आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परसबाग घरातील वैद्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा सुरू होतोय. काही दिवसांत बाजारात भाज्यांचीही रेलचेल दिसेल. पण आपल्या परसबागेत पिकवलेल्या भाज्यांची सर विकतच्या भाज्यांना कधीही येत नाही.
तेव्हा या पावसाळ्यात घरातील छोट्याशा जागेत का होईना आरोग्यदायी भाजीपाला
लावून तर पाहा...


परस म्हणजे अंगण आणि या अंगणात फुलवलेली भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग. ही परसबाग महत्त्वाची जागा असते, कारण भाजीपाला हा एकमेव स्रोत आहे जो आपल्या आहारामध्ये पोषण देतोच, चवीची/स्वादाचीदेखील वाढ करतो. संतुलित आहारासाठी एका व्यक्तीला दररोज ३०० ग्रॅम भाजीपाल्याची आवश्यकता असते. परंतु आपल्या देशात भाजीपाल्याच्या उत्पादनाचा विचार केला तर एका व्यक्तीला दररोज फक्त १२० ग्रॅम भाजीपाला मिळू शकतो, म्हणजे आपल्या गरजेएवढा भाजीपाला घ्यायचे ठरवले तरी तो आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकत नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, परंतु आज ग्रामीण भागांमध्ये शहरी भागांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. याकरिता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्येही परसबागेविषयी जागृती करायला हवी. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या एका कोपऱ्यात परसबाग तयार केली पाहिजे. ही कामे रोजच्या कामातून थोडा वेळ काढून केल्यास आपले मन प्रसन्न राहते, तसेच मजुरीचीही बचत होते.

वरील सत्य गृहीत धरून आपण आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार ताजा, स्वच्छ, कीटकनाशकविरहित भाजीपाला आपल्याच अंगणात घेतला पाहिजे. या बागेत सर्व प्रकारच्या म्हणजे पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय, कंदमुळे तसेच औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे यांचा समावेश केला पाहिजे. परसबागेसाठी आपल्या घरासमोरील किंवा मागील जागा योग्य. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश आहे, अशी जागा निवडावी. घरातील सांडपाणी भाजीपाल्यांच्या वाफ्याच्या दिशेने वळवावे. परसबागेसाठी जमीन किती उपलब्ध आहे, तसेच घरात किती सदस्य आहेत, यावरही अवलंबून असते. परसबागेसाठी कोणता आकार निश्चित केलेला नाही, परंतु चौकोनी आकार सहसा करतात. परसबागेच्या उत्तर बाजूस किंवा कुंपणाच्या कडेने उंच वाढणारी झाडे लावावीत, जेणेकरून त्याची सावली भाजीपाल्यावर पडणार नाही व उन्हाळ्यात घराभोवती गारवा निर्माण होईल. एकाच वेळी सर्व भाज्यांची लावणी न करता त्यांचा पुरवठा सतत होण्याकरिता त्यात काही अंतर ठेवावे, जेणेकरून खंड न पडता भाजीपाला मिळत राहील. आपल्या आहारात विविधता आणण्याकरिता काही विदेशी भाजीपाल्यांचाही उदा. झुकीनी, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स, चेरी टमाटे, पिअर टमाटे, गोल्डन टमाटे, चायनीज कोबी इ. परसबागेत समावेश करावा. या विदेशी भाज्यांना बाजारातदेखील चांगला भाव मिळतो. आपल्या परसबागेच्या आवडीला आपण व्यवसायाचीदेखील जोड देऊ शकतो.

>परसबाग उपलब्ध जागेत तयार करता येते. तिला जागेची किमान वा कमाल मर्यादा नसते.
>विटा, मोठे दगड किंवा मातीचे वाफे तयार करावे. प्लास्टिकचे मोठे ट्रेही वापरता येतील.
>भाजीपाल्यानुसार जागेचे वर्गीकरण करा. ज्या भाज्यांची मुळे लहान आहेत, अशा भाज्या वाफ्यांमध्ये घ्याव्यात. ज्यांची मुळे लांब आहेत अशा भाज्या बकेटमध्ये घ्याव्यात.
>वेलवर्गीय भाज्या भिंतीच्या दिशेने घ्याव्यात. या भाज्यांसाठी गार वेगळा मांडव केल्यास वेलींना जास्त भाजीपाला लागतो.
>जनावरांपासून संरक्षणासाठी उपलब्ध साहित्याचे कुंपण करावे.
>बियाणांवर खर्च फक्त एकदाच करावा. नंतर भाजीपाल्यांचे बी वाळवून परत ते वापरावे.

भाज्यांचे वर्गीकरण
>पालेभाज्या – पालक, मेथी, शेपू, चुका, कोथिंबीर,
माठ, तांदूळजा, अळू, घोळ
>फळभाज्या – मिरची, टमाटे, वांगी, गवार, चवळी,
भेंडी, फुलकोबी
>वेलवर्गीय – कारले, दोडके, दुधीभोपळा, लाल भोपळा,
काशीफळ, काकडी, वाल
>औषधी –अक्कलकाढा, पुदिना, तुळस, गवती
चहा, कोरफड, वावडिंग
>फुलझाडे – मोगरा, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली,
काकडा, गलांडा

परसबागेसाठी सेंद्रिय खत
> परसबागेसाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचाच वापर करावा, ज्यामुळे भाजीपाल्यातील पोषकमूल्ये कमी होणार नाहीत.
> सहज उपलब्ध होणारे व तयार करण्यास सोपे खत म्हणजे सेंद्रिय खत. आपल्या घरातील जुन्या माठामध्ये किंवा फुटलेल्या टाकीत सेंद्रिय खत तयार करता येते.

सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धती
> एका माठामध्ये सर्वात खाली नारळाच्या जटा टाकाव्यात, ज्यामुळे माठात ओलावा कायम राहतो. त्यानंतर त्यावर काडीकचरा, अर्धवट कुजलेले शेण व माती असे ६-६ इंचाचे थर करावे. सर्वात वर ओले शेण पाण्यामध्ये मिसळून टाकावे. साधारण: ३-४ दिवसांनी त्यात २०-२५ गांडुळे सोडावी. हा माठ एका बकेटवर ठेवावा, ज्यामुळे ४५ दिवसांनी तुम्हाला गांडूळखत व गांडूळपाणीदेखील मिळेल.