आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन जपारे मुलांचे

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किशोरवयीन मुले आणि मुली यांची मने जपणे हे पालकांसाठी एक आव्हान आहे. या वयात मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल होतात. मुलांना आपण नक्की लहान का मोठे हेच समजत नाहीसे होते. त्यांनी मधे मधे बोलले तर मोठी माणसे कशी ओरडतात याचे एक उदाहरण पाहू.
सोहमच्या घरी नव्या फर्निचर आणि कारच्या खरेदीबद्दल जोरात चर्चा चालू होती. त्याच्या आजी- आजोबांचे आणि आईबाबांचे एकमत होत नव्हते. सोहम त्यांना कारबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत होता.
आजी : ते तू काय एसयूव्ही म्हणतोस ते नको. आम्हाला चढता येणार नाही. कशाला एवढे पैसे घालवतोस?
आई : ते काही नाही. फॉर्च्युनरच घ्यायची.
आजोबा : त्यापेक्षा एखादी छोटी गाडी बघ.
सोहम : आता आईचंच बरोबर आहे बाबा.
बाबा : सोहम, आत्ताशी आठवीत आहेस. लहान मुलांनी मोठ्यांच्या मधे नाक खुपसू नये.
सोहम हिरमुसला होऊन अभ्यासाला गेला. थोड्या वेळाने सोहमची छोटी बहीण नेहा रडतच आतून बाहेर आली आणि बाबा ओरडले -
बाबा : सोहम ऽ ऽ. एवढा घोडा झालास आणि तरी छोट्या बहिणीच्या खोड्या काढतोस? आता काही तू लहान राहिलेला नाहीस!
सोहम मात्र आता पूर्ण गोंधळला होता.
बहुतांश असेच होत असते. या वयातील मुलांशी आपण असेच हवे तेव्हा हवे तसे सोयीस्कररीत्या वागतो.
या वयातील मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. आपण जर त्यांना वेळीच त्यांच्यातील बदलांची जाणीव करून दिली नाही तर ती मुले गोंधळून जातात. आपण त्यांना वेळीच योग्य त्या शब्दात गरजेपुरती माहिती दिली नाही तर ती मुले भरकटतात. याचे एक उदाहरण पाहू.
मनीष दहावीत गेला आणि त्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. तो शाळा, क्लास कोठेच जायला तयार होईना. त्याची दाढी वाढली, केस वाढले, आजारी दिसू लागला. त्याला माझ्याकडे आणल्यावर त्याच्या विविध टेस्ट्स झाल्या, काउन्सेलिंग झाले. त्याचा आय क्यू 140 होता! जीनियस - म्हणजेच अत्यंत बुद्धिमान मुलगा. तरीही असे का बरे वागतो? याचा उलगडा समजल्यावर त्याच्या पालकांच्या डोळ्यात पाणी आले. झाले होते असे... त्याच्या घरी एकदा मावशीने फोन केल्यावर मनीषने फोन घेतला. तो संवाद असा -
मावशी - ‘‘हॅलो’’
मनीष - ‘‘हॅलो’’
मावशी - हॅलो, ताई -
मनीष - ए - मी बोलतोय -
मावशी - अय्या ऽ - एवढा बायकी आवाज ऽ ई ई आणि असे वारंवार घडले. पाच-सहा वेळा लोकांनी त्याला ‘बायकी आवाज’ म्हणून चिडवले.
या केसमध्ये वडलांनी जर पुढाकार घेऊन त्याला किशोरावस्थेत आवाज फुटतो हे सांगितले असते तर?
त्या मुलाचे खूप काउन्सेलिंग केल्यावर तो परत हसू लागला. पण मेरिटमध्ये येण्यासारखा मनीष सामान्य 50% घेऊन पास झाला. त्याचा सोनेरी काळ मात्र अंधकारमय झाला. सर्वजण मुलींबद्दल बोलतात. पण मुलांच्याही समस्या समजून घेतल्या पाहिजेत. मुलांचे वजन, उंची वाढते. मिसरूड फुटते. आवाज फुटतो. गोंडस दिसणारे मूल थोडे पुरुषी, राकट दिसू लागते. हे सारे त्याच्या बाबांनी एक मित्र बनून त्याच्याशी बोलायला हवे.
मुलींच्या बाबतीत मुलांपेक्षा थोडे आधीच हे बदल घडतात. पण वयात येणाºया मुली अधिकच सुंदर दिसू लागतात.माझ्याकडे येणारे पालक बºयाचदा मुली घरात बोलत नाहीत, सारख्या मैत्रिणींशी फोनवर बोलतात, जास्त फॅशनेबल राहतात, अभ्यासापेक्षा नखरेच करतात अशा काळजीने त्रस्त असतात. मुलींना त्यांच्यातील बदलाची सकारात्मक जाणीव आईने करून द्यायला हवी. मुलींच्या वर्तनात काही चुकीचे दिसले तर त्यांना टोकण्यापेक्षा तसे काही चुकीचे वागण्यापूर्वीच त्यांच्याशी सुसंवाद करणे गरजेचे असते. त्यांना लहानपणापासूनच गोष्टी सांगून घडवणे हे एक मोठे कौशल्य आहे. आमच्याकडील एका पालकशाळेत पालकांनी मुलगी बिघडू नये याकरिता तिला अत्यंत कडक पद्धतीने वागवीत असल्याचे कबूल केले. पण या पालकांच्या कडक शिस्तीमुळे ती मुलगी आईशी खोटे बोलू लागली. उशिरापर्यंत मैत्रिणीच्या घरी थांबू लागली. तिला मैत्रिणींनी तुला एक छान बॉयफ्रेंड देते असे सांगून एका मुलाशी तिची ओळख करून दिली. तो मुलगा तिची करीत असलेली प्रशंसा एकीकडे आणि ओरडणाºया, मारणाºया आईची शिक्षा एकीकडे, यातून त्या मुलीने त्याच्यासह पळून जाण्याची जय्यत तयारीही केली होती. खूप काउन्सेलिंगनंतर ती मुलगी घरात परत चांगले वागू लागली.
दहावी-बारावीचा रिझल्ट म्हणजे खूपशा घरात तणावपूर्ण वातावरण असते. मुलाने कोणते करिअर करावे या संभ्रमात पालक असतात. कॉम्प्युटराइज्ड अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट केल्यास शास्त्रशुद्धरीत्या त्या मुलाला कोणते करिअर जमेल हे पाहता येते. ही अडीच तासांची टेस्ट असते. एका वेळी एकाच मुलाची टेस्ट होते. त्यामुळे मूल कॉपी करू शकत नाही. त्यांच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, लॉ, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट अशा 16 करिअर्सचा स्कोअर येतो. तसेच मॅथ व बायोलॉजी ठेवावे का सोडावे ठरवता येते. अशा शास्त्रशुद्ध टेस्टची, काउन्सेलिंगची, पालकशाळेची मदत घेऊन आपले मूल यशस्वी सुजाण नागरिक बनवता येईल. थोडक्यात, किशोरावस्थेत मुलाची मानसिकता फुलासारखी हळुवारपणे जपायला हवी. मुलाशी कठोर वागणे टाळा आणि आत्महत्येच्या विचारांना थारा देऊ नका. त्यांचे मित्र व्हा.
आळशी सुपर मॉडेल
लक्षात नसलेला बाप
आषाढाचे मेघ वर्षती...
छोटे उस्ताद