आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन देता का स्मार्टफोन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन वा मोबाइल हा स्त्रिया व पुरुषांमधला भेद कमी करणारा घटक म्हणून जगभर ओळखला जातो. आणि भारतात मात्र या मोबाइलने हा भेद अधिक ठळक केला आहे. 
एकूण ४३ टक्के पुरुष स्मार्टफोनधारक आहेत, पण फक्त २८ टक्के स्त्रियांकडेच स्मार्टफोन आहेत.

मोबाइल फोन आणि स्मार्टफोनमध्ये म्हटलं तर फरक फार नसतो. दोघांचंही मुख्य काम असतं दोन व्यक्तींमध्ये संभाषण घडवून आणणं. हे संभाषण आवाजाच्या मार्फत होतं (फोन कॉल) किंवा लेखी शब्दांच्या (एसएमएस). साधा, स्मार्ट नसलेला मोबाइल फक्त ही दोन कामं करू शकतो. इंटरनेटच्या जगड्व्याळ व्यापात प्रवेश करून देणारा स्मार्टफोन मात्र यापेक्षा अनेक गोष्टी साध्य करतो, सोप्या करतो, स्वस्तात करतो, कमी वेळेत करतो. ही कामं कोणाची आहेत, यावर काहीच अवलंबून नसतं, स्मार्टफोन ज्या व्यक्तीच्या हातात ती व्यक्ती ही कामं करू शकते. पण, हा स्मार्टफोन अजूनही भारतातल्या बहुतांश स्त्रियांपर्यंत पोहोचलेलाच नाही. किंबहुना, तो त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलेला नाही. त्यांच्या घरातल्या वडीलधाऱ्या पुरुषमंडळींनी. 

-स्मार्टफोन हातात आला की ती मित्राशी गप्पा मारू लागेल.
-स्मार्टफोन हातात आला की ती मित्राबरोबर पळून जाईल.
-स्मार्टफोन हातात आला की ती काहीतरी लाजिरवाणी गोष्ट करेल व घराण्याची इज्जत धुळीला मिळेल.
-स्मार्टफोन हातात आला की ती त्यातच वेळ घालवेल आणि घरातली कामं होणार नाहीत.
-स्मार्टफोन हातात आला की ती गाणी ऐकत रस्त्यातनं चालेल आणि तसं करणं वाईट आहे.
 
खरं वाटत नाही? : भारतात मोबाइल फोन वापरणाऱ्या पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या प्रचंड कमी आहे, स्मार्टफोन वापरणाऱ्या स्त्रियांची त्याहून कमी. 
 
यामुळे काय होतंय? : स्मार्टफोनचा वापर करून जी कामं पुरुष करू शकतात, ती या स्त्रियांना करता येत नाहीत. 
 
कोणती असतात ही कामं? : गूगल वापरून माहिती मिळवणं. ही माहिती एखादा आजार, एखाद्या व्यक्तीचा/कार्यालयाचा/हाॅटेलचा/डाॅक्टरचा संपर्क, दोन ठिकाणांमधलं अंतर, रेल्वे/बस/विमानाची तिकिटं, बँकेतल्या खात्याची स्थिती, हवामानाचा अंदाज, शेतमाल वा इतरही मालाचा बाजारभाव, मार्केटिंग, शेअर मार्केट, ताज्या घडमोडी/बातम्या, या व इतर कोणत्याही विषयाशी संबंधित असू शकते. हातात फोन असणाऱ्या पुरुषांना ती सहजसाध्य असते. 
 
नोकरी शोधणं : नोकरीविषयक माहिती देणारी अनेक अॅप/वेबसाइट स्मार्टफोन जवळ नसल्याने या स्त्रियांच्या आवाक्याबाहेर राहतात. परिणामी त्यांना नोकरी मिळण्याची संधी कमी होते.
 
कौशल्यशिक्षण : पाककृती, क्विलिंग, परभाषा, गणित, दागिने, शिवण/भरत/विणकाम, रंगकाम, सुतारकाम, इलेक्ट्रिशियनचं काम, साॅफ्टवेअर, फोटोग्राफी, चित्रपट, भटकंती, फॅशन अशी शेकडो कौशल्यं आज स्मार्टफोनमुळे शिकता येतात. ‘हाउ टू?’ असा प्रश्न गूगलबाबाला विचारला की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळतं. 
 
पण तेही कुणाला, तर पुरुषांना. कारण त्यांच्या हातात स्मार्टफोन आहे. तरी आपण खरेदीकडे वळलोच नाहीयोत अजून. खरेदीही महत्त्वाची आहेच की. आज अनेक अॅप्सच्या माध्यमातून स्वस्त व उत्तम दर्जाच्या वस्तू घराबाहेर न पडता विकत घेता येतात, विकताही येतात. परंतु ही अॅप्सही स्त्रियांसाठीनाहीतच.
 
मुलगे बारा-चौदा वर्षांचे झाले की, त्यांच्या हातात मोबाइल खेळू लागतात. एकाच घरातल्या मुलांकडे मोबाइल असतो व मुलींना तो दिला जात नाही. मुलगे किती वेळ त्यावर बोलतात, कोणाशी चॅट करतात, काय पाहतात याकडे कोणाचंही लक्ष नसतं. पण मुलींना मात्र मोबाइल नको, कारण ती वाया जाण्याची भीती वाटते. आपल्याकडच्या अनेक राजकारण्यांनी यावर मजेशीर वाटावी अशी संतापजनक वक्तव्यं केलेली आहेत. मुलींनी जीन्स घालू नयेत, मोबाइल वापरू नयेत, नोकरी करू नये, अमुक ठिकाणी जाऊ नये, तमुक वेळेत घरी परत यावं असे अनेक नियम आज गावातल्या व शहरातल्या अनेक घरांमध्ये दिसतात. मुली सुरक्षित राहाव्यात, असं कारण त्यासाठी दिलं जातं.
 
पण सुरक्षित कोणापासून? त्यांच्याच मित्रांपासून, नातलगांपासून, शेजाऱ्यांपासून? : मोबाइल न वापरणाऱ्या मुली सुरक्षित आहेत, त्यांना शारीरिक/मानसिक हिंसाचाराला बळी पडावं लागत नाही, असं आहे का?
 
अशा कौशल्यांमध्ये मागे असलेल्या, स्वत:च्या पायावर उभं राहण्यात अडचण असणाऱ्या, योग्य संभाषण न करता येणाऱ्या मुलींच्या हातात आपल्या देशाचं भवितव्य असणार आहे. आधीच गेल्या काही वर्षांत अर्थार्जनासाठी काम करणाऱ्या भारतातल्या महिलांची संख्या तब्बल १० टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतातल्या फक्त २५ टक्के महिला नोकरी/काम करतात, असं जागतिक श्रम संघटनेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. (२५ टक्के काम करतात, म्हणजे बाकीच्या ७५ टक्के घरी बसून आहेत. इतकं मोठं मनुष्यबळ कामाविना वाया जात आहे.) खरं तर मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे, परंतु त्या नोकरी करण्याचं प्रमाण कमी का झालंय, हे अर्थतज्ज्ञांसमोरचं एक कोडंच आहे. 
 
या कोड्याचं एक उत्तर अर्थात आहे आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत. मुलगी शिकली तर तिला नवराही चांगला शिकलेला मिळेल, हा महत्त्वाचा उद्देश असतो. तिने त्यानंतर नोकरी करावी, अशी अपेक्षाच नसते. पालकांची अपेक्षा नसते, आणि मुलीला काय हवंय, याचा विचार करण्याची आपल्याकडे पद्धत नाही. आपल्या आजूबाजूला पदवीधर किंवा त्याहूनही अधिक शिकलेल्या अनेक तरुण, मध्यमवयीन महिला फक्त घर सांभाळताना दिसतात. अनेकदा त्यांना नोकरीसाठी लांबच्या गावी पाठवायला पालक नकार देतात. किंवा रात्रपाळी असेल अशा नोकरीला नाही म्हणतात. लग्नानंतरही \"मी तुझी हौसमौज पुरवतो, पण तू नोकरी करू नकोस,\' असं सांगणारे अनेक नवरोजी असतातच. नोकरी करणारी बायको असेल तर घरादाराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होतं, असा प्रचंड गैरसमज आपल्या देशात आहे. याच्यामागेही पुरुषप्रधान विचारसरणीच आहे. घर आणि मुलं सांभाळणं ही बाईची कामं आहेत, पुरुषाचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असा अनेकांचा आज एकविसाव्या शतकातही विश्वास आहे. अर्थात घराची गरज म्हणून बाईने नोकरी केलेली चालते. पण तिथेही घरचं सगळं सांभाळून ती करावी, असाचा अट्टाहास दिसतो.  स्मार्टफोनमुळे होणारे इतर फायदे, उदाहरणार्थ मित्रमैत्रिणी व नातलगांशी संपर्क व गप्पा, गाणी ऐकणे, फोटाे काढणे व पाहणे, चित्रपट पाहणे हे यापुढे काहीच नाही असं वाटावं. पण यांतनं मिळणाऱ्या आनंदालाही या मुली व महिला मुकतायत. 
 
स्मार्टफोन वा मोबाइल हा स्त्रिया व पुरुषांमधला भेद कमी करणारा घटक म्हणून जगभर ओळखला जातो. आणि भारतात मात्र या मोबाइलने हा भेद अधिक ठळक केला आहे.
बातम्या आणखी आहेत...