आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यापनाचा वसा (संतोष मुसळे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला जिल्ह्याच्या सांगळूद इथल्या पहिल्या ‘शाळासिद्धी’ पुरस्कारप्राप्त शाळेच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या वंदना सोळंके यांना भेटू या तिची वेगळी वाट या सदरातून...
अकोला शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर वसलेलं सांगळूद हे ३,२०० लोकसंख्येचं गाव. गावातील शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील पहिली ‘शाळासिद्धी’ पुरस्कारप्राप्त शाळा. तो मिळवण्यासाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली त्या आहेत, या शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोळंके. वंदना प्रतापसिंग सोळंके यांचा जन्म गाव कुटासा ता. अकोट, जि. अकोला या छोट्या खेडेगावात झाला. त्यांना दोन बहिणी व दोन भाऊ. सतत इतरांपेक्षा वेगळं करून दाखवण्याची ऊर्मी. शिक्षिका म्हणून त्यांनी आजपावेतो ज्या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य केले त्या त्या ठिकाणी मुलांसाठी शैक्षणिक नंदनवन उभे केले. वडील शिक्षक तर आई गृहिणी होती. वडिलांकडूनच त्यांनी अध्यापनाचे बाळकडू घेतले व त्यांचाच वसा चालवायचा, ही खूणगाठ मनाशी बांधून त्या मार्गक्रमण करत आहेत. पती रमेश महादेव चव्हाण (विस्तार अधिकारी, पंचायत)
ता. बार्शी टाकळी, जि. अकोला ग्रामसेवक या पदावर असताना त्यांनी अनेक गावं आदर्श केली.
आजही स्वच्छता अभियानांतर्गत गावोगावी सभा घेणे, मार्गदर्शन करणे सुरूच आहे. जे गाव त्यांनी दत्तक घेतले ते गाव आदर्श झाल्याशिवाय राहात नाही. त्यांना कामाची खूप आवड आहे. शाळेच्या कामातही ते खूप मदत करतात. सुटीच्या दिवसात दोघे शाळेत येऊन काम करू लागतात. मुलगी सुरभी व मुलगा रामही आईला मदत करतात.
मॅडम २०१२मध्ये या गावात बदलीनंतर रुजू झाल्या. गाव तसं खूप मोठं, शाळाही मोठीच होती. गावातच खासगी संस्था असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडेच अधिक होता. अशा वेळी शांत डोकं ठेवून सहकारी शिक्षकांसमवेत चर्चा केली. नंतर गावातील नागरिकांसमवेत चर्चा करून शाळाविकासाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी शाळेत कसा रमेल याकरिता शाळेची रंगरंगोटी, भौतिक सुविधा, फुलझाडे, बगीचा, खेळणी ही कामे लोकसहभागातून केली. काही पैसे स्वत:चेही खर्च केले. याचा परिणाम लगेचच मुलांत दिसला. जी मुलं शाळेत यायला कंटाळा करायची, त्यांना आता घरी जा, असं म्हणावं लागतं. शाळेला सन २०१२-१३मध्ये सानेगुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाला. विभागाचेसुद्धा प्रथम पारितोषिक मिळाले. मात्र यासाठी शाळेत बरीच कामे करावी लागली. शौचालय बांधकाम, आधीच्या शौचालयाची दुरुस्ती, पाण्याची व्यवस्था, नळाच्या तोट्या, आवार भिंतीवर तारेचे कुंपण करावे लागले. कारण गावातील लोक भिंतीवरून आत येऊन सुटीच्या दिवसात त्रासदायक गोष्टी करून ठेवायचे, पण जसजशी शाळेत सुधारणा होत गेली त्यांचे शाळेविषयी मत बदलत गेले. आता त्याच व्यक्ती शाळेला मदत करतात.
आजघडीला शाळेची पटसंख्या २३५, तर शिक्षकसंख्या ९ आहे. शाळेची वाढलेली गुणवत्ता बघून आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थीही प्रवेश घेत आहेत. या कामी शाळेतील सर्व शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सदोदित मदत करतात.
उपक्रम:
बालसभा : बालसभा हा उपक्रम मुलांची जिज्ञासू वृत्ती कशा प्रकारे वाढविता येईल, यासाठी सुरू केला. यात प्रश्नमंजुषा घेतली जाते. प्रत्येक वर्गातील विद्यार्थी प्रश्नपेढीत प्रश्न लिहून टाकतात. नंतर ज्या दिवशी बालसभा आहे त्या दिवशी या प्रश्नपेढीतील प्रश्नांचे सभेत वाचन केले जाते. जो विद्यार्थी जास्तीत जास्त उत्तर देईल, त्यास योग्य बक्षीस दिले जाते. याचा फायदा असा झाला की, मुलं घरी पाठ्यपुस्तकासमवेतच अवांतर वाचन करू लागली. तसेच स्पर्धा परीक्षेविषयीदेखील माहिती मुलं या ठिकाणी शिक्षकांकडून घेतात.
वाचन कट्टा : शाळेच्या पटांगणावर दर शनिवारी विद्यार्थी सामूहिकरीत्या बसून आवडत्या पुस्तकाचे वाचन करतात. वाचनासोबतच मुलांनी वाचलेल्या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद मुले स्वतःहून करायला शिकलीत. या घटकावर मुलं आपल्या प्रतिक्रिया देतात. यामुळे मुलांना अभिव्यक्त होण्यास संधी तर मिळालीच, सोबत नकळत मुलांत वक्तृत्व, सभाधीटपणा व भाषाशैली विकसनास मदत होताना दिसते.
दप्तरमुक्त शनिवार : शालेय दप्तराच्या ओझ्याची चर्चा मागील वर्षी खूप मोठ्या प्रमाणात झाली. काही ठिकाणी दप्तरांचे ओझेदेखील मोजण्यात आले. यातून मुलांच्या वजनापेक्षा दप्तराचेच वजन अधिक आढळून आले. आजही सगळीकडे हीच परिस्थिती दिसते. मॅडमनी या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘दप्तरमुक्त विद्यार्थी’ हा उपक्रम राबविणे सुरू केले. या दिवशी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मुलांतील विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सोबतच परिसरज्ञान मिळावे यासाठी व्यावसायिकांना भेटी, बाजाराला भेट, व्यवहार समजण्यासाठी एक प्रयत्न, पाहुणा शिक्षक आमंत्रित केले जातात. महिला छान कलाकृती विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थीसुद्धा आनंदाने शिकतात. त्याचबरोबर प्रत्येक वर्गातील मुले विविध कृतियुक्त कविता, बोधकथा सादर करतात. पाठांचे नाट्यीकरण असे कार्यक्रम दप्तरमुक्त शनिवारी घेतले जातात.
आनंदातून शिक्षण : शिक्षणातून आनंद निर्माण होत असेल तर मुलं आनंदाने शाळेत रमतात व ज्ञानार्जन करतात. या उपक्रमांतर्गत शब्दकोडे, चंफुल, वाघबकरी, सापशिडी या माध्यमांतून मुले शाब्दिक खेळ खेळतात व यातूनच एकमेकांशी मैत्री करतात. सोबतच विविध माइंड गेम्सच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण घेत राहतात.
अहवाल लेखन : मॅडम विद्यार्थ्यांकडून सण, उत्सव, शाळेतील कार्यक्रमांचे, सहलीचे अहवाल लेखन करून घेतात. मुलंही अहवालात ज्या ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या त्या नमूद करतात. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिखाणासाठी प्रोत्साहित करणे व त्यांनी पाहिलेल्या अथवा अनुभवलेल्या घटनांचे वर्णन अपेक्षित आहे.
अन्य उपक्रम : बालआनंद मेळावा, विविध स्पर्धा, क्षेत्र भेट, वाढदिवस साजरे करणे, रोपवाटिका, कंपोस्ट खत तसेच गांडूळ खत निर्मिती, शोषखड्डे, स्नेहसंमेलन, पर्यावरणपूरक कार्यक्रम, जयंती पुण्यतिथी साजरी करणे, हस्ताक्षर सुधार प्रकल्प इ.
santoshmusle1515@gmail.com
बातम्या आणखी आहेत...