आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चैतन्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैतन्य. नावाप्रमाणेच सळसळता उत्साह, ऊर्जेचा खळाळता झरा. कॉमर्सच्या तिस-या वर्षात शिकणारा चैतन्य नेहमी स्वत: आनंदी राहणारा आणि आपल्या अस्तित्वाने आजूबाजूचंही वातावरण आनंदी ठेवणारा. हिप-हॉप, रॉकस्टारच्या जमान्यातला आजचा हा तरुण धार्मिक वृत्तीचा, अध्यात्माची आवड असणारा आहे असं सांगितलं तर कदाचित लोक त्याला वेड्यात काढतील; पण चैतन्य याला अपवाद होता. आधुनिक राहणीमान, आवडी-निवडी आणि उच्च शिक्षण घेत असूनही चैतन्यला आध्यात्मिक वाचनाची खूप आवड होती. नुसतीच आवड नाही तर आध्यात्मिक पुस्तकात वाचलेल्या गोष्टी आचरणात आणायला त्याला आवडायचं. म्हणूनच कॉलेजात त्याला लिटिल फिलॉसॉफर म्हणून ओळखलं जायचं. मितभाषी स्वभावाचा चैतन्य, अतिशय शिस्तप्रिय होता. अभ्यासात जसा चैतन्य हुशार होता तसंच विविध कलाही त्याने अवगत केल्या होत्या. गाणी म्हणायला आणि ऐकायला त्याला आवडायचं. शास्त्रीय संगीतामुळे मन शांत होतं असं त्याचं मत होतं. चैतन्यला आणखी एका गोष्टीची खूप आवड होती. ती म्हणजे तबलावादनाची. अभ्यासातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो तबला वाजवत असे. विविध कलांमध्ये रमणा-या चैतन्यला रंगांत रंगून जायलाही खूप आवडायचं. त्याच्या अनेक चित्रांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बक्षिसं मिळाली होती. मी आणि माझं असं केवळ स्वत:बद्द्ल बोलणा-या आणि विचार करण्यांपासून दोन हात अंतर ठेवून राहणारा चैतन्य मोबाइल, संगणकासारख्या तंत्रज्ञानाचा गरजेपुरताच वापर करायचा. या वस्तूंच्या अति किंवा विनाकारण वापरापासून तो त्याच्या मित्रांनाही दूर राहायला सांगायचा. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या चैतन्यची आणखी एक आवड म्हणजे अभिनय. अभिनयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधूनही त्याने बक्षिसं मिळवली होती. शिवाय कॉलेजमध्ये चैतन्यने पुढाकार घेऊन सुरू केलेला ग्रुपही खूप अ‍ॅक्टिव्ह होता. तरुणांना व्यसनापासून दूर जाण्याबाबत जागृती करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम चैतन्यचा ग्रुप करायचा. असं विविधांगी व्यक्तिमत्त्व असून अनेक पारितोषिकं मिळवूनही चैतन्यचे पाय जमिनीवरच होते. आपण इतरांपेक्षा फार काही वेगळे आहोत किंवा आपण आपल्या मित्रांपेक्षा खूप काही वेगळं अचिव्ह केलं आहे, असं त्य्Þााला मुळीच वाटत नसे. उलट स्वत:बद्दल बोलणं तो कटाक्षाने टाळायचा. दिवसभरातला एक क्षणही वाया जाऊ न देणारा असा चैतन्य शिक्षकांचा लाडका नसता तरच नवल. कॉलेजमधले सगळे शिक्षक इतर मुलांना चैतन्यचं उदाहरण द्यायचे. इतर मुलांमध्ये फारसा न आढळणारा चैतन्यचा आणखी एक गुण म्हणजे मोठ्यांचा आदर करणं. त्यांची काळजी घेणं. म्हणूनच ज्येष्ठांसाठीच्या वृद्धाश्रम कल्पनेला त्याचा विरोध होता.
मात्र, अशा सर्वगुणसंपन्न चैतन्यचा, त्याचा जिवाभावाचा मित्र असलेला निखिल मात्र सतत दु:स्वास करायचा. सगळेजण चैतन्यचं कौतुक करत हे निखिलला मुळीच सहन होत नसे. त्यामुळेच निखिल नेहमी चैतन्यचा रागराग करायचा. असाच त्या दिवशी निखिल रागाच्या भरात चैतन्यला खूप बरं-वाईट बोलून गेला. ‘तू स्वत:ला खूप हुशार असल्याचं दाखवतोस; पण तू तसा नाहीस. तू स्वार्थी आहेस. लोकांनी सतत आपलंच कौतुक करावं असं तुला वाटतं. तू लोकांना इम्प्रेस करायला पाहतोस. तू वरवर शांत स्वभावाचा असलास तरी मुळात तू खूप चिडखोर आहेस. तू सगळ्यांना फसवू शकतोस; पण मला नाही. म्हणूनच तू हा चांगुलपणाचा बुरखा पांघरणं सोडून दे. माझ्यापेक्षा कुणीच चांगलं असू शकत नाही, याची मला खात्री आहे...’ निखिल आपल्या जिवलग मित्राला, चैतन्यला रागाच्या भरात बरेच काही बोलून गेला.
काय झाले असेल पुढे...