आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅसिड अटॅक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्षी! खूप नितळ त्वचा असलेली, गोरीपान, सतत खांद्यांपर्यंतचे दाट केस मोकळे सोडणारी आणि चेहर्‍यावर हास्य ठेवणारी एक धाडसी मुलगी! मध्यंतरी चौरस्त्यावर उभी असताना एका पोलिस सब-इन्स्पेक्टरने तिच्या गाडीला मागून धडक दिली. त्याने माफी तर मागितली नाहीच, वर हिलाच दमदाटी करू लागला. नवीन घेतलेल्या गाडीला झालेले नुकसान बघून तर तिला रडूच फुटले. पै-पै जमवून आणि बँकेतून थोडे कर्ज घेऊन तिने गाडी घेतली होती ऑफिसला जायला - यायला. तिला खूप राग आला. तिने त्या सबइन्स्पेक्टरला गाडी सुधरवण्यासाठी येणारा खर्च द्यायची विनंती केली. पण त्याच्यावर वर्दीची गुर्मी चढली होती. त्याने हसून चक्क कुठलाही खर्च देण्याचे नाकारले. थोडे वाद झाले. आणि जेव्हा तिला त्याचे उर्मट वागणे सहन झाले नाही त्या वेळी तिने त्याला सरळ एक थोबाडीत लगावली. अजून प्रकरण चिघळू नये यासाठी त्या सबइन्स्पेक्टरने काढता पाय घेतला. हे प्रकरण होऊन जवळपास तीन आठवडे झाले असावेत. आणि अचानक आज ती ऑफिसमधून बाहेर निघते तोच - तोच सबइन्स्पेक्टर रस्त्याच्या उलट्या बाजूला हसत उभा असलेला तिला दिसला. तिला एकदम धडधडायला लागले. तिने तिची गाडी सुरू केली आणि आपल्या रस्त्याने घरी निघाली.
चौरस्त्यावर असताना तो तिच्या बाजूलाच येऊन उभा! तिचे मन चरकले. हिरवा दिवा लागला आणि तिने गाडी सुरू केली. तेवढ्यात तिच्या चेहर्‍यावर आणि हातावर काहीतरी गरम पदार्थ पडला आणि क्षणातच तिला असह्य आग-आग होऊ लागली. तिला काही समजण्याच्या आत ती गाडीवरून खाली पडली आणि तिच्या लक्षात आले की तिच्यावर अ‍ॅसिड अटॅक झाला होता. त्याच सबइन्स्पेक्टरने कुण्या दुसर्‍या व्यक्तीच्या मदतीने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले होते.
गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयक, 2013 नुकतेच लोकसभेत मंजूर करण्यात आले. कुणी दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने सूड भावनेने किंवा अन्यथा, कुठल्याही महिलेवर अ‍ॅसिड अटॅक केल्यास त्यास कायद्याअंतर्गत गुन्हा मानून अशा प्रकारचा गुन्हा करणार्‍यास 10 वर्षे कैद, जी आजीवन कारावासाच्या शिक्षेमध्ये रूपांतरित होऊ शकते आणि 10 लाखांपर्यंतचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.
या नवीन विधेयकाने महिलांवर होणार्‍या अत्याचारांची व्याप्ती वाढवलेली आहे आणि नवीन गुन्हे जसे - अ‍ॅसिड अटॅक, महिलांना निर्वस्त्र करणे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच बलात्काराच्या परिभाषेमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलमांमध्ये 326(अ), 326(ब), 354(अ), 354(ब), 354(क) यांचा समावेश करण्यात आला आहे. कलम 326(अ)मध्ये महिलांवरील अ‍ॅसिड हल्ले, 326(ब) मध्ये अ‍ॅसिडचा हल्ला करण्याचा प्रयत्न, 354(अ) अंतर्गत कोणत्याही स्त्रीला लाज वाटेल असे वर्तन करणे, शारीरिक स्पर्श किंवा लगटपणा, लैंगिक बोलणे किंवा त्या अर्थाचे संभाषण करणे. जबरदस्तीने अश्लील चित्रे अथवा चित्रपट दाखवणे, नकोसे वाटणारे किंवा तिटकारा वाटेल असे शारीरिक, शाब्दिक किंवा इतर पद्धतीने सूचक लैंगिक वर्तन यासाठी किमान पाच वर्षे आणि जास्तीत जास्त आयुष्यभरासाठी कैद आणि दंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. महिलांना निर्वस्त्र करणे किंवा समाजात मारहाण करून जबरदस्तीने निर्वस्त्र करणे यासाठी कमीत कमी 3 वर्षांची कैद, जास्तीत जास्त 7 वर्षांची कैद व दंड ही शिक्षा सांगितलेली आहे.
याशिवाय 354(क) कलमानुसार दुसर्‍या व्यक्तींना कामक्रीडा करताना चोरून बघणे किंवा तत्सम कृत्य करताना बघून त्याचा चोरून आनंद घेणे हाही गुन्हा मानण्यात आला आहे आणि त्यासाठी कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्षे कारावासाची शिक्षा आणि दंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. कलम 354(ड) नुसार पाठलाग करणे, येनकेन प्रकारे त्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करणे, पाठलाग किंवा फोनद्वारे पाठलाग करून व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करणे अशा कृतींना कायद्याअंतर्गत गुन्हा मानला आहे. गुन्हा करणार्‍याला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा सांगितलेली आहे.
महिला अत्याचारविरोधी विधेयकात भादंवि कलम 370 च्या जागी 370 आणि 370 (अ) याचा समावेश करण्यात आला आहे. यात मुख्यत्वेकरून वाममार्गाला लावण्याच्या उद्देशाने अपहरण, तसेच लैंगिक छळ आणि व्यापार करून घेण्याच्या उद्देशाने धाकाने किंवा धमकावून अपहरण करणे अशा गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विधेयकात भारतीय दंड संहितेच्या कलम 375 मधील बलात्काराच्या व्याख्येमध्ये बदल करण्यात आला आहे. यात बलात्कार या शब्दाऐवजी लैंगिक हिंसा (री७४ं’ ं२२ं४’३) असा शब्दप्रयोग केला आहे. तसेच लैंगिक छळ करणार्‍या व्यक्तींना कमीत कमी 20 वर्षे कारावासाची शिक्षा आणि जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा सुचवलेली आहे. याशिवाय अशा कृत्याला बळी पडलेल्या महिलेचा वैद्यकीय खर्च आणि पुनर्वसनाचा खर्च ही दुष्कृत्ये करणार्‍यास द्यावा लागणार आहे.
याशिवाय 376(अ) कलम नव्याने अंतर्भूत करण्यात आले आहे. लैंगिक छळासोबतच जर मारहाण करून शारीरिक इजा केली असेल तर शिक्षा 20 वर्षे कारावासाऐवजी आजन्म कारावासाची शिक्षा होईल. साक्षीसारखी वेळ कोणावरही आल्यास आता त्यावर कायद्याने संरक्षण दिले आहे.
nbtlawcollege@rediffmail.com