आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षात नसलेला बाप

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबा हा विषय आपल्यासाठी बर्‍यापैकी दुर्लक्षित असतो. त्या माणसाला काही भावना असतात, त्यालाही आपल्याशी बोलायचं असतं, हे आपण विसरूनच गेलेलो असतो. अर्थात त्यालाही पर्याय नाही. मुलांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी, त्यांना हवं ते देण्यासाठी त्याची जी झटापट चाललेली असते, ती आपल्या आकलनापलीकडची असते. मी आणि माझे दादा (बाबा) किती वेळा बोललो असू? किती वेळा आम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या असतील? खरे सांगायचे, तर अजिबात आठवत नाही. कदाचित एखाद-दुसर्‍या वेळी किंवा कधीच नाही. वडलांचे महत्त्व मुले समजू शकत नाहीत. काही मुले समजून घेतही असतील. पण बोटांवर मोजण्याइतकेच. पण प्रत्येक बाप मुलांचे म्हणणे समजून घेतो. पण त्याच बापाविषयी कोणी बोलत नाही, लिहीत नाही ही एक विरोधाभासाची गोष्ट.
माझा आजपर्यंतचा प्रवास काही सरळ झालेला नाही. अनेक खाचखळगे होते त्या प्रवासात. नोकरीनिमित्त मी घराच्या बाहेर पडलो आणि गाठलं थेट गुजरात. तिथं ना कोणी ओळखीचे ना नात्याचे. उठलो आणि चालू लागलो. दादा (बाबा) सोडायला आले होते. एक दिवस तिथं थांबले होते. मला सोडून निघताना ना ते काही माझ्याशी बोलले, ‘येतो. काळजी घे. आईला फोन कर, पत्र लिही.’ बास एवढंच.
पण त्यात कितीतरी सामावलं होतं. याची जाणीव खूप उशिरा झाली. माझ्या फोनची वाट तेच जास्त पाहायचे हे मला नंतर समजलं. आपण एकटं राहिलं ना, की वडलांची किंमत समजते. हे खूप खूप खरं आहे. बाप नावाच्या माणसाचा आपल्याला किती आधार असतो, हे तेव्हा समजतं. आता जे काही करायचं, ते तुझं तूच, अशी वेळ आली की बाप उमजायला लागतो. माझंही तसंच झालं असावं. तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. आज जेव्हा आम्ही नोकर्‍या करतोय, कमावतोय आणि त्यांच्या त्या वयातल्या पगाराच्या दुप्पट, तिप्पट पगार घेतोय, तरीदेखील आमच्यासमोर अडचणी आहेत. मार्ग कसा काढावा सुचत नाही. मग लक्षात येतं. मग दादा तेव्हा काय करत असतील? आज कमावणारे जास्त आणि अवलंबून असणारे कमीत कमी. तेव्हा नेमकी उलट परिस्थिती. कमावणारा एक आणि अवलंबून असणारे कितीतरी.
दादांचं उशिरापर्यंत आडतीत काम करणं, कधीतरी चिडचिड करणं, घरात भावंडांशी भांडणं केल्यामुळे लगावलेली झापड, मी अभ्यास करत नाही म्हणून होणारी त्यांची तगमग, शाळेत एखादं बक्षीस मिळाल्यावर त्यांना होणारा आनंद, नोकरीला दूर लागल्यामुळे त्यांनी आनंदाने आणून दिलेला मोबाइल, वेळोवेळी मी म्हणेन त्या क्लास व कॉलेजच्या, परिस्थिती नसताना, भरलेल्या फिया आणि मी त्या सार्‍या गोष्टी अर्ध्यावर सोडून दिल्यानंतर त्यांना आलेली हताशता, हे सारं आता डोळ्यासमोरून जातं. आपण दादांना किती मनस्ताप दिला, हे आता जाणवतं.
आपण सार्‍यांनीच आपल्यासाठी सतत झिजणार्‍या या माणसाला कधीतरी सांगायलाच हवं की, ‘दादा, मला अभिमान आहे, मी तुमचा मुलगा आहे.’ न बोलता मायेची पाखर घालणार्‍या बाबांच्या पायावर डोकं ठेवून एकदा तरी मनसोक्त रडायला हवं, ते त्यांच्यासाठी नाही, तर आपल्याचसाठी. त्यांच्या दृष्टीने हा काही व्यवहार नाही. मुलांसाठी जे करायचं, ते केलंच पाहिजे, हा त्यांचा विचार असतो; पण मुलांचं म्हणून काही कर्तव्य आहे की नाही?
आजही आम्ही सारे एकत्र राहतो. आमचे कुटुंबप्रमुख दादाच आहेत. अजूनही त्यांचं-माझं बोलणं फारसं नाही, पण एकमेकांचे भाव जाणतो. आणि त्यांच्या अस्तित्वाविना मी अपुराच आहे...
मुलांनी आपल्या वडलांचे महत्त्व समजून जगायला हवे. वृक्ष कितीही मोठा झाला आणि जर त्याच्या मुळ्या कापल्या गेला तर तो टिकू शकत नाही. जीवनाचे गणितही असेच आहे हे प्रत्येकाने ओळखून जगायला हवे.
छोटे उस्ताद
वो सत्तर मिनट
सत्यमेव जयते