आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशिक्षित की सुसंस्कृत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संध्याकाळची वेळ. कॉलेज रोडला भाजी घेण्याच्या निमित्ताने फेरफटका मारावा म्हणून घराच्या बाहेर पडले. नेहमीप्रमाणे ओळखीच्या दोन-तीन व्यक्ती भेटल्या. त्यांना स्मितहास्य देत भाजीवाल्याच्या गाडीपुढे येऊन केव्हा उभी राहिले कळलंच नाही.
शेजारीच एक तरतरीत चांगली सुशिक्षित तरुणी उभी होती. ओली हळद पाहून भाजीवाल्याला, ‘अहो बाबा, हे काय आहे?’ म्हणून विचारत होती. मीच तिला चटकन उत्तर दिलं, ‘अहो, ही ना ओली हळद आहे’. माझ्या नेहमीच्या बोलघेवड्या स्वभावामुळे त्याचे उपयोग, त्याच्या पाककृती सांगण्याच्या मूडमध्येही आलेच होते; पण तेवढ्यात आमच्या मागे जोरात एक स्कूटर येऊन धडकली.
खरं सांगू का? जेव्हापासून टीव्हीवरील भविष्यावरचे कार्यक्रम पाहायला लागले आहे तेव्हापासून नवीन माणूस व ज्याच्यात काही विशेष आढळले की, माझ्या विचारांची शृंखला आपोआपच सुरू होते. ही व्यक्ती कोणत्या राशीची असेल वगैरे वगैरे. माझ्या मागे स्कूटरवरून उतरणारी ती स्मार्ट तरुणी मला सिंह राशीचीच वाटली.
ही तरुणी माझ्या शेजारच्या युवतीची मैत्रीण होती, हे त्यांच्या संभाषणावरून लवकरच लक्षात आलं. ती थोड्या रागात व अधिकारीवाणीतच मैत्रिणीला म्हणाली, ‘काय गं, काल भिशीला यायचं नव्हतं तर तुला आधी कळवायला नको होतं का? एक तर आमची म्हातारी सध्या आजारी (म्हातारी म्हणजे बहुधा सासू असावी), त्यामुळे सगळं मला एकटीलाच करावं लागलं आणि त्यात तू अन् ती मीनल दोघीही गैरहजर.’
माझ्या शेजारची तरुणी मला हिच्यापुढे जरा सौम्य व शांत स्वभावाची जाणवली. मला वाटतं, कर्क राशीचीच असावी.
‘अगं नेहा, माझ्या सासºयांची प्रकृती जरा बरी नव्हती आणि सासूबाईपण गावाला गेल्या आहेत. त्यांची जेवायची वेळ तीच असल्यामुळे मला नाही बाई जमलं यायला.’
‘त्यात काय, अगं त्या म्हाताºयाचं ताट वाढून ठेवायचं ना टेबलावर. तुम्ही बाई फार पुढेपुढे करता... अशाने तुला एन्जॉय करताच येणार नाही भिशी.’
मी कशीबशी भाजी पिशवीत टाकली. या सगळ्या संभाषणामुळे मला अंतर्मुख व्हायला झालं व मी घरीच निघाले. चालताना माझ्यातली सूनही जागी झाली.
मागचा 38 वर्षांचा फ्लॅशबॅक माझ्यासमोरून सर्रकन निघून गेला. मी माझ्या सासू-सासºयांची एकुलती एक सून होते. माझे सासू-सासरे म्हणजे देवमाणसं म्हणावी लागतील. माझे सासरे वारल्यानंतर माझा मोठा भाऊ भेटायला आला होता. निघताना माझ्याकडे बघूनच म्हणाला, ‘ये मग पुढच्या महिन्यात.’ (दरवेळी मी व माझ्या मुलीच माहेरी एकट्या जात असू.) जवळच उभ्या असलेल्या माझ्या त्या तडफदार सासूबार्इंकडे पाहून का कुणास ठाऊक त्या वेळी त्या मला पोरक्या व असहाय वाटल्या. माझं संवेदनशील मन जागं झालं, ‘अरे, आता मी यांना एकटं टाकून जाऊ शकणार नाही.’ त्यानं नंतर सावरून घेतलं, ‘अगं, अक्कांनाही घेऊन ये.’ त्या वेळी मी त्याची खरीखुरी लेक आहे हे मलाच जाणवलं.
दोन दिवसांनंतर माझी कामवाली कामावर हजर झाली. दमल्यामुळे म्हणा की मला न सांगता घरी राहिल्यामुळे म्हणा, मी थोड्या चढ्या आवाजातच तिला विचारलं, ‘काय गं, कळवलंही नाहीस तू येणार नाहीस म्हणून.’
‘अहो ताई, काय सांगू, आमच्या मीनाबाईला दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं होतं. त्यांच्या सगळ्या तपासण्या केल्या.’
ही मीनाबाई म्हणजे कामवालीची 10-11 वर्षांची नणंद बरं का. आता सांगा या एवढ्या छोट्या मुलीलासुद्धा माझी कामवाली अहो-जाहो या आदराच्या भाषेतून संबोधत होती. दोन दिवसांपूर्वीचा भाजी घेतानाचा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून गेला. स्कूटरवरची तरुणी आपल्या पितृतुल्य सासºयांबद्दल असे उद््गार काढत होती. आता या माझ्या कामवालीला मी सुसंस्कृत म्हणू की त्या शिकलेल्या तरुणीला?
दोन महिन्यांपूर्वीच सोलापूरच्या एका बार्इंचा व्याख्यानाचा कार्यक्रम मंडळात ठेवला होता. ‘नाती कशी जपावी’ हा विषय होता. त्यांनी आपले परखड विचार मांडताना म्हटलं की, मुलींना शिकवूच नका, शिक्षणाने त्यांचा उद्दामपणा व बेदरकार वृत्ती वाढते आहे. यावर आमच्या भगिनींनी मागून थोडी चर्चाही केली; पण ही अशी मानसिकता आजच्या तरुणींमध्ये वाढतच चालली आहे. आजचं उच्च शिक्षण (पुस्तकी शिक्षण) माणसाला केवळ सुशिक्षित व पोटार्थी बनवत आहे. शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत करण्याचं, शाळा- कॉलेजमध्ये शिकत असतानाच मुलींच्या मानसिक प्रगल्भतेच्या वाढीला खतपाणी घालायचं काम हे पालकांचं मुख्य कर्तव्य आहे.
आम्ही धूमधडाक्यात महिला दिन साजरा करतो. आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढतो आहोत, हे सगळं त्या त्या ठिकाणी योग्यच आहे; पण आपण आपल्या जबाबदाºया, आपलं माणूसपण जपायला नको का? प्रसंगानुरूप झाशीची राणी व्हा; पण आपल्यातली क्षमाशीलता, प्रेमल, सात्त्विक भावही टिकवून ठेवा.
फक्त सुशिक्षित न राहता सुसंस्कृतही बना.