आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षाभंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिलासा’चा फोन खणखणला. मुलाच्या वाढदिवसाला आवर्जून येण्याचं आमंत्रण देताना स्वातीचा उत्साह अगदी उतू जात होता. तिच्याशी बोलत असताना माझं मन मला भूतकाळात घेऊन गेलं.
तीन वर्षांपूर्वीची एक संध्याकाळ. अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली स्वाती नावाची तरुणी ‘दिलासा’मध्ये मार्गदर्शनासाठी आली होती. तिच्या समस्येवर उपाय शोधण्याच्या हेतूने संपर्क साधण्यात तिने बराच उशीर केला होता हे माझ्या लक्षात आलं. थाटामाटात झालेल्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच नव-यापासून घटस्फोट घेण्याची तयारी तिने चालवली होती. तिचा नवरा तिला अनुरूप नाही, असा शोध लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात तिला लागला होता. तिच्या हातून एकही चूक कधीच घडत नाही, तर सर्व चुकांसाठी फक्त इतरच जबाबदार असतात असा तिचा ठाम समज होता. कोणाच्याही भावना, विचार समजावून घेण्याच्या पार पलीकडे ती पोहोचली होती. तिची समस्या सोडवण्यासाठी झालेल्या चर्चेदरम्यान स्वत:च्या सख्ख्या आईवडलांसकट सर्व रक्ताच्या नातेवाइकांबद्दल ती अत्यंत त्वेषाने बोलत होती. जन्मदात्या आईने तिच्या आयुष्याचा पूर्ण खेळखंडोबा केला असा तिचा स्पष्ट आरोप होता. नातेवाईक मंडळींकडून तिचा प्रचंड अपेक्षाभंग झाल्याचं तिच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होतं. आरोपांच्या अनेक फैरी झडल्यानंतर आणि संताप, त्वेष व उद्वेगाचा भर ओसरल्यानंतर ती काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत पोहोचली व प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीला सुरुवात झाली!
आईवडलांकडून ब-याच अपेक्षा बाळगल्या आहेत का?
- का बाळगू नये? प्रत्यक्ष जन्मदाते म्हणजेच रक्ताचे नातवाईक आहेत ते माझे. आपल्या मुलांसाठी काही कर्तव्ये त्यांनी पार पाडलीच पाहिजेत.
कोणती कर्तव्ये?
- चांगले पालनपोषण, संस्कार, उत्तम शिक्षण, लग्नासाठी अनुरूप मुलगा, हुंड्यासाठी भरपूर पैशाची व्यवस्था व आणखी बरंच काही!
सर्वच गोष्टींची अपेक्षा जर जन्मदात्यांकडून बाळगली तर आपल्याला आयुष्यात हातपाय हलवण्याची गरजच भासणार नाही. आपल्या स्वत:च्या कर्तव्यांचं व कर्तृत्वाचं काय?
उत्तर न सुचल्यामुळे स्वाती गप्प बसून खाली मान घालून बसली. प्रश्नोत्तरे जसजशी वाढत गेली तसा स्वातीचा जगाकडे बघण्याचा जुना चष्मा हळूहळू गळून पडू लागला. पालक आणि नातेवाइकांना दोष देण्याच्या भरात तिच्याही काही जबाबदा-या आहेत, काही कर्तव्ये आहेत, हे ती विसरूनच गेली होती तिने प्रामाणिकपणे कबूल केले.
असे आम्ही कसे? ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक म्हणतो त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगायच्या असतात का, आणि त्यांनी त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असं गृहीत धरून चालायचं असतं का? आईवडील, भाऊबहीण या मंडळींनी आपल्या मनासारखं वागावं असं आपल्याला अगदी प्रामाणिकपणे जेव्हा वाटत असतं तेव्हा आपण एक अत्यंत महत्त्वाची वस्तुस्थिती साफ विसरून जातो की आपले सख्खे नातेवाईक हीसुद्धा माणसंच असतात. रात्रंदिवस केवळ दुस-याच्या मनासारखं वागणं ही त्यांच्यासाठी अशक्य कोटीतील गोष्ट असते. त्यांनी आपला अपेक्षाभंग करणं ही जर इतर कोणाच्याही बाबतीत घडू शकणा-या घटनेइतकीच नैसर्गिक घटना असेल तर त्यांना दोष देत पूर्ण आयुष्य वाया घालवण्यात काय अर्थ आहे?
स्वातीच्या विचारसरणीत पूर्ण बदल घडून आला. तिने आपल्या नव-याकडे व इतर नातेवाइकांकडे बघण्याचा चष्मा पूर्णपणे बदलून टाकला. आज तिच्या मुलाच्या वाढदिवसाचं आमंत्रण मिळालं तेव्हा मला तीन वर्षांतला तिचा प्रवास आठवला. या प्रवासात जर तिने तिची मतं बदलली नसती तर...