आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो, ऐकलं का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ किती बदलला ना! स्त्रीच्या एकूण व्यक्तिमत्त्वात किती बदल झालाय. तिला किती स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे तिचं आयुष्य किती बदललं. आजीच्या काळातील वातावरण आणि आता माझ्या येणार्‍या सुनेच्या वेळेचं वातावरण यात केवढा फरक पडलाय. ‘कालाय तस्मै नम:’

मी शेवटची पोळी तव्यावर टाकली आणि नवर्‍याला जेवायला हाक मारली. ‘मिलिंद, जेवायला येतोस ना?’ माझा मुलगा आधीच येऊन बसला होता. तो हसला आणि म्हणाला, ‘आई, आत्ता तू बाबांना जशी हाक मारलीस, तशी आजी आजोबांना कशी बोलावतेस? आणि अक्काआजी (माझी आजी) पणजोबांना कशी बोलवायची, ते सांग ना!’ त्याच्या या वाक्याने माझं मन एकदम अक्काच्या काळात गेलं आणि मग आमचा दोघांचा एक छान खेळच सुरू झाला.
70-80 वर्षांपूर्वीचा काळ. एका खेड्यात माझे आजीआजोबा राहतात. आजी नऊवारी साडी, खणाची चोळी, मोठा अंबाडा, मेणावर लावलेलं लालभडक मोठं कुंकू, कुड्या, गोठ, पाटल्या, काचेच्या बांगड्या, भलंथोरलं मंगळसूत्र, बोरमाळ अशा वज्रचुडेमंडित स्थितीत. स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून आजोबांना जेवायला बोलावतेय. ‘इकडून जेवायला चलावं, पाटपाणी घेतलंय!’
आजोबा बाहेरच्या सोप्यात आहेत. ते खाली तक्क्याला टेकून समोरच्या तिरक्या डेस्कवर काहीतरी लिहीत बसले आहेत. त्यांनी पांढरेशुभ्र धोतर नेसले आहे. त्यावर अंगात बंडी आहे. कपाळावर उभे नाम आहे.
मुलाला हे सांगता सांगता मी माझ्या आजोळी जाऊन पोचले होते. तोही कल्पनेने त्या काळात गेला होता.
आता हे माझ्या आईबाबांचं घर आहे. हे थोडं मोठं गाव आहे. आई पाचवारी साडी, मॅचिंग ब्लाउज, पाठीवर एक वेणीचा शेपटा, कपाळावर कुंकवाची टिकली, हातात सोन्याची एखादी बांगडी, गळ्यात साधंसं मंगळसूत्र. मधल्या खोलीच्या दारात उभी राहून बाबांना जेवायला बोलावतेय, ‘अहो, ऐकलंत का? जेवायला चला, पानं घेतली आहेत.’ बाबा बाहेरच्या खोलीत, सोफ्यावर किंवा दिवाणावर पेपर वाचत बसले आहेत. त्यांनी विजार किंवा लुंगी आणि वर बनियन घातले आहे.
मी मुलाकडे पाहिले, तो हसत होता. मी आमचा खेळ पुढे चालू केला.
आता आपण माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊया. ती खूप मोठ्या शहरात राहते. एका कंपनीत नोकरी करते. माझी ही मैत्रीण, मुग्धा- पंजाबी ड्रेसमध्ये आहे. केसाला पिन, एका हातात घड्याळ, दुसर्‍या हातात एखादी बांगडी किंवा कडं, कानातलं छोटं, ड्रेसला मॅचिंग, गळ्यात अगदी छोटं, फॅशनेबल मंगळसूत्र. किचनमधून नवर्‍याला हाक मारते, ‘सुनील, जेवायला चल. पान वाढलंय.’ सुनील बाहेरच्या हॉलमध्ये टीव्ही पाहतोय. त्याने ट्रॅकपँट, वर टीशर्ट घातलाय!
मी मुलाकडे बघून हसले. तो म्हणाला, ‘आता यापुढचं
मी सांगतो.’
‘हे माझं घर आहे. हे फॉरेनमधलं एखादं शहर असेल. माझी बायको जीन्स, टीशर्ट, केसाचा छोटा कट, हातात-गळ्यात-कानात काही असेल नसेल. ती हॉल किंवा आमच्या बेडरूममध्ये लॅपटॉपवर काम करत बसली आहे. ती मला म्हणजे नवर्‍याला जेवायला बोलावेलच असं नाही. कदाचित मलाच स्वयंपाक करून तिला बोलवावं लागेल. ए, चल ना, मी कधीचा जेवायसाठी तुझी वाट बघतोय!’
आम्ही दोघेही मस्त हसत सुटलो. पण माझ्या मनात विचार सुरू झाले. खरंच, काळ किती बदलला ना! स्त्रीच्या एकूण व्यक्तिमत्त्वात किती बदल झालाय. तिला किती स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाच्या खूप संधी आजच्या स्त्रीला मिळाल्या, त्यामुळे तिचं आयुष्य किती बदललं. आजीच्या काळातील वातावरण आणि आता माझ्या येणार्‍या सुनेच्या वेळेचं वातावरण यात केवढा फरक पडलाय. ‘कालाय तस्मै नम:’ असं म्हणून आम्ही जेवायला बसलो.