आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापलेकांच्या नात्याचं धुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणत: सगळ्याच कुटुंबातून ‘बाबा’ नावाची व्यक्ती मुलांच्या फारशी वाट्याला येत नाही. त्याची कारणं आपल्याला नव्यानं सांगायची गरज नाही. मुलं लहान असेपर्यंत ‘बाबा’बद्दलची भुरळ मुलगे/मुलगी दोघांनाही अतीव असते. मात्र जसं वय वाढतं तसं या दोघांमधलं अंतरही वाढायला लागतं. त्यातल्या मुलग्यांबद्दल आज आपण बोलूयात. मुलग्यांचं वाढणं हे व्यक्ती म्हणून फार वेगळं होतं. कर्तेपणाची भावना फार तीव्रतेने आणि पटकन त्यांच्यात रुजते. अशा वेळी जर बाहेरगावी किंवा सतत फिरतीवर असणा-या बाबांचं कुटुंब असेल तर मुलांना आईचेच कष्ट दिसतात व वरवर बघता घरासाठी काहीही न करणा-या (त्यांच्या मते) वडलांबद्दल मनात कुठेतरी सूक्ष्म अढी तयार होते. वडलांबद्दल प्रेम असतं, पण दोघांच्या नात्यात पुरुष प्रकृतीचं धुकं तयार व्हायला कुठेतरी सुरुवात होते.
याच विषयावरचा ‘पोस्टमन इन द माउंटन’ हा चायनीज सिनेमा आहे. जिथे दळणवळणाची काहीही साधनं नाहीत अशा खेड्यात पोस्टमन असलेल्या बाबाची आणि आता नवा पोस्टमन म्हणून रुजू होत असलेल्या त्याच्या मुलाची ही गोष्ट आहे. सतत घरापासून दूर असणारा बाबा आणि त्याचं काम मुलाला रुचत नसतं. मात्र या नव्या पोस्टमनला सगळ्या जागा-वाटा समजावून सांगण्यासाठी त्याच्या कामाच्या पहिल्या दिवशी बाबा सोबत म्हणून येतो आणि नात्यांचा गुंता होऊ देणारे सगळे गोफ एकेका प्रसंगातून हळूवारपणे उलगडतात. एखादी सुंदर कविता वाचावी अथवा कुठलीशी गाण्याची मैफल रंगावी आपण तिचे साक्षीदार असावे. असा ‘पोस्टमन इन द माउंटन’ दीर्घकाळ आपल्या मनात तर राहतोच, पण नकळत आपल्याही मनातल्या नात्यांच्या गोफांना निरखतो.