आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रदीप व रेखाचं एकमेकांवर प्रचंड प्रेम. त्यांच्यासारखी जोडी या जगात शोधूनही सापडणार नाही असं सर्वांचं मत होतं. कोणी त्यांना लक्ष्मी-नारायणाच्या जोडीची उपमा देत तर कोणाला ते केवळ एकमेकांसाठी जन्माला आले आहेत असं वाटायचं. दिसण्याच्या बाबतीत ते एकमेकास अनुरूप होते यात शंकाच नाही. दोघांचा डोळे दिपविणारा शाही विवाह थाटात पार पडला.
लग्नानंतर त्यांची नाती बदलली. आजपर्यंत ते एकमेकाचे प्रियकर-प्रेयसी होते. पण आता ते नवरा-बायकोच्या नात्यात शिरले. काही महिने विवाहज्वर टिकला, पण तो ओसरल्यानंतर काही काळाने प्रदीपला रेखाच्या वागण्या-बोलण्यात चुका आढळू लागल्या व त्यांचा वेळी-अवेळी केवळ एकांतातच नव्हे तर चारचौघांमध्येही उल्लेख होऊ लागला. आपल्या वागणुकीतील चुकांचा त्याला लग्नानंतरच शोध कसा काय लागला, याबद्दल रेखाला खूपच आश्चर्य वाटू लागले. त्याने आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत केलेल्या घोडचुकांचा त्याच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता व अगदी क्षुल्लक कारणांवरून तो सतत चिडचिड करू लागला होता.
स्वत: चुका करूनही सद्गुणांचा पुतळा असल्याप्रमाणे सर्वत्र वावरणे व पत्नीच्या चुकांचा वारंवार उल्लेख करून अनेकदा तिचा जाहीर अपमान करण्याचा प्रकार इतका वाढला की त्या दोघांमध्ये खटके उडू लागले आणि एका दृष्ट लागण्यासारख्या संसाराच्या नौकेचे घटस्फोटाच्या खडकावर आदळून जेव्हा असंख्य तुकडे झाले तेव्हा खूप उशीर होऊन गेला होता. असे आम्ही कसे? सतत दुसर्यांच्या चुका काढून त्यांची जाहिरात करणे यालाच सुसंस्कृतपणा म्हणतात का? जो चुका करतो त्यालाच माणूस म्हणतात. चुका माणसांच्याच हातून होत असतात. लहानसहान चुकांकडे दुर्लक्ष केलं व त्यांचा चारचौघांमध्ये उल्लेख करणे टाळलं तर कोणाच्याही सहजीवनात सुख व समाधानाची निर्मिती होऊ शकते हे अनेकांना कळतच नाही. जगात मोजकेच लोक यशस्वी का होतात याचं रहस्य चुका न काढण्याच्या प्रवृत्तीत आहे. प्रत्येकाच्या हातून चुका घडतात आणि त्या लपवून स्वत:ची अब्रू वाचविण्याचा पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केला जातो. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अब्रूला जपण्याचा प्रयत्न करते तर इतरांच्या चुकांची जाहीररीत्या वाच्यता करून त्यांची बेअब्रू करण्यात कोणता सुज्ञपणा आहे? इतरांच्या चुकांमुळे नुकसान होत नसेल तर त्यांचा उल्लेखही कुठे करू नका. पण ज्या चुकांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित व्यक्तीला खासगीत त्याची जाणीव जरूर करून द्या. इतरांचा अपमान न करता मान राखणे हा सर्वात मोठा आत्मसन्मान आहे, हे आपल्या लक्षात आहे ना?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.