आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थान आणि स्थौर्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न म्हणजे चारचौघांच्या साक्षीने सुरू केलेली जीवनगाण्याची मैफल असते. या गाण्यात दोघांचेही सूर लागणे महत्त्वाचे असते. एखादा बेसूर झाला तर या मैफिलीचा बेरंगच होतो. त्याने आणि तिने एकमेकांना सांभाळत समेवर येण्याची कसरत करायची असते. त्यातही मजा असते हे अनुभवयाचे असते. पण काहींच्या आयुष्यात पहिलाच सा असा काही बेसूर लागतो की समेवर येणे सोडाच, पण साधे सूरही जुळत नाहीत. सगळाच विचका होतो. स्वप्नांचा चुराडा होतो. संसाराचं गाणं सुरेल होण्यासाठी त्यात ‘मी’ आणि ‘अविश्वास’ यासारखे स्वर वर्ज्य करायचे असतात हेच दुर्लक्षिलं जातं. अखेर तुटेपर्यंत ताणल्या गेलेल्या अशा नात्याचं आयुष्य संपतं. शुभांगीताईच्या बाबतीत हेच घडलं. मनाविरुद्ध रेटून न्याव्या लागलेल्या त्या नात्याने, तिला समाजात विवाहित म्हणून स्थान दिलं. पण नात्यातून अपेक्षित असलेलं स्थैर्य, आधार मात्र तिला मिळाला नाही. शुभांगी आणि शरदला मी पहिल्यांदा भेटले तेव्हा बारा-तेरा वर्षांची असेन. ती माझी दूरच्या नात्यातली बहीण. तर माझ्या काकांच्या मित्राचा मुलगा म्हणजे शरद. पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडावं अशा शुभांगी आणि शरद या जोडप्याची पहिली भेट झाली तीही काकांकडेच. ताई सुंदर तर होतीच, पण ती लक्षात राहिली तिच्या तल्लख बुद्धिमत्तेमुळे. रसायनशास्त्रात डॉक्टरेट करणारी शुभांगीताई आणि एम.कॉम. झालेला शरद यांनी लग्नाचा निर्णय घेतला त्या वेळी सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. नव्याचे नऊ दिवस त्यांचा संसार ठीकठाक चालला. नंतर मात्र कधीतरी त्या दोघांमधल्या विसंवादाने टोक गाठलं. घटस्फोटापर्यंत वेळ येऊन ठेपली. शुभांगीताईचा अर्थातच घटस्फोटाला विरोध होता. मात्र तिला मानसिक रुग्ण ठरवून शरदने शेवटी घटस्फोट मिळवलाच. आज शरद दुसरं लग्न करून चांगल्या नोकरीत प्रतिष्ठित आयुष्य जगतोय. पण या सगळ्या प्रकाराने आत्मविश्वास गमावलेली, प्रचंड बुद्धिमत्ता असूनही परिस्थितीपुढे हतबल झालेली, शरदवरच्या प्रेमाखातर स्वत:च्या करिअरवर पाणी सोडणारी शुभांगीताई कुठे आहे, जिवंत तरी आहे की नाही हे कुणालाच माहीत नाही. खूप शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा कळलेला नाही. इतकं शिकलेल्या या मुलीची अशी परवड का व्हावी बरे?