आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोस्ट डेंजरस रोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या प्रकारच्या अवघड रस्त्यांना ‘मॅन अ माइल रोड’ म्हणतात. मैलागणिक एका माणसाचा घास घेणारे रस्ते. तिथून जाताना जगातल्या ‘मोस्ट डेंजरस रोड’वरून प्रवास करत आहोत, याची खात्री पटली...
काल्पामधल्या माझ्या वास्तव्याचा तिसरा दिवस होता. आज आम्हाला नाकोला जायचं होतं. नाको हे किन्नौर जिल्ह्यातलं शेवटचं गाव. जवळजवळ बारा हजार फुटांवर वसलेलं. इथून पुढे लाहौल-स्पिती हा जिल्हा सुरू होतो. साधारण आठ हजार फुटांवर हवेत प्राणवायूची कमतरता जाणवायला लागते. श्वास घेणं हळूहळू अवघड बनत जातं. काही लोकांना हाय अल्टीट्यूड सिकनेसचाही त्रास होऊ शकतो, त्यामुळे मुलांना घेऊन नाकोला जावं की नाही, हा माझ्यापुढे प्रश्न होता. मी या आधी दोन वर्षांपूर्वी नाकोला जाऊन आले होते. अतिशय छोटं, जेमतेम पाचशे लोकवस्तीचं गाव. डॉक्टरबिक्टरसाठी तर पार रिकांगपिओच गाठायचं. त्यामुळे मुलांना घेऊन नाकोला जायचं तेही माझ्या एकटीच्या जबाबदारीवर, नाही म्हटलं तरी पोटात थोडीशी धाकधूक होत होती. ट्रिप तशी एका दिवसाचीच होती, पण काही अघटित घडलं तर वाटेत कसलीही मदत मिळायची शक्यता फार कमी होती. शेवटी मुलांनाच जवळ बसवून त्यांना अल्टीट्यूड सिकनेसची स्पष्ट कल्पना दिली. डोकं दुखणं, चक्कर येणं, उलटी आल्यासारखं वाटणं ही सगळी अल्टीट्यूड सिकनेसची लक्षणंही त्यांना सांगितली. नाकोला गेल्यानंतर तिथल्या विरळ हवेची सवय होईपर्यंत हळू हालचाल करायची, धावायचं नाही, उड्या मारायच्या नाहीत, मोठ्यांदा ओरडायचं नाही, खूप प्राणवायू खर्च होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही, हे त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांचा निर्णय विचारला. अनन्याला थोडासा श्वासाचा त्रास एरवीही जाणवायचा, त्यामुळे तिने काल्पाला पृथ्वीकडे राहायचा समंजस निर्णय घेतला. आदित आणि अर्जुन मात्र ठामपणे म्हणाले की, त्यांना नाको बघायचंय.
पहाटेच काल्पाहून निघालो. रिकांगपिओ मागे टाकलं आणि रस्त्याचा एकदम नूरच बदलला. दोन्ही बाजूंना छाती दडपून टाकणारे उंचच उंच डोंगर, निष्पर्ण, उघडेबोडके. कुणीतरी वेडीवाकडी एखादी रेघ मातीतून ओढावी तसा डोंगराची छाती फोडून केलेला एक लेनचा रस्ता. त्या धुळीने माखलेल्या, खड्ड्यांनी भरलेल्या, खडबडीत रस्त्यावरून आमची इनोव्हा रणगाड्यासारखी धडधडत चालली होती. चालक म्हणून पवनचं सर्व कौशल्य पणाला लागलं होतं. रस्ता इतका अवघड होता की, बीआरओने एका वळणावर लावलेल्या ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ या पाटीची सत्यता पुरेपूर कळून येत होती. त्यात दुसरी कुठली गाडीही रस्त्यावर दूरदूरपर्यंत दिसत नव्हती. वरती निरभ्र निळेभोर आकाश, उजव्या बाजूला काळाकभिन्न कातळ आणि डाव्या बाजूला खोल खोल खाली सतलजचा मातकट रौद्र प्रवाह! आता आम्ही वृक्षरेषेच्या वरून चाललो होतो, त्यामुळे औषधालाही कुठे झाडांचा हिरवा रंग दिसत नव्हता. त्या मातकट तपकिरी-राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर आभाळाचा गर्द निळा रंग तेवढा उठून दिसत होता.
मुलं कुतूहलाने खिडकीला अगदी चिकटून बसून डोळे विस्फारून सभोवतालचं ते विराट दृश्य पाहात होती. मी न राहवून सारखी त्यांना प्रश्न विचारत होते, ‘डोकं दुखतंय का? गरगरत तर नाहीये ? मळमळतंय का?’ शेवटी वैतागून पवन म्हणाला, ‘आप ऐसे पूछते रहोगे तो कुछ नहीं हुआ तो भी आदी-अर्जुन को लगेगा की उन का सर दुख रहा है मॅम.’ मुलंही म्हणाली, ‘आम्ही सांगू तुला मम्मा असं काही वाटलं तर, तू काळजी नको करूस. एंजॉय द ट्रिप!’ यावर मी काय बोलणार?
एके ठिकाणी रस्ता वळणे घेत घेत पार सतलजच्या प्रवाहाजवळ उतरला. आता आम्हाला लष्कराने बांधलेल्या एका लोखंडी पुलावरून नदी ओलांडून दुसऱ्या काठाने जायचं होतं. तिबेटन बौद्ध धर्मात स्पिरिट्स म्हणजे निसर्गदेवता, आसरा आणि पितरे यांना खूप मोठं स्थान आहे. ते लोक असं मानतात की, मोठमोठी झाडं, पर्वतशिखरं, गावाच्या वेशी आणि नदीवर बांधलेले पूल या ठिकाणी या निसर्गदेवतांचं वास्तव्य असतं. त्यांना शांत करण्यासाठी म्हणून अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तिबेटी प्रार्थनाध्वज लावलेले असतात. हे ध्वज दोन प्रकारचे असतात. जे उभे, ध्वजांसारखे असतात त्यांना म्हणतात दार-छो, म्हणजे ध्वज या शब्दाचाच अपभ्रंश, आणि जे आडवे पताकांसारखे लावलेले असतात त्यांना म्हणतात लुंगटा किंवा वायूअश्व. पंचतत्त्वांचं प्रतीक म्हणून हे ध्वज नेहमी पंचरंगात असतात. अग्नीसाठी लाल, आकाशासाठी निळा, पृथ्वीसाठी पिवळा, जलासाठी हिरवा आणि वायूसाठी श्वेत हे ते पाच रंग. इथल्या लोकांची अशी धारणा आहे की, वाऱ्यावर जेव्हा हे ध्वज फडफडतात तेव्हा त्यांच्या फडफडण्यातून जगातल्या समस्त जिवांच्या प्रार्थना बोधिसत्त्वापर्यंत पोहोचतात!
प्रार्थनाध्वजांनी अलंकृत केलेला तो सतलजवरचा पूल ओलांडताना बाजूला स्मारक दिसलं. मी पवनला गाडी थांबवायला सांगितली. खाली उतरून बघितलं तर त्या स्मारकावर संगमरवरी शिळेत काही नावं कोरलेली दिसली. हा पूल बांधताना खूप मोठा अपघात झाला होता. अर्धवट बांधलेला पूल कोसळून त्या पुलावर बांधकामाचं काम करणारे कर्नलसकट काही लष्करी अधिकारी, मजूर मिळून पंधरा जण सतलजच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांच्या बलिदानावर हा पूल उभा होता. इंग्रजीमध्ये अशा अवघड रस्त्यांना ‘मॅन अ माइल रोड’ असं म्हणतात, मैलागणिक एका माणसाचा घास घेणारे रस्ते. दोन क्षण निःशब्द उभे राहून आम्ही सगळ्या शूर सैनिकांच्या स्मृतीला अभिवादन केलं. स्मारकाशेजारी लावलेला एक फलक आम्हाला आठवण करून देत होता की, आम्ही त्या क्षणी जगातल्या ‘मोस्ट डेंजरस रोड’वरून प्रवास करत होतो!
shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...