आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी कसे व किती प्यावे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील लेखामध्ये किती प्रमाणात व किती वेळा आहार घ्यावा याबद्दल माहिती घेतली. भारतीयांमध्ये आहाराचे वर्गीकरण प्राय: गुरू व लघुआहार (जड व हलका आहार) असे करण्यात येते. सर्वसाधारण लोकांचा असा समज आहे, की हलका आहार कितीही खाल्ला तरी काही अपाय होत नाही. आहार किती असावा याबद्दलची एक सयुक्तिक व्याख्या अशी आहे - आहार : जीर्णेशक्तय:। प्रत्येकाचा आहार हा एवढा असावा, जो योग्य वेळेत काहीही त्रास न होता पचतो.
या व्याख्येप्रमाणे जड पदार्थ कमी मात्रेत व हलके पदार्थ थोड्या अधिक मात्रेत चालू शकतात. ब-याच वेळा मात्र हलका पदार्थ कुठला व जड पदार्थ कुठला ही गल्लत होत असते. पदार्थ कमी उष्मांकांचा असल्यास तो पचण्यास हलका आहे, हा रूढ गैरसमज आहे. उदा : टोमॅटो, दही, मोड आलेली कडधान्ये अशा पदार्थाचा उष्मांक अत्यल्प आहे, मात्र पचायला जड आहे.
याचाच अर्थ, पदार्थाच्या उष्मांकासोबत पदार्थाची जीर्वाशक्ती व त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ गाजर किंवा टरबुजासारखे पदार्थ. ते कमी उष्मांकाचे असून त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ते शरीरात चयापचयात्मक बदल जास्त घडवून आणतात. अलीकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या पदार्थांमध्ये कर्बोदक व पिष्टमय अंश जास्त आहेत ते जास्त स्निग्धांशापेक्षाही (फॅट) चयापचयात्मक आजार अधिक घडवून आणू शकतात. याच कारणास्तव आयुर्वेदाचार्यांनी फलाहारास खूप जास्त महत्त्व दिलेले नाही. अत्यधिक फळे खाणे ही तशी भारतीय परंपरा नसून पाश्चिमात्य जीवनशैलीची एक संकल्पना आहे. जास्त प्रमाणात फळे सेवन केल्यास त्यातील फ्रक्टोज नावाच्या शर्करेमुळे ग्रेलिन हे संप्रेरक जास्त प्रमाणात स्रवित होऊन मधुमेह, स्थूलता व हृदयविकार होण्याचा संभव असतो. आयुर्वेदाने फळांचे वर्गीकरण जड पदार्थात केले आहे हे योग्य वाटते. या छोट्या छोट्या बाबींचा विचार करून पदार्थ जड आहे की हलका हे ठरवावे लागते. दैनंदिन व्यवहारात असे लक्षात येते, की सर्वसाधारणपणे लोक सकाळच्या नाष्ट्यात हलके पदार्थ घेण्याऐवजी उसळी, पोहे, ब्रेड, अंडी, लोणी याचा जास्तीत जास्त वापर करतात. इतका जड पदार्थयुक्त नाष्टा केल्यास दुपारचे जेवण अल्पोपाहाराएवढे असलेले बरे. आहाराच्या मात्रेसोबत आपण सेवन केलेल्या पाण्याची मात्रा ठरवणे गरजेचे असते. पाणी हा तसा जड पदार्थ आहे. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच पिणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे भारतीय वातावरणातील लोकांनी 30 मि. लि. ते 50 मि. लि. प्रतिकिलो प्रतिदिवस पाणी पिणे अपेक्षित आहे. (म्हणजे आपले वजन 50 किलो असल्यास दीड ते अडीच लिटर पाणी प्यावे.) जास्त पाणी पिणा-यांमध्ये सर्दीचे विकार, दमा, अपचन, भूक मंदावणे, बहुमूत्रता यासारखे विकार होऊ शकतात. पाणी कधी प्यावे याबद्दल समाजामध्ये खूप मतमतांतरे आहेत. सर्वसाधारण नियमाप्रमाणे पाणी जेवताना पिणे योग्य आहे.
ज्याप्रमाणे कणीक भिजवत असताना हळूहळू पाणी मिसळले तरच व्यवस्थित कणीक मळली जाते. आधी व नंतर खूप पाणी टाकल्यास कणीक व्यवस्थित मळली जात नाही. त्याचप्रमाणे जेवणाच्या मध्ये पाणी प्याल्यास आहाराचे पचन व्यवस्थित होऊ शकते. जेवणाअगोदर पाणी प्याल्यास पाचक स्राव मंद होतात. परिणामी आहाराचे पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. जेवणानंतर लगेच खूप पाणी प्याल्यास अजीर्ण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपण थंड पाणी पितो किंवा कसे, यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. फ्रिजमधील अतिशीत जल हे कुठल्याही ऋतूत योग्य नाही. उन्हाळ्यामध्ये माठातले पाणी पिणे योग्य असते. मात्र इतर ऋतूंमध्ये साधे वा कोमट पाणी पिणे अधिक बरे.
कोष्णजल म्हणजे कोमट पाणी प्याल्याने पचन सुधारते व शरीरास हलकेपणा जाणवतो. मात्र गरम पाणी प्याल्याने चरबी कमी होते, असे अजिबात नाही. अतिथंड पाणी प्याल्याने अंग जड पडणे, सूज येणे व चयापचय मंदावणे, असे परिणाम जाणवू शकतात. म्हणूनच आहार व जलपान योग्य प्रमाणात असणे आरोग्यदायी असते.