आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहारगाथा : गोडाने सुरुवात करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील लेखामध्ये आहार वर्गीकरणाबद्दल माहिती बघितली. भारतीय आहाराचे आणखीही वेगळ्या प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. ते असे शुकधान्य (एकदल धान्य), शिम्बीधान्य, शाकवर्ग, मांसवर्ग, हरितकीवर्ग, कृतान्तवर्ग, तैलवर्ग, दुग्धवर्ग. या सर्व प्रकारचे अन्न मिळून आपली आहार संकल्पना तयार करण्यात आली आहे. आहार सेवन करत असताना पुढील मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते, ते म्हणजे आहाराचा प्रकार, आहार सेवन करण्याची वेळ, आहार मात्रा, आहार सेवन नियम, आहार शिजवण्याची भांडी, विरुद्ध अन्न.
आहाराची योग्य वेळ : भूक हे प्राकृत व्यक्तीचे स्वाभाविक लक्षण आहे. पूर्वीचा आहार पचल्यानंतर आपण दोनच वेळा आहार घेणे अपेक्षित आहे. सकाळचा आहार मलमूत्र विसर्जन केल्याशिवाय घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहे. सकाळचे जेवण स्नानापूर्वी करू नये, यापाठीमागेही काही वैज्ञानिक कारणे आहेत. जेवण झाल्यावर बहुतांश रक्तपुरवठा आतड्यांकडे गेलेला असतो. स्नान केल्यानंतर शरीराच्या सूक्ष्मकेशिका विस्फोट पावतात व रक्तपुरवठा सर्वदूर होत असतो. जेवून स्नान केल्यानंतर स्नानाचे यथायोग्य परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे स्नानामुळे येणारा ताजेपणा, शरीरातील हलकेपणा, प्रसन्नता जाणवत नाही. जेवणानंतर स्नान केल्याने आमाशयाकडे रक्तपुरवठा अल्प प्रमाणात होतो व पचन व्यवस्थित होत नाही.
वरील वर्णनाप्रमाणे आपले मुख्य आहार दोनच असावेत व मुख्य आहारामध्ये दोन अल्प आहार असावेत. मुख्य आहार व अल्प आहार यामध्ये किमान तीन तासांचे व जास्तीत जास्त सहा तासांचे अंतर असावे. जेवण आल्यावर तीन तासांच्या आत खाल्ल्यास अध्यशन ठरते व प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने अत्यशन ठरते. यामुळे पचन खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे भूक लागली असतानाच आहार घ्यावा. खरी भूक आणि खोटी भूक यांची लक्षणे ओळखण्याची साधने भारतीय आहारशास्त्रात वर्णन केलेली आहेत.
आहाराची मात्रा : आहाराची मात्रा वर्णन करत असताना आमाशयाचे चार भाग गृहीत धरून 1/2 भाग आहाराने, 1/4 भाग पाण्याने व 1/4 रिकामा ठेवणे अपेक्षित आहे. यावरून एक गोष्ट निश्चित लक्षात येते की, आहार आपल्या आहारसेवन क्षमतेच्या निम्माच असावा.
आहार सेवनाचे नियम : भारतीय आहारशास्त्रात आहार सेवनाचे नियम अतिशय शास्त्रीय व रंजक वाटतात.
आहारसेवन करताना पचावयास जड असणारे पदार्थ, गोड पदार्थ आहाराच्या सुरुवातीस घेणे अपेक्षित आहे. याचे महत्त्वाचे कारण असे की, गोड व पचावयास जड पदार्थ भूक लवकर शमवतात व मस्तकातील समाधान केंद्राचे प्रद्युपन होऊन जेवण झाल्याचे लवकर समाधान होते. तसेच भूक लागलेली असताना आमाशयात पाचक स्राव व्यवस्थित स्रवित झालेले असतात व त्या वेळी जड अन्न व्यवस्थित पचन होते. म्हणूनच गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीस खाणे योग्य आहे.
व्यवहारात सर्व लोक पोटभर जेवण झाल्यानंतर शीत व गोड पदार्थ खातात, ज्यांचे सूक्ष्म पचन व्यवस्थित होऊ शकत नाही, त्यामुळे विविध आजार होऊ शकतात. याचाच दुसरा अर्थ असा की, जेवणाच्या मध्ये आणि नंतर भाज्या व कोशिंबिरी खाणे अपेक्षित आहे. व्यवहाराच्या नावाखाली आपण सॅलड्स व सूप्ससारखे पदार्थ आधी सेवन करतो व गोड पदार्थ नंतर सेवन करतो, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. (क्रमश:)
sangitahdesh@rediffmail.com