आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवघरातल्या देवीसमोर ती फतकल मारून बसली होती. व्याकूळ नजर देवीच्या फोटोवर खिळलेली होती. त्या नजरेनंच देवीशी बोलत होती ती. बोलणं कसलं, नुसतेच प्रश्न विचारत होती ती. देवी काही उत्तरंच देत नव्हती. देणार तरी कशी? तिच्या मनात आलं. उत्तरं देण्यासारखं उरलंच काय देवीकडे? लग्न झाल्यापासून आपण या घरात आलोत. तेव्हापासून काय सुख मिळालंय आपल्याला? सुखाचं एक जाऊ दे, पण निदान निवांतपणे चार घास तरी घशाखाली उतरवता आलेत का कधी?
सतत आपला सासूचा जाच. आपल्याला भल्या पहाटे उठवून स्वत: मात्र पुन्हा डाराडूर झोपी जाते. आपण मात्र सारं घर झाडून-पुसून लख्ख करायचं. धुणं धुवायचं. स्वत:साठी चहाचा एक कपसुद्धा करून घ्यायची चोरी. एकदाच स्टोव्ह पेटवला होता तर झोपेतसुद्धा तिला ऐकू गेलं ते. लगेच पांघरूण भिरकावून स्वयंपाकघरात येऊन आपल्याला नको नको ते ऐकवलं होतं तिनं. तेव्हापासून चहा मिळायचा तो सासू उठल्यानंतरच! हिला मात्र उठल्या-उठल्या लागतो.
सगळं साचून आलं होतं तिच्या मनात. पण बोलायचं कोणाजवळ? एकदा लग्न करून दिल्यानंतर माहेरी परत यायचं नाही असं बजावलं नसलं तरी त्याचं वागणं एकंदरीत तसंच होतं. शिवाय माहेरची गरिबी तिला दिसत नव्हती का? अजून पाठची बहीण उजवायची होती. ही माघारी आली असती तर बहिणीला कोणी पत्करलं असतं? तेव्हा मनातलं माहेरी कोणाजवळ बोलायची चोरीच! अधूनमधून आईशी बोलताना जे काही सांगता यायचं तेवढं सांगून ती आपल्या मनाचा भार हलका करायचा प्रयत्न करायची. पण सासरी आली की मिळालेला तो क्षणिक दिलासासुद्धा उन्हानं जमिनीवरचं पाणी सुकून जावं तसा सुकून जायचा.
‘‘देवी आई, आता तूच सोडव गं बाई या जाचातून!’’ देवीसमोरचं कुंकू उचलत तिनं कपाळावर लावण्याचा प्रयत्न केला. पण जमलंच नाही तिला ते. हात तसाच कपाळावरून फिरला. अचानक दाटून आलं तिला. हुंदका घशापर्यंत आला. तिनं खूप रोखण्याचा प्रयत्न केला. पण अंहं! जमलंच नाही तिला ते. ती हमसून हमसून रडायला लागली. रडतानाच डोळे पुसायला लागली. तिनं आपलं डोकं गच्च दाबून धरलं होतं. तिच्या रडण्याचा आवाज बाहेर पोचला असावा. नवरा ते ऐकून लगबगीनं देवघरात आला. त्याला काही कळेचना. बाहेर येत त्यानं आईला बोलावलं.
तर देवीच्या फोटोसमोर ती बसलेली. डोकं दाबून धरताना तिचे केस मोकळे सुटलेले. मघाशी नीट न लावता आलेलं कुंकू मळवटासारखं कपाळभर पसरलं होतं. पदर सुटून अस्ताव्यस्त झाला होता. रडताना तिचं शरीर गदागदा हलत होतं. ‘‘अगं बाई!’’ तिच्या या अवताराकडे पाहत सासू स्तिमित होत उद्गारली. अंगात आलं की काय हिच्या?’’ ‘‘अंगात? हिच्या अंगात कोण येणार?’’ नव-यानं कुचेष्टेनं विचारलं. ‘‘नेहमी इथे देवीसमोर येऊन बसते. देवीच आली असेल एखादेवेळी.’’ देवभोळ्या सासूनं तिच्याकडे पाहत म्हटलं. ‘‘अगं बाई, आज मंगळवारच आहे की!’’
एव्हाना सावध झाली होती ती. ती दोघं जवळ आलीयत हे टिपलं होतं तिनं आणि त्यांचं बोलणंही ऐकलं होतं. सासूच्या त्या बोलण्यानंच तिच्या अंतर्मनानं तिला नकळतपणे सूचना दिली होती. ‘बस! थांबू नकोस. असंच चालू ठेव. रडत राहा.’
रडणं चालू ठेवत तिनं डोळ्यांच्या कोप-यातून त्या दोघांकडे बघितलं. सासू तिच्याकडे कुतूहलानं पाहत होती. पण तिच्या डोळ्यांत कुठेतरी आदराचे, भक्तिभावाचे भाव निर्माण झाले असल्याचं जाणवलं तिला. नवरा मात्र कुत्सित नजरेनंच बघत उभा होता.
‘‘काय झालं गं बाई तुला? असं काय करतेस?’’ तिच्या बाजूला बसत सासूनं विचारलं.
सावध! हीच वेळ आहे. तिच्या मनानं तिला सावध केलं. देवी आपल्या अंगात आल्याचा सासूचा समज झालाय. तो तसाच कायम ठेवण्यातच आपलं भलं आहे हे त्या प्रसंगातही लक्षात आलं तिच्या.
मग तिचं रडणं अधिकच वाढलं. जोडीला आता हात वर करून तिनं एकमेकांत ते गुंफले आणि आळोखेपिळोखे देत ती घुमायला लागली. मान वेळावत तिनं डोळे गरागरा फिरवायला सुरुवात केली. सासू डोळे विस्फारून तिचा तो अवतार पाहत होती. पोरीच्या अंगात देवी आलीय हे त्या अनुभवी बाईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिनं चटकन देवीसमोरचं कुंकू उचललं आणि तिच्या कपाळाला लावलं.
‘‘कोण आहेस बाई तू?’’ सासूनं विचारलं.
‘‘हूं हूं.....मी .....तुळजा......पूरची ....भ....भवानी ऽ.....आहे. ’’ घुमत घुमतच तिनं उत्तर दिलं.
‘‘मग अशी रडतेस का गं बाई? रडू नकोस गं माय!’’ प्रत्यक्ष तुळजाभवानी सुनेच्या अंगात आलीय हे पाहून सासू गहिवरली.
‘‘रडू ..नको तर..... का ऽ य ....करू ? हूं....हूं.....माझ्या ....भ.....भगतिणीला ...खू ऽ प त्रास .....दे .....देताय तुम्ही ....लो ऽ क. हूं हूं’’ घुमणं सुरूच होतं.
‘‘नाही नाही. आता नाही देणार.’’ सासूनं चक्क तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला.
‘‘हूं हूं ......नक्की ना.....हूं हूं ....?’’ आळोखे-पिळोखे अजून जोरात.
‘‘नक्की! देवीला कबूल केलेलं नाकारून कसं चालेल?’’ कानाच्या पाळ्या पकडत सासूनं वचन दिलं.
मग निश्चिंत झाली ती. दोनचार मिनिटं असंच घुमणं-विव्हळणं चालू ठेवून नंतर भानावर आली. पाहते तर समोर सासू ! ‘‘हे काय सासूबाई? तुम्ही अशा काय बघताय माझ्याकडे?’’ आता सासू काय बोलणार? दोघी तशाच बाहेर आल्या. नव-याला हे काही पटलेलं दिसत नव्हतं. पण तो काहीच बोलला नाही.
सासू मात्र देवीच्या भीतीनं बरीच बदलली. म्हणजे अगदी पूर्णत: सुधारली जरी नाही तरी परिस्थितीत खूपच सुधारणा झाली. तिच्यामागचे कष्ट कमी झाले. खायलाप्यायला नीट मिळू लागलं. अधूनमधून नव-यासोबत बाहेर जाता येऊ लागलं. नव-यालाही बरं वाटलं. तिच्याकडे सासू कौतुकानं बघायला लागली होती. टोमणेबिमणे बंद झाले होते.
पण घरातला हा सारा बदल आपल्या त्या दिवशीच्या अवतारामुळेच झालाय हे पक्कं लक्षात होतं तिच्या. आपल्या अंगात देवी वगैरे काही आलेलं नाहीय हे जर सासूला कळलं तर आपली धडगत नाही हेही जाणून होती ती. तसं झालं तर पूर्वीपेक्षाही आपली अवस्था बदतर होईल हेही कळून चुकलं होतं तिला.
मग पुढचा मंगळवार आला. परिस्थितीची नीट जाणीव असल्यानंच संध्याकाळी सातच्या सुमारास पुन्हा ती अचानक घुमायला लागली. केस मोकळे होऊन विस्कटले गेले. पदर अस्ताव्यस्त झाला. मधल्या काळात सासूनं याची जाहिरात सगळीकडे केलीच होती. त्यामुळे आजूबाजूच्या काही बायका आज अपेक्षेनं आलेल्याच होत्या. त्यांनी मोठ्या उत्साहानं ‘देवीला’ कुंकू लावत ओटी वगैरे भरायला सुरुवात केली. काही प्रश्न विचारायला लागल्या. तीही मनाला येईल ते ठोकून द्यायला लागली.
मग हे असंच सुरू राहिलं. तिची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. प्रश्न विचारायला लोक यायला लागले. चाणाक्षपणे तीही उत्तरं देत तोडगे सुचवायला लागली. त्यासाठीचा खर्च सांगायला लागली. लोकही विश्वासाने सगळं करत होते. एकंदरीत सगळं मस्त चाललं होतं.
आपले दिवस असेच बदललेले राहायचे असतील तर देवीचं येणं अपरिहार्य आहे हे लक्षात आलं होतं तिच्या. देवीसमोर येणारे पैसे पाहून नव-यालासुद्धा यात काही हस्तक्षेप करावासा वाटत नव्हता. येणा-या पैशातून तिलाही स्वत:ची हौसमौज भागवता यायला लागली होती. आणि सासू? देवीच्या कोपाच्या भीतीमुळे तिनं आता तिच्याशी वाईट वागणं सोडूनच दिलं होतं.
हे जर असंच आहे तर मग फक्त मंगळवारच कशाला? एकदा तिच्या मनात आलं. आणि मग मंगळवार, शुक्रवार असं आठवड्यातून दोनदा तिच्या अंगात यायला लागलं. दोन्ही दिवशी दरबार भरायला लागला. इतरांचे सुटो वा न सुटो, तिचा तरी प्रश्न सुटला होता!