरांवर येणारा ताण कमी होईल. भविष्यातील कोळशाची टंचाई, तसेच अणुप्रकल्पास होणारा विरोध लक्षात घेता वीजटंचाईवर मात करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर भर द्यावा लागेल. ओस पडत असणाऱ्या शासकीय शाळा, खासगी इंग्रजी शाळांचा ग्रामीण भागाला बसणारा विळखा व त्यामुळे महाग होणारे शिक्षण इत्यादी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणार आहे.

थोडे समाधान - बरीच खंत
— लीला कुलकर्णी, नाशिक

मी निवृत्त ज्येष्ठ नागरिक आहे. निवृत्तीनंतर माणूस गत आयुष्यातील यश-अपयशाचा, समाधानाचा-खेदाचा जसा लेखाजोखा मांडत असतो तसाच विचार ५५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या बाबतीत मी करीन. छातीठोकपणे सांगावे असे प्रगतीचे शिखर कुठल्याही क्षेत्रात महाराष्ट्राने अजून गाठलेे नाही. साक्षरता १00% नाही. तांत्रिक प्रगतीने अनेक समस्या सुटल्या आहेत. पण मूलभूत गरजांसाठी अजूनही झगडतच आहोत. एकीकडे शहरात नवीन वसाहतीत कॉमन व अटॅच्ड शौचालये नसलेले घर सापडणार नाही, तर ग्रामीण भागात प्रत्येक घरात शौचालय असलेले गाव सापडत नाही. टीव्ही चॅनल्स व मोबाइल फोन्स गावोगावी पोचलेले आहेत. त्यामुळे लोकांना जीवनस्तर कसा असायला पाहिजे एवढे समजले आहे व ‘खेड्यात राहणे म्हणजे अधोगती व शहरात राहणे म्हणजे प्रगती’ असा स्वाभाविक निष्कर्ष त्यांनी काढला आहे. माय मराठीचा हात सुटत चालला आहे आणि इंग्रजी मावशीचे बोटही नीट धरता आलेले नाही. आपल्या राज्याबद्दल इतक्या नकारात्मक भावना कदाचित कुणाला आवडणार नाहीत. परंतु मंगल देशा, पवित्र देशा, ही महाराष्ट्राला लावलेली विशेषणे सार्थ ठरवणे आपलीच जबाबदारी आहे.

> मधुरिमा कट्टा
तुमच्यासाठी आपल्या मनात सतत विचार सुरूच असतात कोणते ना कोणते, मेंदू अगदी ओव्हरटाइम काम करत असतो. पण अनेकदा होतं का, आपण ते विचार स्पष्टपणे मांडत नाही, मांडायचा प्रयत्न करत नाही. कारण, असं स्पष्ट मुद्देसूद बोलण्याची/लिहिण्याची गरज नसते आणि संधीही उपलब्ध नसते. म्हणूनच, मधुरिमा तुमच्यासाठी घेऊन येतेय अशी एक हक्काची जागा, तुमचं मत मांडायला. हा आहे मधुरिमा कट्टा, जिथे कोणत्या विषयावर लिहायचं तो मधुरिमा सुचवेल आणि तुम्ही फक्त तुम्हाला काय वाटतं ते लिहून पाठवायचं. शब्दमर्यादा आहे १५०. madhurimadm@gmail.com या ईमेल आयडीवर ईमेल करा अथवा मधुरिमा, दैनिक दिव्य मराठी, १५२९५, मोतीवाला काॅम्प्लेक्स, जालना रोड, औरंगाबाद - ३ या पत्त्यावर टपाल/कुरिअर पाठवा, अथवा ०२४०-२४५३५०३ या क्रमांकावर फॅक्स करा. त्यावर मधुरिमा कट्टा असं लिहायला मात्र विसरू नका. तुमचं पत्र वा ईमेल आम्हाला आजपासून एका आठवड्याच्या आत पोचलं पाहिजे, तरच त्याला प्रसिद्धी देता येणं शक्य होईल. आजच्या विषयावरील तुमची मतं १५ दिवसांनंतरच्या मधुरिमामध्ये प्रसिद्ध होतील.

आजचा विषय—
मधुरिमा आणि दिव्य मराठी पाचव्या वर्षात पदार्पण करतायत. त्या निमित्ताने आजचा विषय आहे, तुम्हाला मधुरिमाने काय दिलं?
चला तर, पेन उचला किंवा संगणक सुरू करा. पटापट लिहा, फार वेळ नाही लागणार १५० शब्द लिहायला. हो ना?
बातम्या आणखी आहेत...