आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानशूरतेची अंत:प्रेरणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्पोरेट क्षेत्रातली माणसं म्हणजे पैशामागे धावणारी, स्वार्थी वृत्तीची असतात असाच त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र हा समज खोटा ठरवत कॉर्पोरेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली रोहिणी निलेकणी यांनी. 160 कोटी रुपयांचे शेअर्स विकून तो पैसा लोककल्याणकारी कामांसाठी दान करून त्यांनी या क्षेत्रात स्वत:ची एक वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहिणी यांना दानशूरपणाचा वारसा घरातूनच मिळाला. शिवाय दान करण्याची वृत्ती ही आपल्याला लाभलेली अंत:प्रेरणा आहे असंही रोहिणी यांना वाटतं. इन्फोसिसचे सहसंस्थापक असलेले पती नंदन निलेकणी यांच्या कार्यात सहभाग देतानाच रोहिणी यांनी पर्यावरण, शिक्षण आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यांनी अक्षरा आणि प्रथम बुक्स या संस्था स्थापन करून मागास भागातल्या मुलांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांचा कर्नाटकातल्या जवळपास तीन लाख बालकांना फायदा झाला आहे. पूर्वायुष्यात पत्रकार म्हणूनही काम केलेल्या रोहिणी यांनी ‘अनकॉमन ग्राउंड - डायलॉग्ज विथ बिझनेस अँड सोशल लीडर्स’ आणि ‘स्टिलबॉर्न’ ही पुस्तकं लिहिली आहेत. फोर्ब्जनं 2010मधील आशियातील दानशूरतेमधील आदर्श या यादीत रोहिणी निलेकणी यांचा समावेश केला आहे.