आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhurima Article About Responce, Madhurima, Divya Marathi

काही मिनिटे माझी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे
घरातल्या स्त्रीला तिच्यासाठी काही मिनिटे तरी हक्काची असू द्या. कुटुंबातील ती सदा न‌् कदा जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली असते. काही ठिकाणी चूल आणि मूल या व्यतिरिक्त बाहेरचे जग माहीत नसलेली ज्येष्ठ पिढी तिला अधिकाधिक अडकवत असते. त्यांचा आदर राखत ती स्वतःकडे दुय्यमपणा घेते आणि त्या चक्रात अडकते. जेव्हा जाग येते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आपण केलेल्या कामांचे पाढे कुणालाच नंतर नको असतात, त्यापेक्षा आजच सुज्ञ होऊ या. मी सकाळी एक तास फिटनेससाठी अवश्य काढते. त्यासाठी माझा आटापिटा असतो. लिखाणाचा छंद असल्यामुळे लिखाणाला वेळ आपोआप निघत जातो. कारण लिहिले नाही की मन अस्वस्थ होऊन जाते. त्यासाठी जाणीवपूर्वक मोजूनमापून वेळ वापरते. अनावश्यक वेळ गेल्यास अपराधी वाटू लागते. वेळेचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे.
- स्वाती पाचपांडे, नाशिक

आरोग्य, आवड जपू या
प्रिय सख्यांनो, आपण घर, सण, समारंभ व घरातील सदस्यांची काळजी यात इतके गुंतलोय की, स्वतःकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. मग ती सखी नोकरी करणारी असो नाही तर गृहिणी. मग एखादा आजार जडला की जाग येते. हे खरे आहे. त्यासाठी घरातील सर्वांची काळजी तर घेऊच, पण त्याबरोबरच आपल्या आवडी जपू. आरोग्याकडे वेळीच लक्ष देऊ. स्वतःच्या आवडी जपल्याने आनंद तर मिळेलच, पण त्यामुळे मन प्रसन्न राहील. रोजच्या कामात आपण इतके गुंतलोय, यामुळे स्वभाव चिडचिडा बनला आहे. चला तर मग, आज मधुरिमाने आपणास जागं केलं आहे. तिचे आभार मानू. आरोग्याकडे, स्वतःच्या आवडीकडे लक्ष देऊ.
-मंजुषा स्वामी, उस्मानाबाद

आईचा छंद
माझी आई सर्वांची खूप काळजी घेते. सर्वांच्या इच्छा पूर्ण करते. पण मला आवडणारी एक गोष्ट म्हणजे, ती रोज वर्तमानपत्र वाचते आणि त्यातली तिला आवडलेले लेख कापून जपून ठेवते.
- शुभांगी सोनुने, बुलडाणा

कर्तव्यपूर्ती हेच जीवनाचं ध्येय
स्त्री तळागाळातली असो वा समाजातील वरच्या स्तरातील, परिस्थिती तिच्यापुढे अडचणींचे डोंगर उभे करतेच. परंतु या सर्व सुखदु:खातून जीवनाचा प्रवास यशस्वी करताना स्वत: आनंदी राहून इतरांना त्यात सहभागी करणे फार महत्त्वाचे ठरते. दु:ख मनात साठवून चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणारी जीवनरूपी चित्रपटातली कलावंत असते ती घरातील माउली. मी असो वा माझी आई, संसारातून वेळात वेळ काढून स्वत:साठी जगणं आम्ही विसरलो नाही. मित्रमैत्रिणींबरोबर धमाल ट्रिप असो वा इतर समारंभ; आमची हजेरी नित्यनियमित असते. स्वत:चे दु:ख विसरून इतरांच्या आनंदात सहभागी होणं म्हणजे जीवन. वयाबरोबर नाती वाढतात आणि नात्यांबरोबर जबाबदाऱ्या. त्या पार करत असताना स्वत:च्या अनेक इच्छा मागे सारून इतरांची स्वप्नं पूर्ण करावी लागतात. मला हे करायचं होतं, पण संसाराच्या जबाबदारीत ते राहून गेलं, असं कोणी माउली बोलली की खूप हळहळ वाटते. अथक परिश्रमातून उच्च शिक्षण अथवा शिक्षण पूर्ण केलेली ही माउली घरासाठी तन, मन, धन अर्पण करते. स्वत:चा विचार न करता संसाराशी एकरूप होते. ते बरोबर जरी असले तरी स्वत:च्या इच्छा, अपेक्षा, छंद, आवडी-निवडी हेही जोपासलं गेलं पाहिजे. स्त्रीच्या जीवनाचं एकच ब्रीद असतं, ‘न सन्मान का मोह। न अपमान का भय। कर्तव्यपूर्ती यही जीवन का ध्येय।’
-ज्योती चव्हाण, नाशिक

गेले ते दिवस
स्व:तकडे दुर्लक्ष करण्याचा जमाना आता लयास गेला. बदलत्या कालानुसार स्त्री खूप जागरूक झाली आहे. तीच खरी कुटुंबाची आधारस्तंभ आहे. उत्तम आरोग्यासाठी ती योग्य असा व्यायाम करते. आहाराचे उत्तम नियोजन करते. हे करत असताना तिला तिच्या घरातून म्हणजेच नवरा, मुलं, सासू-सासरे यांची उत्तम साथ असते. अारोग्य ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे ती जशी कुटुंबाची काळजी घेते, तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिची काळजी घेतो. आमच्या घरात मी सोबत असल्याशिवाय माझे पती व मुलगी नाष्टा करतच नाहीत. कारण त्यांना माहीत असते, ही एकदा कामाला लागली की, नाष्टा करायचा विसरते. मी आई आणि बायकोच्या भूमिकेत जशी त्यांची आवड जपते, तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ते दोघे माझी काळजी घेतात. स्त्रीला स्वत:साठी पहाटेचा उत्तम वेळ नक्कीच काढता येतो. या वेळात ती फिरायला जाणे, योग, किंवा वाचन अशा आवडी पूर्ण करू शकते. आपल्यासाठी वेळ काढला की तो मिळतोच. तेव्हा हे सारे ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.’ तरच आपले आरोग्य उत्तम राहील.
-मंजुषा कोरंगळेकर, औरंगाबाद