आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा कट्टा: व्हॉट्‍स अॅप वरदान पण मर्यादा हवीच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक क्षणी संपर्कात
या नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशात असलेले मुलगा-मुलगी, सून-जा‌वई आिण नातवंडांची क्षणाक्षणाची खबर मिळते. परदेशात राहणाऱ्या नातेवाईक मंडळींसोबत दैनंदिन संवाद साधला जातो. शिवाय नातवंडांच्याही फोटो क्लिप्स सतत पाहायला मिळतात. प्रत्येक सणावाराला एकमेकांच्या घरी काय केले आहे, रांगोळी, सजावट कशी केली आहे हे सर्व फोटोमुळे सहज कळत असते. त्यामुळे आम्ही सर्व जण सोबत आहोत असे वाटते. त्यामुळे मुलं दूर असल्याचा आम्हाला त्रास होत नाही आिण आम्ही इकडे खूश आहोत हे पाहून मुलं-मुली, सुना-जावईसुद्धा तिकडे टेन्शनफ्री राहू शकतात. माझ्या नणंद, जावा, बहिणी, मैत्रिणी यांच्यासोबतसुद्धा मी कायम ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात असते. अर्थात एकमेकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ न करता. खासगी आयुष्याबद्दल चर्चा करणे हा मनुष्यस्वभाव आहे. त्यासाठी टेक्नॉलॉजीला दोष देण्यात अर्थ नाही. उपयोग कसा करायचा चांगला की वाईट हे प्रत्येकानं स्वत:च ठरवायचं.
—अनुराधा सुभेदार, औरंगाबाद


खासगी आयुष्यावर परिणाम
नवीन तंत्रज्ञानामुळे माणसाच्या आयुष्यात क्रांतीकारक बदल होत आहेत. आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअॅपचा वापर दैनंदिन जीवनात अनेक लोक करतात. त्यामुळे एकमेकांशी आपल्या मतांची-आचारविचारांची देवाणघेवाण सोपी झाली आहे. एकमेकांशी सतत संपर्कात राहिल्यानं अनेक नवीन नाती जोडली जात आहे. घट्ट होत आहे. मात्र, याची दुसरी बाजूसुद्धा आहे. या तंत्रज्ञनामुळे अनेक गैरसमजांना वाव मिळतो. वाईट कृत्यासाठी याचा उपयोग केला जातो. अनेक जण सातत्याने मोबाइलवरच असतात. त्यामुळे रक्ताची नाती दुरावत चालली आहेत. जितके हे तंत्रज्ञान उपयोगाचे आहे तितकेच त्याचे दुष्परिणामही आहेत. अनेकांच्या खासगी आयुष्यात यामुळे वादळं येतात. मात्र तंत्रज्ञानाचा वापर जर योग्य रितीनं केला तर त्याचे फायदे मिळतील आिण जीवनमान उंचावण्यासाठी हातभार लागेल
— सुनीता वाघ, धुळे


काळजी बांधून ठेवते
बेस्ट बडीज, झुम्बा ग्रुप, चांदवड ग्रुप, ओन्ली महिलाराज ही आमच्या व्हॉट्सअॅपवरच्या मैत्रीच्या कट्‌ट्याची नावं आहेत. रिश्ता वही पर जगह नयी असंच काहीसं. उच्च माध्यमिक आिण त्यापुढील शिक्षण घेताना जमलेली ग‌ट्टी आता परत फुलतेय. तब्बल १६-१७ वर्षांपूर्वीचे आम्ही मित्रमैत्रिणी या माध्यमामुळे एकत्र आलोय. कितीही काळ लोटला तरी कॉलेजमधले ते दिवस, ती मैत्री मनात रुंजी घालत असते. शिक्षण संपल्यावर एकमेकांच्या संपर्कात राहू असे वाटत असले तरी प्रत्येकाला जबाबदारीमुळे ते शक्य होत नाही. ग्रुपमध्ये आम्ही ते दिवस परत आणलेत. आम्ही आमच्या ग्रुपमध्ये नुसती धम्मालच करत नाही तर चांगले विचार फॉरवर्ड करत असतो. परदेशातल्या मित्रांसोबत संस्कृतीची देवाण-घेवाण होते.
— दीपाली संकलेचा-चुत्तर, अहमदनगर


संपर्काचे माध्यम
आम्ही दहा-बारा वाचक मैत्रिणींनी व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला आहे. एकमेकींना न भेटता आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी बनलो. या ग्रुपमध्ये बऱ्याच जणी पुण्याच्या आहेत. एकदोघी भारताबाहेरच्याही आहेत. मी पुण्याला गेले की एकीला सांगते. ती सगळ्यांना कळवते. जागा, वेळ ठरवते आणि आम्ही भेटतो. आता हा ग्रुप व्हाया फेसबुक व्हाॅट्सअॅपवर आलाय. या मैत्रिणी आॅर्कुट-फेसबुकमुळे मिळाल्या. फेसबुकमुळे मला एक गोव्याची मैत्रीण मिळाली. मी सोलापूरला. आमच्या कॉमन मित्राने फेसबुकवर गाठ घालून दिली. माझं लेखन तिनं तिच्या दैनिकात छापलं. मला लिहायला विषय पुरवले आणि प्रोत्साहन दिलं! मेमध्ये गोव्याला गेले होते तेव्हा तिला प्रत्यक्ष भेटले, पण असं वाटलंच नाही की आम्ही प्रथमच भेटतोय. मुंबईची मैत्रीण या ओळखीवर तिच्या मैत्रिणीसह सोलापूरला माझ्याकडे आली. तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट देवदर्शन करून गेली! आत्तासुद्धा मी रोज तासभर तरी या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटते, गप्पा मारते. जगाच्या पाठीवर हे ‘माझे लोक' आहेत!
— मधुरा उटगीकर, सोलापूर


व्हॉट्सॅपियाची लागण
काही गोष्टी आपल्या जगण्याच्या अपरिहार्य बाबी केव्हा आणि कशा बनतात तेच कळत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो आणि आपण त्या गोष्टीच्या आहारी गेलेलो असतो. मी व्हॉट्सअॅपबद्दल बोलते आहे. आजकाल ज्येष्ठ नागरिकही त्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. नेमके काय आहे बरे हे साधन जे माणसाला खिळवून ठेवते. शेजारी कोण बसले याची शुद्ध नसते, पण दूर असलेल्या व्यक्तीशी गप्पा करत असताना चेहऱ्यावर हसू विलसत असते. असून अडचण नसून खोळंबा. या माध्यमातून जुने शालेय महाविद्यालयी मैत्र गवसले. खूप हरखून गेल्यासारखे झाले. आजही त्या ग्रुपमध्ये मन खूप रमते. छोट्या छोट्या गोष्टी शेअर करण्यात आनंद असतो. पण जास्त गप्पाटप्पाही वेळापत्रक कोलमडवतात. स्वत:वर खूप चिडचिड होते. खटकणारी गोष्ट काही जण मध्येच ग्रुप सोडतात, काहींना काढले जाते, अशा रीतीने भरपूर पसारा मांडला जातो. आपण जास्तच अडकतो पण काही योग्य कारणासाठी ते अतिशय उपयुक्त माध्यम आहे आणि फुकटही आहे. आपल्या खासगी आयुष्यात मात्र खरोखर धिंगाणा घातला आहे. काही नियमावली आपणच तयार करायची आणि जिथे निखळ आनंद मिळेल तिथेच थांबावे.
— स्वाती पाचपांडे, नाशिक


ही तर केवळ लाट
ऑर्कुट, फेसबुक, व्हॉट्सअॅप ही मानवनिर्मित संवादाची माध्यमं आहेत. त्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व देऊ नये. कारण, हे ज्यांना कळत नाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तो धिंगाणा घालतो. विचारांची देवाणघेवाण केली तरी त्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटावंसं वाटणे ही नैसर्गिक गरज आहे. ती कोणतेही माध्यम पूर्ण करू शकत नाही. व्हाॅट्सअॅपचीही एक लाट आहे असे म्हणावे लागेल. त्यातील उत्सुकता संपली किंवा त्याला नवीन पर्याय मिळाला की, ऑर्कुट, फेसबुकप्रमाणे त्यातही माणसाचे मन रमणार नाही. त्याच्या मानसिक गरजा हा दुसरा मनुष्य प्राणीच भागवू शकणार हे सत्य नाकारता येणार नाही; परंतु त्याचे दुष्परिणाम काही काळ सहन करावेच लागतील.
— मोहिनी गायकवाड, नाशिक


रात्र थोडी, सोंगं फार
आजच्या धावपळीच्या जीवनात रात्र थोडी सोंग फार झाल्यामुळे व्यक्तींना प्रत्यक्ष जाऊन भेटणे, बोलणे, अशक्य होत आहे आणि नाती दुरावत चालली आहेत. अशा काळात नाती जोडण्यासाठी २००९मध्ये ब्रायन अॅक्टन व जॅन कूम यांनी व्हाॅट्सअॅप हे संपर्कमाध्यम खुले केले. त्यामुळे दूर गेलेली माणसे संपर्कात आली आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ झाली. मागच्या आठवड्यात एक बातमी वाचण्यात आली की, हरवलेली मुलगी व्हॉट्सअॅपमुळे सापडली. या तंत्रज्ञानाचा करिअरमध्येदेखील उपयोग होत आहे. तंत्रज्ञान ही गरजेची गोष्ट आहे. ही गरज आपण ठरवायची.
आंतरजाल विरता बॅटरी आयुष्य सरता, प्राण येती कंठा ऐसी अगाध सत्ता व्हाॅट्सअॅपची!
एवढेही आहारी जाऊ नये की त्याचं व्यसन लागेल. ज्या व्यक्तींशी प्रत्यक्ष बोलणे शक्य आहे अशांशी चॅट करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन बोला.
— श्रद्दा कानडे, परतुर


फेसबुकचा वापर जरा जपून
आजचे युग वेगवान झाले आहे ते केवळ तंत्रज्ञानामुळेच. याला कोणीही विरोध करणार नाही. या तंत्रज्ञानाचाच एक प्रकार म्हणजे मोबाइल. मी माझा मोबाइल २००६मध्ये विकत घेतला तेव्हा माझ्या घरातील, शेजारी व इतर गावातील लोक त्याकडे कुतूहलाने पाहत होते. २००६मध्ये पाचोडच्या विधानसभा सदस्यांना कामानिमित्त भेटण्यास गेलो. तेव्हा त्यांना मी म्हटले होते की, आमचा मोबाइल नंबर तुमच्या मोबाइलवर मेसेज करतो. तेव्हा त्यांनी तत्काळ म्हटले होते की, मला फक्त आलेला कॉल हिरव्या बटनाने उचलता येतो आणि लाल बटनाने बंद करता येतो. बाकीची फंक्शन्स पाहायला मला वेळ नाही. आज टचस्क्रीन मोबाइल अतिशय लोकप्रिय आहेत. त्यातच फेसबुक व व्हॉट्सअॅपसारख्या सुविधा मिळत आहेत. हे एका बाजूने चांगले आहे; पण अतिरेक टाळला पाहिजे.
— अशोक हनवते, जळगाव


हे तर वरदानच...

व्हॉट्सअॅप मला तर वरदानच वाटतेय. सगळं जग एका अंगणाच्या अंतरावर आल्यासारखे वाटतेय. पूर्वी पत्र मिळायला वेळ लागायचा. फोन करणे महाग पडते. त्यामुळे नातेवाईक, मैत्रिणींची खबरबात घेणे जरा अवघड होते. आता व्हॉट्सअॅपमुळे सगळे रोज संपर्कात असतात. सुख, दु:ख, विशेष घटना लगेच कळतात. संवाद साधता येतो. ग्रुप्सवर तर सगळे अंगणात गप्पा मारतोय असे वाटते. माझा मुलगा, सून लांब असूनही सतत संपर्कात असल्यामुळे
दुरावा जाणवत नाही आणि वाढतही नाही. त्याचबरोबर खूप छान विचार, विनोद, कविता, नवीन माहिती, फोटो, व्हिडिओ अशा बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. आता कोणत्याही गोष्टीचे तोटे हे असणारच. आपण घरात दुरावा निर्माण होईल इतका वेळ याला द्यायचा का? अथवा समाज-विघातक काही आपल्या हातून घडत नाहीये ना? कर्तव्याकडे दुर्लक्ष होत नाही ये ना? हे लक्षात ठेवावे.
— स्वाती स्मार्त


जवळीक की दुरावा?
या व्हॉट्सअॅपमुळे माणसे जवळ येतायत की दुरावा अजूनच निर्माण होतोय? एकमेकांशी प्रत्यक्ष न बोलणारे काही लोक ग्रुपवर एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे, असे दाखवतात. तसे करण्यातच त्यांना आनंद वाटतो. परंतु हीच माणसं मात्र मनाने खूप दूर गेलेली असतात. ग्रुपमधील एखाद्याला दिवसभरात किंवा काही दिवसांत कामांमुळे, काही अडचणींमुळे ग्रुपवर येणे शक्य झाले नाही तर त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनात वेगळीच इमेज तयार झालेली असते. सकाळी उठल्यावर इतर सर्व महत्त्वाच्या गोष्टी सोडून आधी व्हॉट््सअॅपचेच दर्शन घेतो. आपली मुलगी किंवा मुलगा शाळेतून आल्यावर प्रथम आपल्याशी न बोलता आधी मोबाइल चेक करतो. म्हणजे त्याच्या आयुष्यात आपले महत्त्व कमी तर होत नाही ना? घरात जवळ असलेल्या व्यक्तींपेक्षा आपण लांबच्या व्यक्तींना जास्त महत्त्व देतोय! जवळच्या माणसांना अप्रत्यक्षपणे दूर करतोय!
— श्रुती कुलकर्णी

मधुरिमा कट्टा: आजचा विषय—
कार्यालयात पुरुष व महिला सहकारी एकत्र काम करतात, दिवसातला मोठा काळ सोबत असतात. त्यांच्यात जे नातं तयार होतं, ते किती महत्त्वाचं असतं? तुमचं आहे का असं जिवाभावाचं नातं तुमच्या सहकाऱ्यांशी? तुमचे अनुभव पुढच्या शुक्रवारपर्यंत आमच्यापर्यंत नक्की पोचवा.
आमचा पत्ता—
मधुरिमा, दैनिक दिव्य मराठी, १५२९५, मोतीवाला कॉम्प्लेक्स, जालना रोड, औरंगाबाद - ४३१००३
ईमेल: madhurimadm@gmail.com, फॅक्स क्रमांक - ०२४०-२४५३५०३
बातम्या आणखी आहेत...