आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीतील सोनं

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखलखती दुनिया, सोन्याचा चमचमाट, दिव्यांचा झगमगाट सर्वांनाच हेवा वाटेल अशी सोनेरी दुनिया म्हणजे नाशिकचा सराफ बाजार. या बाजारातून जाताना माणूस वर मान करून क्षणभर थांबून बघत राहतो. आज सोन्याचा भाव 30 हजार रुपये पार करून महत्त्व पटवून देत आहे. सोन्याची गुंतवणूक तसेच दागिन्यांचे प्रत्येक माणसाला, महिलेला कुतूहल, हौस आहे. परंतु नाशिक सराफ बाजारात येत असताना सोन्या मारुती चौकाजवळ तसेच बाजारात आल्यावर आपण क्षणभर थांबून निरीक्षण करतो व विचार करतोच की या महिला रस्ता का झाडत आहेत? गल्लीचा कोपरान्कोपरा, तोही एक छोटासा ब्रश व एक लोखंडाची तार हातात घेऊन?
सराफ बाजारातील प्रत्येक दुकानाच्या बाहेर पडलेल्या कच-यावर यांचे जीवन, चरितार्थ, रोजीरोटी पिढ्यानपिढ्या चालत आहे. या झाडणा-या जमातीला, जातीला झारेकरी असे म्हणतात. दिवसभर रस्ता झाडून मिळणारा कचरा-माती गोळा करून (एका पाटीत) तो गंगेवर किंवा नदीकाठी नेला जातो. तो ब-याच वेळा पाण्यात धुतल्यानंतर त्यावरील कचरा/घाण पाण्याबरोबर वाहून जाते व पाटीमध्ये खाली राहिलेली माती/गाळ पुन्हा स्वच्छ केला जातो व त्यानंतर खाली धातूचे बारीक बारीक कण रहातात. ते अलगद गोळा करून सुकवून चांदी-सोने जे धातुकण असतील ते गोळा करतात. सराफाकडे आणून चांदी सोने परीक्षण करून ते विकतात. आलेल्या पैशातून रोजचा प्रपंच चालवला जातो. हे काम करण्यामध्ये 90% प्रमाण महिलांचेच.
या झारेक-यांमध्ये दोन गट आहेत. एक म्हणजे मराठमोळ्या नऊवार साड्यांमध्ये दिसणा-या महिला व दुसरे म्हणजे नागपूर मूळ गाव असलेले स्त्री व पुरुष. महिलांची नऊवार साडी परंतु कमी उंचीला, तसेच कुरळे केस, चेह-याचा भाग काही प्रमाणात चपटा, हातापायात चांदीचे जाड नक्षीचे कडे, हातात झाडण्याचा ब्रश व डोळ्यावर किंवा कमरेवर काळीभोर उथळ अशी पाटी. पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, कायम काम करणा-या.
यातीलच एकदोघी वृद्ध महिलांशी मी एकदा गप्पा मारल्या. नाव यशोदा वसंत वाघमारे. वय 85. त्या सांगतात, ‘‘आमचा पिढीजात व्यवसाय हाच. पूर्वी आम्हाला दिवसाकाठी 200 ते 300 रुपये रोज मिळत. परंतु आता सराफी व्यवसायात झालेल्या नवीन नवीन यंत्रामुळे आम्हाला 5/6 दिवसांनंतर 500 ते 600 रुपये कमाई होत आहे. पूर्ण आयुष्य रस्ता झाडण्यात गेले. आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली पोरं आज मोठमोठे व्यापारी झालेत, दिवस बदललेत. व्यवसाय वाढले. सोन्याचा भाव गगनाला भिडला. परंतु आम्ही आहे त्याच परिस्थितीत. सरकारकडून कसलीही मदत नाही. काहींना स्वत:ची घरे नाहीत. आमच्या पुरुष मंडळींना चांगली नोकरी नाही.’’
सईबाई रामू साळवे म्हणतात, ‘‘आम्ही पहिले सकाळीच झाडायचो. परंतु आता रात्री दुकाने बंद होताच झाडायला सुरुवात करतो. कारण आम्ही नाही झाडलं, तर दुसरा कोणी येऊन झाडून जाईल. उद्या जे काही मिळणार ते पण मिळायचं नाही.’’ आमच्याकडे सरकारने लक्ष द्यावे, काही ना काही प्रकारे मदत करावी हीच अपेक्षा, हीच भावना त्यांच्या बोलण्यातून वारंवार प्रकट होत होती.
जे पूर्वी गोदाकाठी राहत होते त्यांना सरकारने घरे दिली आहेत. परंतु मोलमजुरी करून हे काम करताना घरी पुरुषमाणसांना नोकरी नाही, मुलांचे शिक्षण नाही. अपूर्ण सरकारी दाखले. त्यामुळे काय करावे हा त्यांच्यासमोर उभा असलेला मोठा प्रश्न. याचीच दुसरी बाजू अशी की या परिसरातील हे साफसफाईचे काम करताना रस्त्यावरील कचरा-घाण, गटारे, पाणी वाहत असलेला नाला पालिकेकडून कोणताही मोबदला न घेता साफ होत आहे. या लोकांना मानधन तर नाहीच, पण सरकारकडून कोणतीही सवलत नाही. या समाजातील रहिवासी भागाला मातंग समाज मोठा वाडा असे म्हणतात.
हा पूर्वीपासून द्वारका परिसरात आहे. तसेच नागपूरमधील झारकरी समाज पाटापलीकडे राहत आहे. यांचा सण म्हणजे प्रामुख्याने दिवाळी व आषाढ महिन्यामधील मंगळवारी आलेला मरीमातेचा उत्सव. बाकी देवांपेक्षा मरीमाता या देवीला जास्त मानतात. जर सणासुदीला किंवा एरवी पाहुणा म्हणून कोणी जर गेले तर त्यांना कपडा, जेवण एक झाडूकामाचा ब्रश व पाटी भेट दिली जाते.