आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरीण हाय मी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाई म्हणजे घरकाम करणारी, हीच तिची ओळख. चूल आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र. गावाकडे मात्र तसे नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भल्या पहाटे शेतात दाखल होणारी बाईच असते. असे असतानाही तिने केलेले काम पुरुषाच्या नावे जमा होते.

बाई शेती करते म्हणजे काय करते, असा प्रश्न उपस्थित करण्याजोगी स्थिती आजही अनेक ठिकाणी आहे त्याचे कारण असे की, शेतीत राबणार्‍या पुरुषांच्या कामासंदर्भात नेहमी बोलले जाते. शेतीतली महत्त्वाची कामे पुरुषमंडळी करत असतात. त्यामुळे त्यांचे कष्ट दिसतात. मात्र स्त्रियांची शेतीतली राबणूक पुरुषांपेक्षा अधिक असूनही त्यांच्या कष्टाची मोजदाद केली जात नाही. तिचे कष्ट दुर्लक्षित केले जातात आणि त्या कष्टाचं मोलही ठरवलं जातं नाही. म्हणूनच शेतीत पुरुषापेक्षा अधिक राबणारी महिला काय काम करते, असा प्रश्न कुठल्या सरकारी अर्जामध्ये विचारलेला असतो तेव्हा त्याचं उत्तर ‘शेती’ असे न देता ‘घरकाम’ असे लिहिले जाते. बचत गटाची चळवळ जोमाने उभी राहिल्यानंतर मोठ्या संख्येने महिला त्यात सहभागी घेऊ लागल्या आहेत.

स्थानिक साधनसंपत्तीच्या आधारे उत्पादन घेणे हे बहुतेक बचत गटांच्या उत्पादनाचे सूत्र आहे. त्यामुळे प्रदेशनिहाय महिलांची उत्पादने वेगळी असतात. केवळ लघुउद्योगासारखी छोटी उत्पादने न घेता थेट शेती करून उत्पादन घेण्यासाठीही महिला सरसावल्या आहेत. पेरणीपासून काढणीपर्यंत सार्‍या जबाबदार्‍या त्या पार पाडू लागल्या आहेत. पुरुषांच्या मदतीशिवायही आम्ही शेती करू शकतो हे राज्यभरातील अनेक ठिकाणच्या महिलांनी दाखवून दिलं आहे. आजकाल महिला सेंद्रिय शेतीही करू लागल्या आहेत. त्यासाठी त्यांना शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सेंद्रिय शेतीचे धडे दिले गेले. म्हणजे केवळ पारंपरिक शेतीमध्ये अडकून न पडता महिलांनी आधुनिक शेतीचा मार्गही धरला असून त्यावर त्यांची दमदार वाटचाल सुरू झाली आहे.

अनेक बचत गटाच्या महिलांनी फळप्रक्रिया उद्योगांकडे लक्ष दिले असून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्या उद्योगाकडे वळल्या आहेत. दुग्धउत्पादनातसुद्धा स्त्रिया मागे नाहीत. त्या रेशीम उद्योगाकडेसुद्धा वळल्या आहेत. यातून दिसते ती महिलांची नवे काही शिकण्याची, नवे काही करण्याची वृत्ती. पारंपरिक शेतीला आधुनिकीकरणाची जोड देऊन शेतीच्या क्षेत्रातही नव्या वाटा निर्माण करण्याचे काम महिला करू लागल्या आहेत आणि बचत गटाच्या चळवळीमुळे हे साध्य होऊ लागले आहे.

आपल्याकडची परिस्थिती आजही अशी आहे की, शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. अर्थातच शेतीचा व्यवहार, लहरी हवामानावर अवलंबून असलेले शेतीचे भवितव्य, त्यानंतरही बाजारपेठेतील दराच्या अनिश्चिततेची टांगती तलवार अशा अनेक कारणांमुळे शेतीशी संबंधित कोणत्याही घटकाला शेती भरोशाची वाटेनाशी झाली आहे. त्यातूनच पिकेल तेवढेच आपले अशी मानसिकता बनत चालली आहे. शेती करणार्‍यांना नैराश्य येण्याजोगी स्थिती येत चालली आहे. अशा काळात बचत गटांच्या माध्यमातून कंबर कसून महिला शेतीमध्ये उतरल्याचे चित्र दिसते. आणि शेतीसाठी हे चित्र खूप आशादायक आहे. आधुनिकतेची आणि पर्यावरणपूरक जोर देऊन शेती करण्याचा महिला प्रयत्न करीत आहेत. आजकाल शेड नेट करून त्यात पिके घेतली जातात. त्यामुळे त्यातील भाजीपाला दुसरीकडे एक्स्पोर्ट केला जातो. बचत गट चळवळीने महिलांचा आर्थिक विकास साधण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे. या महिलांमध्ये नवे काहीतरी करण्याची ऊर्मी निर्माण झाली आहे.

शेती कसणारी महिलाच असते, त्याचा गौरव तिने बाळगलाच पाहिजे व तिच्या शेतकरीण असण्याला समाजाने परिमाण प्राप्त करून दिले पाहिजे. शेतीचा गाडा तीच हाकते, वेळप्रसंगी दावेही धरते, तरीही ती घरकाम करणारी गृहिणीच? परंतु मी अभिमानाने सांगेन, ‘शेतकरीण हाय मी! घरकाम नव्हे, शेती करते मी.’