आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृसत्तेच्या भिंतीला भगदाड पाडणारा PINK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीचे चारित्र्य ठरवताना जे निकष लावले जातात, ते मुलांना लावावेत, असा पुसटसा विचारदेखील आजवर ज्यांनी केलेला नसेल अशा माणसांसाठी हे महत्त्वाचे आहे...
जगभरात स्त्रियांवरचे अत्याचार वाढत चालल्याच्या बातम्या किंवा आकडेवारी जेव्हा वाचतो तेव्हा बलात्कार, अॅसिडहल्ले, एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेले खून– अशा सगळ्या हिंसक घटना आपल्यापासून दूर कुठेतरी अनोळखी माणसांच्या बाबतीत घडतात, अशी आपली खात्री असते! आपल्या मुलींच्या बाबतीत यातलं काहीही घडू नये, अशी काळजी मात्र सगळ्यांनाच वाटते. म्हणून साधारणपणे सगळ्याच कुटुंबात बायकामुलींसाठी बरेच नियम असतात. कसे कपडे घालायचे, कुणासोबत, कुठे आणि किती वाजेपर्यंत घराबाहेर राहायचे, यावर मर्यादा असतात. तरीही, आज अनेक कारणांनी अनेक जणी या सगळ्या मर्यादा ओलांडूनही जगताना दिसतात. कधी स्वातंत्र्याच्या ओढीमुळे, स्वेच्छेने, धाडसापोटी तर कधीकधी कामाच्या स्वरूपामुळे मोठ्या शहरांमध्ये तरी अनेक मिळवत्या मुली सातच्या आत घरात पोहोचत नाहीत. त्या पुरुष सहकाऱ्यांसोबत मोकळेपणाने मिसळतात, कधीमधी एखादे ड्रिंक घेतात, मित्रमैत्रिणींसोबत पार्टीला जातात. कुटुंबाच्या चौकटीऐवजी मैत्रिणींसोबत राहणाऱ्या मुली मुंबई-पुण्यासारख्या शहरात तरी अनोखी घटना उरलेली नाही.
म्हणूनच जेव्हा ‘पिंक’ चित्रपटात अशाच स्वतंत्रपणे जगणाऱ्या तीन मुलींच्या संघर्षाची कथा दिसते, तेव्हा ती अनेकींना जवळची वाटते! भारताची ‘रेप कॅपिटल’ म्हणून बदनाम असलेल्या दिल्लीतल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये एकमेकींच्या साथीने जगणाऱ्या तीन कमावत्या तरुणी. एक दिवस एका पार्टीत त्यांच्यासोबत काही मुलं अतिप्रसंग करायचा प्रयत्न करतात. पण या तिघी जणी त्या जबरदस्तीला धैर्याने प्रतिकार करून तिथून सटकतात. त्या वेळच्या झटापटीत एक मुलगा जखमी होतो. त्यानंतर त्या मुलींच्या आयुष्यात जी उलथापालथ होते, जे थरारक नाट्य घडते – ते ‘पिंक’मध्ये आपल्यासमोर उलगडत जाते. एका टॅक्सीमधून घरी निघून येत असणाऱ्या धास्तावलेल्या तीन मुली आणि दुसऱ्या एका गाडीतून एका जखमी मुलाला डॉक्टरकडे घेऊन जात असलेले मुलगे अशा दोन धावत्या गाड्यांमधली समांतर दृश्य दाखवत चित्रपटाला सुरुवात होते. एका बाजूला या मुलग्यांकडे असलेला सत्तेचा माज आणि दुसऱ्या बाजूला मुलींचा खंबीरपणा, अशा दोन विरुद्ध टोकांची तुलना चित्रपटभर आपल्यासमोर येते. वरवर पाहता ही त्या तीन मुलींच्या संतापाची, वैफल्याची, असहाय्यतेची आणि संघर्षाची कहाणी वाटली तरी त्याच वेळी या कथेतून त्यांच्या आसपासच्या पुरुषांच्या वर्चस्ववादी मनोवृत्तीवर बोट ठेवलेले आहे! या मुलींच्या अवतीभोवती जे विविध वयाचे आणि वेगवेगळ्या नात्यांनी जोडलेले पुरुष आहेत- त्यात त्यांच्या सोसायटीतले त्यांच्याकडे संशयाने पाहणारे शेजारी, धमक्यांना न घाबरणारा त्यांच्या घराचा मालक, गर्लफ्रेंडला पाठिंबा देण्याऐवजी तिला कोरडी लेक्चरबाजी करणारा मित्र, तक्रार नोंदवून घ्यायला टाळाटाळ करणारा पोलिस अधिकारी, कुठल्याही पुराव्याशिवाय मुलींचे चारित्र्यहनन करणारा प्रतिपक्षाचा वकील- या सगळ्यांच्या वागणुकीतून पुरुषप्रधान व्यवस्थेचे वेगवेगळे पैलू या चित्रपटातून पुढे आलेत. या सगळ्या पुरुषांकडे पैसे, प्रतिष्ठा, उच्च शिक्षण, पोलिसी वर्दी अशा मार्गांनी मिळालेली सामाजिक सत्ता आहे. त्या उलट मुलींकडे आत्मविश्वास, स्वत:च्या हक्कांची जाणीव आणि त्यातून आलेला खंबीरपणा आहे. सिनेमाच्या सुरुवातीपासून पुरुषांकडे असलेली सत्ता आणि या मुलींनी कमावलेली वैयक्तिक ताकद यांच्यातला संघर्ष वाढत जाऊन मध्यंतरापर्यंत अगदी टोक गाठते. ज्या प्रसंगावरून हा संघर्ष सुरू झालाय, तो प्रसंग पडद्यावर दिसतच नाही. वेगवेगळ्या पात्रांच्या संवादातल्या उल्लेखांमधूनच त्याचा अंदाज येतो. मुलींना फोनवर दिल्या जाणाऱ्या धमक्या, त्यांना बेघर करायचा प्रयत्न, त्यांनी स्वत:च्या बचावासाठी मुलांशी झटापट केलेली असूनही मुलींनीच माफी मागितली पाहिजे यासाठी त्यांच्यावर आणलेला दबाव, फलकचे अश्लील फोटो ऑफिसमध्ये दाखवले जाणे, पोलिस तक्रार करायचा प्रयत्न केल्यावर मीनलवर लैंगिक हल्ला होणे आणि शेवटी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मीनललाच अटक होणे- अशा घडामोडींमुळे मध्यंतरापर्यंतचा पहिला भाग अतिशय वेगवान आणि थरारक झाला आहे. पण इतक्या शारीरिक आणि भावनिक हिंसेशी सामना करतानादेखील त्या तिघी जणी कधीही बिचाऱ्या दाखवलेल्या नाहीत. अमिताभ बच्चनने मुलींचे वकीलपत्र घेईपर्यंत या तिघींचे काय होणार, अशी काळजी प्रेक्षकांना वाटायला लागते, इतकी भीषणता त्या सगळ्या प्रसंगातून गाठली गेलीय. मध्यंतरानंतरच्या दुसऱ्या भागात सुरू होतात कोर्टातले वादविवाद. सभ्य कुटुंबातल्या गरीब बिच्चाऱ्या सालस मुलांना छळणाऱ्या चारित्र्यहीन मुली – अशा भूमिकेतून तिघींवर आरोप केले जातात. मुख्य आरोपी असलेल्या मीनलचे कपडे, तिचं काम, तिच्या कामकाजाच्या वेळा, तिचे आईवडील दिल्लीतच राहात असूनही तिने त्यांच्यासोबत न राहणं, एवढंच नाही तर तिची व्हर्जिनिटी अशा खासगी बाबींना चव्हाट्यावर मांडलं जातं. आंद्रिया केवळ मेघालयातून आलेली आहे यावरून ती वेश्याव्यवसाय करते, असे गृहीत धरले जाते. फलकचा भाऊ अपंग असल्याचा संदर्भ देऊन तिच्या बॉयफ्रेंडशी तिचे पैशांच्या देवाणघेवाणीचे संबंध आहेत, असाही आरोप होतो. चित्रपटाच्या पहिल्या भागात बघितलेल्या प्रत्येक प्रसंगातला जो क्रूरपणा होता, तो कोर्टातल्या या आरोपांच्या फैरीमुळे जास्तच गडद होतो. एका क्षणी या वेश्याव्यवसायाच्या आरोपांना कंटाळून फलक खचून जाते आणि अचानक आपण पैसे घेतल्याचे कबूल करून बसते. पण जेव्हा वकिलाच्या भूमिकेतला अमिताभ बच्चन प्रतिप्रश्न करतो, तेव्हा मुलींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जे प्रश्न विचारले गेले तेच प्रश्न तो फिर्यादी मुलांना विचारायला सुरुवात करतो. आणि तिथे पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या दुटप्पीपणाचे वाभाडे निघायला लागतात. मुलीचे चारित्र्य ठरवताना जे निकष लावले जातात, ते मुलांना लावावेत, असा पुसटसा विचारदेखील आजवर ज्यांनी केलेला नसेल अशा माणसांसाठी अमिताभचे युक्तिवाद डोळ्यात अंजन घालतील. आजवर स्त्रीवादी चळवळीने अनेक कार्यशाळा, मोर्चे यांमधून मांडलेले विचार या युक्तिवादांच्या निमित्ताने एकगठ्ठा मांडले गेलेत. प्रेक्षक कथेमध्ये पूर्णपणे गुंतल्यानंतर या कोर्टरूम ड्रामाच्या माध्यमातून पुरुषी मूल्यांवर हे घाव घातले गेलेत. स्त्रियांच्या शरीरावर आणि मनावर फक्त त्यांचा स्वत:चाच अधिकार असतो. स्त्री कोणासोबत, किती वाजेपर्यंत घराबाहेर राहते, ती सिगारेट ओढते की दारू पिते, यामुळे तिच्याशी कसलीच जबरदस्ती करण्याचे समर्थन होऊ शकत नाही- कुठल्याही स्त्रीच्या सहमतीशिवाय तिला स्पर्श करणे हा गुन्हाच आहे. तिच्या नकाराला तुम्ही मान दिलाच पाहिजे. हे सगळे मुद्दे या सुनावणीमधून अतिशय ठाशीवपणे मांडले गेलेत. तो खटला त्या मुली जिंकतात की नाही, फिर्यादींना आरोपी कसे ठरवले जाते, अशा प्रश्नांची उत्तरे सिनेमा पाहताना मिळतातच. या खटल्यातले बारकावे अतिशय लक्षपूर्वक ऐकणाऱ्या एका पोलिस कर्मचारी महिलेच्या चेहऱ्यावर निकालानंतर झळकणारे समाधान दाखवत कॅमेरा स्थिरावतो, तेव्हा दिल्लीसारख्या महानगरात स्वतंत्रपणे जगणाऱ्या तीन मुलींपासून सुरू झालेली गोष्ट खऱ्या अर्थाने पूर्ण होते! सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांना वास्तवाशी आणून जोडतो. वास्तवात एखादी बाई अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कोर्टाकडे धाव घेते, तेव्हा ‘बायका कायद्याचा सूडासाठी दुरुपयोग करतात,’ अशी हाकाटी मोठ्या प्रमाणावर केली जाते. निरागस पुरुषांवरच माजलेल्या बायकांकडून अन्याय होतात, अशी मांडणी करायची सध्या फॅशन आहे. अशा परिस्थितीत इतक्या स्पष्टपणे स्त्रियांची बाजू मांडणारा चित्रपट येणे फार महत्त्वाचे आहे! अशा एखाद्या चित्रपटामुळे लगेच सगळ्या पुरुषांची मानसिकता बदलून जाणार नाही. तरी पितृसत्तेच्या भिंतीला एखादे भगदाड पाडायला नक्की मदत होईल.

vandanakhare2014@gmail.com
बातम्या आणखी आहेत...