आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा कट्टा: हॅट्स ऑफ टू 'आई'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतंत्र अस्तित्व जपणारी
— निकिता क्षीरसागर

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आईची गरज असतेच, पण मूल झाल्यावर नोकरी करावी की नाही हा प्रश्न सर्वस्वी तिचा असला पाहिजे. घरच्यांच्या सपोर्ट सिस्टिमवर तिने तो सोडवला पाहिजे. मुलाचं संगोपन महत्त्वाचं असलं तरी आजच्या स्त्रीसाठी स्वाभिमान, आत्मविकास आणि स्वत:चा विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. आणि याचा चांगला परिणाम मुलांवरही होतोच. आजच्या स्त्रीला जर विविध प्रकारे आधार मिळाला तर मुलांच्या संगोपनासाठी संपूर्ण वेळ घरी राहायची गरजच काय? आणि या गोष्टीमुळे मुलंही स्वाभिमानी व स्वावलंबी होतात. माझं मत आहे की, सर्व स्त्रियांनी आपलं स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायची गरज आहे. मी आज घर आणि माझं प्रोफेशन खूप छान बॅलन्स करू शकते ते माझ्या सर्पोट सिस्टिममुळेच. त्यामुळे मी माझ्या सासू-सासऱ्यांचे व माझ्या प्रेमळ पतीचे आभार मानते.

जिद्दीला सलाम
— अर्चना काळे, नाशिक

मी तर सर्वसामान्य गृहिणी! पण माझ्या अनेक मैत्रिणी नोकरी करतात. त्यांची होणारी धावपळ, ताणतणाव मला जाणवतात. कंपनीत नोकरी करणाऱ्यांना सकाळची ड्यूटी गाठताना स्वयंपाकपाणी, मुलांचे डबे, त्यांच्या शाळेच्या वेळा सांभाळाव्या लागतात. कामानंतर थकून आल्यानंतरही लगेच घरकाम चुकत नाही. बाजारहाट, स्वयंपाक, मुलांचे अभ्यास, त्यांची दप्तरे भरणे, त्यांचे प्रश्न सोडवणे वगैरे करताना पुन्हा उद्याची तयारी! त्यामुळे ही कसरत शारीरिक आजारपण, मानसिक ताण वाढवते. परंतु तरीही त्या अत्यंत जिद्दीने साऱ्या गोष्टी करतात व कौटुंबिक सुखासाठी त्याग करतात. फक्त त्याची जाणीव घरच्या व्यक्तींना असते का? मैत्रिणींशी गप्पा मारताना या गोष्टी कळतात तेव्हा त्यांची ही कसरत समजते. या जिद्दीला सलाम करावासा वाटतो.

तारेवरची कसरत करावी लागते
— स्नेहा शिंपी, नाशिक

आधुनिक जीवनशैली व राहणीमान उंचावल्याने शिक्षित महिला वर्ग आपल्या क्षेत्रात कार्यरत राहणे जास्त पसंत करताे. कुटुंबाला सांभाळून ती ऑफिस आणि घर दोन्ही समन्वय साधते. खरं तर तिची तारेवरची कसरत असते. कुटुंबाला प्राधान्य देण्याचा पूर्ण प्रयत्न करत ती आपले ध्येय गाठते. घराप्रती जबाबदारी व कर्तव्ये पार पाडताना रोज एक नवे आव्हान स्वीकारते. घरात सगळ्यांच्या आवडी-निवडी जपतेे, हवे नको ते बघते. सर्वांच्या मनाचा विचार करूनच ती अनेक कसोटींना व समस्यांना सामोरी जाते. वर्किंग वुमनची ऑफिस आणि घर अशा दुहेरी भूमिका निभावताना खूप तारांबळ उडते.

कधीच न थकणारी आई
— प्रिया निकुम, नाशिक

वर्किंग मॉम्स म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर नोकरी करून घरातलं कामसुद्धा आवरणारी, आणि परत उत्साही राहणारी व्यक्ती येते. पण आपल्या घरातसुद्धा सतत २४ तास न थकता, न सुटी घेता जी अखंड काम करत असते ती माझी आई! ती गृहिणी आहे. सकाळी सहापासून तिचा दिवस चालू होतो. आधी ती मॉर्निंग वॉकला जाते. मग आल्यावर देवपूजा. मग आमच्या टिफीन आणि नाश्त्याची तयारी करते. डब्यात रोज नवीन देता यावं म्हणून तिची धडपड चालू असते. एवढं करून दुपारी आराम न करता तिचं कलाकुसरीचं काही ना काही चालू असतं. घरात येणारे जाणारे त्यात तर वेगळेच असतात. दुसऱ्या दिवसाची तयारी करूनच ती झोपते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. न दमता, न कुरकुर करता, ना पगार, ना बोनस, ना कधी रजा. सतत झिजत असते. अशा या सगळ्या आणि माझ्यासुद्धा आईचे मनापासून आभार आणि सॅल्युट.

तारेवरची कसरत करणारी आई
— वैष्णवी गायकवाड

हो आमच्या घरी पण आहे वर्किंग वुमन, ती म्हणजे माझी माई. ती प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. घरातील सर्व कामे आटोपून ती १० वाजता शाळेत जाते. शाळेतही ती मुलांची आवडती टीचर आहे. घर आणि शाळा या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना ती जणू तारेवरची कसरत करत असते. संध्याकाळी घरी आली की माझ्या हातचा चहा पिऊन तिचा दिवसभराचा थकवा निघून जातो आणि पुन्हा उत्साहाने ती कामाला सुरुवात करते. घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायला तिला आवडते. स्वच्छ घरात व स्वच्छ हृदयात परमेश्वर राहतो असे ती म्हणते. सुटीच्या दिवशी मीसुद्धा माईला मदत करते. कोणतीही अडचण ती चुटकीसरशी सोडवते. रविवारी माझा अभ्यास घेते. अशी माझी माई आहे सुपरवुमन. मला तिचा अभिमान वाटतो.

माझी आई सुपरमॉम
— सुनेत्रा म्हस्के/पुणे

आई नोकरी करणारी असेल तर तिची मुलगी करिअरमध्ये यशस्वी होते, हे माझ्या उदाहरणावरून स्पष्ट होते. माझ्या आईने गरज म्हणून ३६ वर्षं नोकरी केली. एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेतली. तिची समाजकल्याण खात्यात कर्तव्यनिष्ठ व कणखर अधिकारी अशी प्रतिमा आहे. घरातील ताणाचा परिणाम आॅफिसात होऊ दिला नाही, की आॅफिसचा ताण घरात आणला नाही. तसंच वाचन, लिखाण व समाजसेवा याही गोष्टी ती करतच होती. व्रतवैकल्यं, वाढदिवस, समारंभ पारंपरिकरीत्या साजरे करून पैसे वाया घालवण्यापेक्षा गरीब, गरजू व्यक्तींना ती मदत करते. तिच्या नोकरीमुळे मी स्वावलंबी झाले. माझ्या आईचा अादर्श ठेवून मीही आता लग्नानंतर नोकरी व घर नीट सांभाळते आहे. या माझ्या सुपरमाॅमबद्दल लिहिण्याची संधी मधुरिमामुळे मिळाली, म्हणून थँक्यू!

परिपूर्ण असण्याची इच्छा
— पूजा उगाले, चाळीसगाव

माझी मोठी आई अंगणवाडी पर्यवेक्षक आहे. नोकरी आणि घर अशी तिची धावपळ पाहवत नाही. कारण तिची नोकरी कठीण आहे. वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाणे, अंगणवाड्या तपासणे यासोबत कार्यालयीन व लेखी कामंही असतातच. या नोकरीच्या निमित्ताने जे विषय हाताळले जातात, ते विषय तिला महत्त्वाचे वाटतात. अंगणवाडी सेविकांनी त्यांचं काम त्यांनी नीट करावं ही इच्छा असते. त्यात दिवसभर अनेक फोन येतात, त्या व्यक्तींशी बोलावं लागतं. ती इतकी छान समजावून सांगते फोनवरसुद्धा, की आम्ही पाहातच राहतो. तिच्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाड्यांच्या कामाचा एकत्रित अहवाल ती कधी करते कोणास ठाऊक. कार्यालयात काही चुका झाल्या, गडबड झाली की तिलाच उत्तरं द्यावी लागतात. रविवारी कामावर बोलावले तरी ती आनंदाने जाते. घरचीही कामं परिपूर्ण व्हावी यासाठी ती झटत असते. माझ्या आईचा मला अभिमान आहे.

प्रेमाची भाषा पांघरणारी
— स्वाती नंदी, सोलापूर

आपली मुलं इंच आकाशात पोहोचली पाहिजेत ही प्रत्येक आईची इच्छा असते. आमच्याही आईची तशीच इच्छा आहे. त्यामुळेच ती आमच्यासाठी खूप कष्ट करते. कामावर जाणाऱ्या माझ्या आईचा दिवस सकाळी चार वाजता सुरू होतो. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचे डबे करणं, घरची कामं आवरून ती तीन किलोमीटर चालत कामाला जाते. माहेर गरीब असल्यामुळे शिक्षण झालं नाही तिचं, पण एखाद्या सुशिक्षिताला लाजवेल अशी परिस्थितीची जाण तिच्याकडे आहे. मधुरिमाच्या निमित्तानं मला आईबद्दल लिहण्यास मिळाले त्यामुळे खूप खूप धन्यवाद आिण आईला सलाम...

( या विषयावर वर्षा बडग, कांता हरकूट, सोनाली मंुगड, सुहासिनी पांडे यांच्याही प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.)

मधुरिमा कट्टा
आजचा विषय—
सोमवारी चातुर्मास सुरू होतोय. या चार महिन्यांत काय करायचं, याचे जुने नियम काळानुसार बदलून तुम्ही काही वेगळे चांगले उपक्रम राबवता की परंपरांच्या जोखडात राहून उपास आणि व्रतवैकल्यं करत राहता, ते आम्हाला सांगा. शब्दमर्यादा : १५०. आठ दिवसांच्या आत झटपट प्रतिक्रिया पाठवा.

आमचा पत्ता—
मधुरिमा, दैनिक दिव्य मराठी, १५२९५, मोतीवाला काॅम्प्लेक्स, जालना रोड, औरंगाबाद - ४३१००३. ईमेल: madhurimadm@gmail.com, फॅक्स क्रमांक - ०२४०-२४५३५०३