आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटचाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ता ओलांडणं हे महाकठीण कर्म...असाच रस्ता ओलांडतानाची ही
एक आठवण.
शहरातील मध्यवर्ती भागातील मेन रोडच्या एका बाजूला उभी होते. सकाळची गर्दीची वेळ होती. मला रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जायचं होतं. रस्त्यावर रहदारीचा अखंड प्रवाह वाहत होता. फुटपाथवरून खाली रहदारीच्या प्रवाहात पाय घालण्याची हिंमत होत नव्हती. किती वेळा तर असं झालं की, पाय पुढे टाकला की एखादी गाडी सुळकन जवळून जात होती. आपल्याकडे वाहनांच्या चाकांच्या संख्येनुसार आणि वाहनाच्या आकारानुसार माणसांची मग्रुरी, मस्ती वाढत जाते असं मला वाटतं. सायकलवाल्यापेक्षा स्कूटरवाला स्वतःला जास्त ‘शहाणा’ समजतो. तसंच स्कूटरपेक्षा बाइकवाला. मग त्यापेक्षा कारवाला तर काय विचारायलाच नको. यातसुद्धा कारच्या किमती आणि मॉडेलनुसार हे ‘शहाणपण’ वाढत जातं. ट्रक, बस यांची मस्ती तर खासच असते.

थोड्या वेळान माझ्या लक्षात आलं, माझ्या उजव्या बाजूला दोन लहान शाळकरी मुली कावऱ्याबावऱ्या नजरेनं रहदारीच्या त्या प्रवाहाकडे बघत होत्या. त्यांनाही तो प्रवाह पार करून पलीकडे जायचं होतं. मग मला माझ्या डाव्या हाताला काही हालचाल जाणवली.

म्हणून पाह्यलं तर एक वृद्ध स्त्री माझ्याकडे आधाराच्या अपेक्षेनं पाहत उभी होती. त्या आज्जींनाही रस्ता ओलांडायचा होता.

मी ओढणी नीट घेतली. तिची मागं गाठ मारली. खांद्यावरची पर्स काखेत घट्ट धरली. आणि डाव्या हातात वार्धक्य आणि उजव्या हातात बालपण धरलं. वाहनांची गर्दी थोडी कमी झाली तशी हिमतीनं रस्त्यावर उतरले. त्या वाहनांच्या गर्दीतून वाट काढत कशीबशी दुसऱ्या बाजूला पोहोचले. दोघी छोट्या मुली ‘थँक्यू’ म्हणून हसत हसत उड्या मारत निघून गेल्या. आजींनी गालावरून हात फिरवून कानशिलावरून बोटं मोडून तोंडाचं बोळकं पसरून आशीर्वाद दिला आणि त्या डुलत डुलत निघून गेल्या. मी तिकडे पाहत राह्यले. एकदा मागं वळून पाह्यलं. लहान मुली उड्या मारत लांब निघून गेल्या होत्या. जसं माझं बालपण लांब गेलं होतं. आणि आता मला आज्जी गेल्या त्याच बाजूला जायचं होतं. म्हणजेच माझी वार्धक्याकडे वाटचाल चालू झाली होती? मी एकदा पार करून आलेल्या रस्त्याकडे पाह्यलं. त्यावरची रहदारी अविरत चालूच होती.