आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मग बायकांनी इथं बसून हुक्का ओढावा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याच्या बाजूला असलेल्या उकिरड्यावरील गोवर्‍यांमध्ये भर घालण्यासाठी लयबद्ध हालचाली करीत गोवर्‍या थापणारे मुके हात. घूँघट ओढून चेहर्‍यासोबत स्वत:चं अस्तित्वही कोंडून घेतलेल्या महिलांचे घोळके. शेतांमध्ये भांगलत असलेले आणि आतापर्यंत कुठल्याशा विनोदावर हसत-खिदळणारे पण बाहेरच्या माणसांची चाहूल लागताच अचानक शांत होणारे तरुणींचे घोळके. जनावरांच्या गोठ्यात, हिरव्यागार शेतात श्रमणार्‍या अशा बायका मी प्रथमच पाहत होतो असं नाही. हे चित्र आमच्या गावाकडेही दिसतं. पण देशाच्या राजधानीपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर गवताचे भारे वाहणार्‍या बायका दिसतील याचा विचार स्वप्नातही केला नव्हता.

पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या हेमराज या जवानाच्या कुटुंबीयांना महाराष्ट्रातून आलेले प्रमोद गायकवाड यांनी जमा केलेला निधी पोहोचवण्याच्या निमित्ताने या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. राजधानीपासून हाकेच्या अंतरावरची ही दुसरी दुनिया पाहून आश्चर्याचा जबर धक्काच बसला.

दिल्लीपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर शहीद हेमराजचे गाव आहे. कोसीकला या रेल्वेस्थानकापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत जायला खासगी वडाप मिळतात. पण नंतर गावापर्यंत वडापही जाऊ शकत नसल्याने पायीच तीन-चार किलोमीटर अंतर जावे लागते. या प्रवासात उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या संस्कृतीचा मिलाफ असणारी गावं लागतात. या गावांच्या शिवारातून जाताना एकीकडे गावाच्या कृषी संस्कृतीची जाणीव होत असतानाच पुरुषप्रधान संस्कृतीचा दर्पही नाही नाही म्हणता तुमच्या नाकापर्यंत पोहोचतोच.

एकीकडे गवताचे भारे वाहणार्‍या महिला, तर दुसरीकडे गावाच्या चौपालवर (चावडी) हुक्का ओढत धुरकट गप्पा मारणारे त्यांचे दादले. ‘या गावात फक्त बायकाच गवत आणतात का?’ चौपालांतून प्रतिप्रश्न आला, ‘मग काय आमच्या बायकांनी इथं बसून हुक्का ओढावा असं तुम्हाला म्हणायचंय काय? त्यांचं ते कामच आहे.’ ‘आणि मग तुम्ही काय करता?’ हा माझा प्रश्न येताच चौपालमधून पुन्हा एकदा डाफरणार्‍या स्वरात उत्तर आले, ‘आम्ही गावाचे काम पाहतो. तुम्ही शहरातली माणसं, तुम्हाला कळणार नाही. हुक्का प्यायचा असेल तर एक झुरका मारा आणि तुमच्या कामाला लागा.’

निरुत्तर होऊन आम्ही हेमराजच्या शेर खैरार या गावाकडे निघालो. या भागात आदिम काळापासून कृषक संस्कृती सुखेनैव नांदते आहे. दूरवर समतल प्रमाणातील लांबच लांब जमीन आणि त्यावर सळसळणारा हिरवागार गहू. अधूमधून पिवळ्याधम्मक फुलांचे शिरपेच ल्यायलेली आणि हळूच डोके वर काढणारी सरसो अर्थात मोहरी. मध्येच कुठेतरी मका तर कुठे ऊस. जोडीला भरपूर दुभती जनावरं. यामुळे या भागात सुबत्ता मुबलक प्रमाणात नांदते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

थोडं पुढं गेल्यावर एका आडमुठ्या वळणावर शेर खैरारकडे जाणारा रस्ता विचारावा म्हटलं तर माणूस कुठंच दिसेना. दूरवरून एक मुलगी येताना दिसली. नुकतंच तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या त्या सावळ्या मुलीला रस्ता विचारताच तिनं मोठ्या धिटाईनं रस्ता सांगितला. विचारलं, ‘तू शाळेत जातेस?’ ‘रस्ता असता तर गेले असते ना,’ असे तिचे उत्तर येताच पुढचे प्रश्न आपोआप पोटातल्या पोटात विरघळून गेले. ‘मगर भय्या जाता है. उसकी किताबें पढती हूँ,’ तिनं आपणहून नव्या जगाशी जोडलेल्या पुलाची ओळख करून दिली. तिचं कौतुक वाटलं आणि आम्ही खैरारकडे रवाना झालो.

तासाभराच्या प्रवासानंतर अखेर खैरारची शीव दिसू लागली. गावात प्रवेश करताच समोरून येणार्‍या चौकडीशी रामराम वगैरे झाल्यावर हेमराजचे घर विचारताच एक जण आमच्यासोबत निघाला. पाच मिनिटांच्या आत आम्ही हेमराजच्या घरासमोर येऊन पोहोचलो. वरवर सुखवस्तू दिसणारे हे कुटुंब घरात अचानक झालेल्या मृत्यूने घायाळ झालेले होते. हेमराजच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका खोलीच्या समोरच त्याचा एक फोटो लावलेला दिसला.

आम्ही हेमराजच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी आलो असल्याची माहिती अगोदरच मिळाली असल्यामुळे हेमराजच्या घरातील सर्व मंडळी अंगणात जमा झाली होती. हेमराजच्या शौर्याबद्दल आणि त्याचं शिर पाकिस्तानी सैनिकांनी पळवल्याच्या दु:खद घटनेबद्दल चर्चा चालू असतानाच घूँघट घेतलेली एक महिला अवघडल्यासारखं तिथं आल्याचं दिसलं. ही हेमराजची पत्नी. एकानं माहिती दिली. आमच्या लेकीसुना भर माणसांत येत नाहीत, पण तिच्यावर असा प्रसंग गुदरल्यामुळे तिला लोकांपुढे यावं लागतं. समोरच्या गर्दीतूनच माहिती आली. माझ्यासोबत आलेले प्रमोद गायकवाड यांनी वेळ न दवडता आपल्यासोबत आणलेला चेक तिच्याकडे सोपवला. थरथरत्या हातांनी तिने तो स्वीकारला. कॅमेर्‍याचे दोन-तीन फ्लॅश पडले. थोड्या वेळात एकही शब्द न बोलता हेमराजची पत्नी तिथून निघूनही गेली. पण त्याच्या दोन मुली आणि मुलगा आमच्या आसपास घुटमळत राहिला. ‘आमच्याकडे लवकर लग्नं होतात. जेव्हा ती आमच्या घरात आली तेव्हा पंधरा वर्षांची होती. लग्नाला सात-आठ वर्षे झाली तोपर्यंत हा प्रसंग तिच्यावर आला,’ हेमराजच्या भावाने दिलेली ही माहिती ऐकून मी हळूच त्याला विचारले, ‘एवढ्या कमी वयात बिचारी विधवा झाली हे वाईट. तिचं शिक्षण काही झालंय का?’ ‘चौथी पास है,’ त्याने माहिती पुरविली.
‘मग पुढं शिकवणार का?’ या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे त्याला क्षणभर सुचलं नाही. पण थोड्या वेळाने तो म्हणाला, ‘आमच्या बहू-बेटी घराचा उंबरा ओलांडत नाहीत. आणि आम्ही आहोतच की तिला सांभाळायला.’
मी पुन्हा एकदा निरुत्तर झालो. थोड्या वेळाने खैरारचा निरोप घेतला. अर्धवट गाडीवाटेचा रस्ता मागे टाकून आम्ही मोठ्या रस्त्यावर आलो. तासाभरात दिल्ली शहराची हद्द लागली. ऑफिसातून आपलं काम संपवून घाईघाईने मेट्रोतून परतणार्‍या महिलांचे घोळके पुन्हा एकदा दिसू लागले. फॅशनेबल विश्वात रमणार्‍या, कॉलेज आणि क्लासमधून परतणार्‍या तरुणी दिसू लागल्या. एका क्षणापुरती डोळ्यांसमोरून हेमराजच्या पत्नीच्या हाताची थरथर जाणवून गेली. गोवर्‍या थापणार्‍या हातातल्या काकणांची किणकिण आणि हिरव्यागार शेतात अचानक शांत झालेली तरुणींची खसखस कानावरून तरंगून गेली. आमची खरी दुनिया कोणती, हा प्रश्न अजूनही माझ्यासमोर आहे.
girishawaghade@gmail.com