आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळशी सुपर मॉडेल

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कष्ट न करताही जास्तीत जास्त यश, प्रसिद्धी मिळावी असं वाटणारी माणसं सगळीकडेच दिसतात. कॉमर्सच्या दुसर्‍या वर्षात शिकणारी रुही अशाच काही लोकांपैकी एक. सुपरमॉडेल म्हणून आपल्याला प्रसिद्धी मिळावी, मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपलं नाव व्हावं, हे तिचं स्वप्न. मात्र स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मनापासून कष्ट करावे लागतात, हे तिच्या गावीही नव्हतं. घरी सकाळी आरामात उठावं, आरशासमोर तासन्तास उभं राहून छानपैकी तयार व्हावं, त्यानंतर कॉलेज कँटीनला जाऊन मित्रमैत्रिणींसोबत गप्पा माराव्यात हा तिचा नित्यक्रम. कॉलेजमधून घरी आल्यानंतरही मोबाइल तिच्या कानाशी चिकटलेलाच असे. शिवाय दिवसभराच्या अशा धावपळीनंतर रात्रीचा वेळ फेसबुक आणि चॅटिंगसाठी तिने राखून ठेवला होता. आणि तिच्या दिवसभराच्या गप्पा तरी कोणत्या, तर लेटेस्ट फॅशन, मॉडेलिंग, लो कॅलरी फूड आणि ब्यूटी टिप्सच्या. मॉडेल होण्याचं स्वप्न असल्यामुळे रुहीनं पहिल्यापासून अगदी काटेकोरपणे डाएट फॉलो केलं होतं. पिझ्झा, बर्गर, चिप्ससारखं जंक फूड म्हणजे तर तिचा जीव की प्राण. घरचं जेवण म्हणजे वजन वाढण्याला आमंत्रण असा तिचा ठाम समज होता. त्यातच बिझी शेड्यूलमुळे तिला योगासनं आणि इतर व्यायामासाठी वेळच मिळत नसे. त्यामुळे वाढलेल्या वजनाने तिची झोप उडवली होती. काटेकोरपणे डाएट फॉलो करूनही वजन का वाढतंय हे रुहीला समजत नव्हतं. वाढत्या वजनामुळे कॉलेजमध्ये ऐकावे लागणारे टाँट तिला असह्य होत होते. आपल्या मनासारखं वजन आणि सुंदर चेहरा दिसावा म्हणून तिने कितीतरी आरसे बदलून पाहिले होते. पण आरशात सुंदर दिसण्यासाठी मुळातच आपला बांधा कमनीय असावा लागतो हे तिला समजलेच नाही. तिचं जंक फूड खाणं, व्यायामासाठी वेळ न काढण्याबद्दल तिच्या पालकांनी तिला कितीदा तरी समजावलं होतं. मात्र कुणाचंही ऐकण्याची सवयच नसलेल्या रुहीला त्यांचं बोलणं कंटाळवाणं वाटायचं. रुही आपल्या पालकांच्या सल्ल्याकडे कायम दुर्लक्ष करायची. आपल्याला सगळं काही समजतं असंच रुहीला वाटायचं. कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडायचं असेल तर नट्टापट्टा आणि सुंदर कपडे घालूनच बाहेर पडायचे असा तिचा अट्टहास होता. मग ते कॉलेजमध्ये जाणं असो किंवा एखाद्या मॉलमध्ये. आठवड्यातून एकदा तरी ब्यूटी पार्लरची वारी केल्याशिवाय तिला चैनच पडत नसे.
आळशी आणि आरामात आयुष्य व्यतीत करण्याची आवड असलेल्या रुहीला आणखी एक गोष्ट आवडायची. सोफ्यावर लोळत निवांतपणे टीव्हीवरचे फॅशन आणि मॉडेलिंग शोज पाहण्याची. त्या मंगळवारी रुही अशीच टीव्ही पाहत बसली होती. तिच्या आवडत्या फॅशन चॅनलवर तिच्या फेवरिट मॉडेलचा इंटरव्ह्यू सुरू होता. रुही अगदी मन लावून तो टॉक शो पाहत होती. हाय फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या सौंदर्याचं रहस्य जाणून घ्यायचंय, तुम्हालाही माझ्यासारखं सुंदर दिसायचंय का? टीव्हीवरच्या मॉडेलनं प्रेक्षकांकडे बघत प्रश्न विचारला.
हो-हो. आय वाँट टू बी लाइक यू! सोफ्यावर लोळत पडलेल्या रुहीने आनंदाने उडी मारली.
माझ्यासारखं दिसण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देते. रोज सकाळी लवकर उठून व्यायामासाठी वेळ द्या, बाहेर बनवलेलं अन्न खाण्याऐवजी घरच्या जेवणाला प्राधान्य द्या. उत्तमोत्तम साहित्य वाचण्यासाठी आवर्जून वेळ काढा. आपण वाचलेल्या पुस्तकांविषयी मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करा. दिवसातल्या प्रत्येक क्षणाचं योग्य नियोजन करा आणि आनंदी राहा. आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायला शिका. मग बघा, आयुष्य किती सुंदर वाटायला लागेल. आनंदी राहण्यामुळे आपोआपच तुमच्या चेहर्‍यावर एक चमक येईल. आहे की नाही सोपा उपाय, सुंदर दिसण्यासाठी? टीव्हीवरच्या मॉडेलनं सोप्या भाषेत हेल्थ-ब्यूटी टिप्स शेअर केल्या. रुही आश्चर्यचकित होऊन त्या फेमस मॉडेलचं बोलणं ऐकत होती. काय झालं असेल पुढे?
gnosis@rediffmail.com
वो सत्तर मिनट
छोटे उस्ताद
लक्षात नसलेला बाप