आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिस्तीचा अतिरेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत उच्चशिक्षित, पाश्चिमात्य देशात स्थिरस्थावर झालेले चौकोनी कुटुंब माझ्यासमोर बसले होते. आई आणि वडलांना किती बोलू आणि किती नको असे झाले होते. मुलीचे चुकते की स्वत:चे, या संभ्रमावस्थेतच ते होते. फक्त समुपदेशन करून त्यांना भारतातील इतर नातेवाइकांना भेटायची घाई होती. नाशिकमध्ये कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांना लवकर परतायचे होते.
आई : डॉक्टर, सोनू हल्ली फारच मतलबी झाली आहे.
बाबा : अहो डॉक्टर, ती आईला कधीही ‘मिस’ करत नाही. तिच्या मनात भावनांचा कोरडेपणा आहे. तिला खरे तर आम्ही नकोसेच वाटतो.
आई : ती चक्क दुर्लक्ष करते. आपण दहा वेळा सांगावे, अगं वस्तू जागेवर ठेव, तर म्हणते कशी - ‘तुझे पुढचे डायलॉग मला पाठ आहेत. मी मठ्ठ, बेशिस्त वगैरे आहे. पार्टीला नेण्याच्या योग्यतेची नाही.’
बाबा : मागील महिन्यात रात्री दहा वाजता तिने इतका आवाज चढवला, की आमच्या शेजा-यांचा ‘आम्ही झोपलोय, आम्हाला त्रास होतोय’ असा फोन आला. मग मी तिला मोजून वीस फटके मारले.
आई : मी तिच्याशी आठ दिवस बोलणे बंद केले. परंतु तिच्यावर काडीमात्र परिणाम नाही.
बाबा : खेळायला गेली तर रडून तरी येते, नाही तर घरी आल्यावर फक्त तक्रारी तरी करत बसते.
आई : आम्ही तिला स्पष्ट सांगतो - तू खेळायला जाणे बंद कर. तूच चुकीचे वागत असणार.
घरातच तू एवढी उद्धट वागतेस, तुझे कोणाशीही पटणे शक्य नाही.
बाबा : शाळेत कधी गेलो तर इतक्या तक्रारी की मी सर्वांच्या समोर तिला एक ठेवून दिली.
आता दुस-या एका केसचा विचार करू -
अनुज हा दहावीतला मुलगा. त्याच्या आईचा आणि त्याचा संवाद आपण पाहू -
आई - बाळ, अभ्यासाला बस.
अनुज : आई अगं उद्याची तयारी काढतोय.
आई : गाणी लावून नाचत नाचत काय दप्तर भरतोस? दहावीत जरा सीरियस व्हा! आता कसला अभ्यास करणार आहेस?
अनुज : मी सायन्स वाचणार आहे.
आई : ते काही नाही. आता आधी दहा ओळी शुद्धलेखन, मग दहा गणिते, मग इतिहासाची प्रश्नोत्तरे लिहिणे एवढे झालेच पाहिजे.
यानंतर -
आई : डॉक्टर, मी याला सांगितलेले टाइमटेबल हा फॉलो करतच नाही.
आता अजून एका केसचा विचार करू -
बाबा - राजा खूपच उद्धट झाला आहे. काल मी त्याच्याकडे पाणी मागितले, तर म्हणाला, ‘मगाशी दिले होते ना. सारखे काय त्रास देताय?’
आता सोनूच्या केसचा विचार करू. भारताबाहेरच्या जगात वावरताना अत्यंत उच्चभ्रू बुरखा घेऊन शिस्तबद्ध वावरावे लागते, हे तर खरेच. शेजा-यांनी फोन करून अपमान करणे आणि त्यामुळे आईवडलांनी चिडणे स्वाभाविकच आहे. पण ही एवढी वेळ का आली?
सोनूचा बुद्ध्यांक 136 आला. म्हणजेच अत्यंत बुद्धिमान मुलगी त्यांच्या घरात जन्माला आली होती! घरातील अत्यंत कडक शिस्तीला कंटाळून त्या वय वर्षे आठ असलेल्या मुलीने सर्व सोडून आईवडलांचा तिरस्कार करणे सुरू केले.
वीस फटके मारणे, आठ-आठ दिवस अबोला धरणे, खेळायला जाण्यावर बंदी घालणे, या खूपच त्रासदायक शिक्षा झाल्या. त्या आठ वर्षांच्या बुद्धिमान मुलीला या सर्व शिक्षांपेक्षा समजावून सांगितले असते, तर कदाचित त्यांच्याबद्दल तिला तिरस्कार वाटला नसता! आपले बाबा आपल्याला एवढे का मारत आहेत, आपली आई आपल्याशीच का बोलत नाही, हे तिला मी सांगेपर्यंत समजलेले नव्हते. शाळेतील सर्वच तक्रारी बरोबरच होत्या असेही नाही. मुले कधी कधी खोट्या तक्रारी पण करतात. त्याची पडताळणी न करता त्यांच्यासमोर आपल्याच मुलीला मारणे, ही गोष्ट त्या छोट्याशा मुलीला खूपच लागली होती.
आता अनुज स्वत:चे दप्तर भरताना गाणी लावून नाचतो आहे. दहावीच्या ताणतणावातून दहापंधरा मिनिटे त्याने थोडी गाणी ऐकून नाचणे, तेसुद्धा दप्तर भरताना, यात काही गैर नाही. तेवढा विरंगुळा तर हवाच.
दुसरा भाग अभ्यासाच्या प्लॅनिंगचा. मूल अगदी एक वाचायला घेते तेव्हा ते बदलून दुसरे काही करायला लावले तर कदाचित त्याचा मूड बदलूही शकतो. एक तर त्याचे एकदाच व्यवस्थित टाइमटेबल करायला शिकवावे किंवा तो करू लागल्यावर टोकू नये. तसेच अक्षर कितीही खराब असेल तरी ते सुधारायच्या खूप पद्धती असतात. दहावीच्या मुलाला शुद्धलेखन लिहायला लावले तर त्याला कदाचित ते वेळ वाया घालवणे वाटू शकते.
कधी कधी पालक मी सांगितल्याप्रमाणेच अभ्यास कर असा अट्टहास ठेवतात. दहावी-बारावीत मूल गेल्यावर त्याच्याशी सामंजस्याने चर्चा करणे जास्त चांगले. या वयात आज्ञा केल्यास ती डावलली जाण्याची शक्यताच जास्त असते. आता राजा, जो पाच वर्षांचा आहे. ज्या पद्धतीने, ज्या टोनमध्ये त्याची आई त्याला बोलते, तसाच तो वडलांशी बोलला एवढेच! शेवटी मूलच ते, पोपटपंची करणारच!