आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळची अत्यंत घाई-गडबडीची वेळ. कसंही करून दहाच्या आतऑफिस गाठायचं असतं ना. पण दहा वेळा सांगूनही हंसाबाई वेळेवर घरकामाला येत नाही. म्हणते कशी, ‘अवं ताई, घड्याळ मला कळत नाही. घरातील कामं आटोपली की येत असते तुमच्याकडं.’ ‘अगं बाई, नोकरी करणाºयांना इथे मिनिटामिनिटाचा हिशोब असतो.’ हंसाचं घर मला माहीत होतं. एका आलिशान बंगल्याच्या आउटहाउसमध्ये ती राहत असे. संसाराला हातभार म्हणून खानावळही चालवत असे.
तिच्या घराच्या खिडकीतून मी आत डोकावले अन् ते दृश्य पाहून माझे मन एकदम चरकले. आठ वर्षांची तिची छकुली पलंगावर पालथी झोपून हनुवटीवर हात टेकवून टीव्ही पाहत खिदळत होती आणि पंचविशीचा तो तिच्या शरीरावरून हात फिरवत होता. ओणवे होऊन तिच्याशी बोलत होता. मी मोठ्याने ‘हंसा’ अशी हाक मारताच तो भांबावला आणि एकदम बाजूला झाला. मी काहीच न पाहिल्यासारखे दर्शवले.
त्या दिवशी हंसा कामाला आली. मी तिला एकदम म्हणाले, ‘छकुलीलाही बरोबर घेऊन येत जा. एकटीला घरी नको ठेवत जाऊस गं.’ हंसा म्हणाली, ‘लेकराची जात, ती खेळत राहते घरात.’ ‘हंसा, अगं कोण गं होता काल तुझ्या घरी? तो तर समोरचा गिरणीवाला होता ना!’ ‘हो. अवं ताई माझ्याकडे त्याने खानावळ लावली आहे. सकाळी येतो डबा घ्यायला...’ तिकडे दळणाला आलेल्या गृहिणी त्याची वाट पाहत खोळंबून राहतात आणि हा हंसाच्या घरी असतो ती घरी नसताना. त्याला असे दोन-तीन वेळा पाहिल्यावर मी न राहवून हंसाला विश्वासात घेऊन सांगितले. ‘हंसा, जशी माझी लेक तशी तुझी लेक गं. निष्पाप निरागस कळी आहे ती. उमलण्यापूर्वीच कुसकरायला नको. तिची काळजी घेतली पाहिजे ना...’ आज पहिल्यांदा हंसाच्या लक्षात आले. दुसºया दिवशी तिने पाळत ठेवली. कामाला जाते सांगून अचानक घरी आली तर तो होताच तिच्या लेकीजवळ. हंसा त्याला म्हणाली, ‘हे घे तुझे उरलेले पैसे. महिनाभराचे पैसे भरले होते ना. उद्यापासून तुझा डबा बंद...’ हे सांगताना तिचा संताप-संताप होत होता. छकुलीला कुशीत घेऊन ती बसली होती. किती अजाण पोर आहे ही! काही झाले असते तर... मीही नि:श्वास टाकला. बरंय गं हंसा तू पेपर वाचत नाहीस ते. कसल्या कसल्या हिडीस बातम्या असतात. माणसाचा अंगरखा पांघरलेले ‘पशू’ असतात हे. संध्याकाळी नवरोबाला मी माझी समाजसेवा सांगितली.
त्याने मला झाप-झाप झापले. उद्या तो गिरणीवाला माझ्यावर काट धरेल वगैरे वगैरे. मीही सरसावून म्हणाले, ‘माझं काहीच चुकलं नाही. हीच समाजाची निष्क्रिय, उदासीन वृत्ती गुन्हेगारांना पोषक ठरत असते. ‘मला काय घेणं-देणं’ या वृत्तीमुळे वाईट गोष्टींना थारा मिळत जातो.’ त्याला माझी काळजी वाटत होती. आणि मग अभिनेता आमिर खान दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ मालिका पाहिल्यावर ती धावतच माझ्याकडे आली. बाल लैंगिक शोषणाचा प्रश्न आमिरने संवेदनशीलतेने हाताळला होता. हंसाचा एकदम गळा दाटून आला. ‘ताई, माझ्या लेकराबरोबर असंच काहीतरी वंगाळ घडलं असतं. पण तुमच्यामुळे ती वाचली. विचारही करवत नाही.’
अशी सावधानता सर्व सुजाण नागरिकांनी दाखवली पाहिजे. एकजुटीने लढा देत अशा विकृत लोकांना वाळीत टाकले पाहिजे.’ बराच वेळ आम्ही बोलत होतो. हंसा घरी निघून गेली. संध्याकाळी यांनी तीच मालिका पाहिली. त्यातला
संदेश ऐकून त्यांनी माझ्याकडे एकदम पाहिले... अतीव समाधान आणि अभिमान ठासून भरला होता त्या नजरेत!
swtpachpande@gmail.com
छोटे उस्ताद
वो सत्तर मिनट
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.