आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईसाठी ABCDची चतु:सूत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्वितीय वर्ष कला शाखेत वैकासिक मानसशास्त्र या विषयात आम्हाला बाळंतपण, बाळाची वाढ या सर्वांबद्दलचे प्रकरण शिकवले गेले. शिकताना आम्हाला अनेक प्रश्न पडले आणि त्याचे निरसन करण्यासाठी आमच्या रुपारेल महाविद्यालयात प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांना बोलावण्याचे ठरवले. डॉक्टरांनी दोन तास ‘स्त्रीत्व : शारीरिक बदल आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान दिले आणि आमच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. असे उपक्रम सर्व महाविद्यालयांनी हाती घ्यायला हवेत, असेही प्रकर्षाने वाटून गेले.
डॉक्टरांनी अगदी मूलभूत बाबींपासून सुरुवात केली. बालपण आणि तारुण्य यामधील काळ म्हणजे ‘टीनएज’ (13 ते 19 वर्षे) या काळात शरीरावर जसे संस्कार होतील त्यानुसार भविष्यात त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम दिसतात. या काळात हार्मोन्समध्ये बदल तसेच एस्ट्रोजेन ज्याने शरीराची वाढ आणि देखभालीला मदत होते आणि प्रोजेस्टेरॉन ज्याने गर्भाशय तयार होण्यास मदत होते, त्यांचा स्राव होतो. मुलीचे स्त्रीत होणारे रूपांतर ही एक दिवसाची प्रक्रिया नसून त्यासाठी 8 ते 10 वर्षांचा काळ आवश्यक असतो. जसजसे मुलीचे वय वाढते तसतसे तिला उंचीत बदल, नितंब तसेच स्तनांची वाढ, त्वचेत जागवणारी लकाकी, बदलणारा आवाज हे बदल जाणवू लागतात. मासिक पाळीला सुरुवात होते, ज्यात पहिली एक-दोन वर्षे अनियमितपणा असतो तसेच रक्तस्राव जास्त असतो. दर महिन्याला अंडाशयातून एक अंडे बाहेर पडत असते आणि रजोनिवृत्तीचा (मेनोपॉज) काळ जवळ आल्यावर ही प्रक्रिया मंदावते. बीजांडातील रस (ओव्हम) आणि शुक्राणू (स्पर्म) एकत्र आल्यावरच गर्भधारणा होते.
साधारणत: या वयात मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते. प्रणयाशी संबंधित स्वप्ने पडतात. व्याख्यानादरम्यान मुलींनी अनेक प्रश्न विचारले, ज्यात प्रणयाशी संबंधित स्वप्ने पडणे चांगले की वाईट हा प्रश्न विचारला गेला.
डॉ. अश्विनी यांच्या मते अशी स्वप्ने पडणे अजिबात चूक नाही. या वयात स्वत:च्या नजरेत स्वत:चीच प्रतिमा बदलत असते, पालकांपेक्षा मित्रमैत्रीण जवळचे वाटतात, हे सर्व नैसर्गिक आहे. साधारणपणे तारुण्यात बहुतेकांना प्रियकर-प्रेयसी असतात. कधीकधी नकळतपणे मर्यादा ओलांडल्या जातात आणि मग भीती वाटते ती गर्भधारणेची. मग आधार घेतला जातो तो गर्भनिरोधक गोळ्यांचा किंवा कधी-कधी गर्भाशयातच गर्भाची हत्या केली जाते. विशेषत: या तंत्रज्ञानाच्या युगात असे गर्भपात प्रकर्षाने दिसून येतात. पुढचा प्रश्न हा होता की गर्भनिरोधक गोळ्यांनी शरीराला त्रास होतो का? डॉक्टरांच्या मते त्रास तर होतोच, परंतु त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. मासिक पाळीत नियमितपणा आणण्यासाठीदेखील या गोळ्यांची मदत घेतली जाते. डॉ. अश्विनी यांनी एक महत्त्वाची गोष्ट येथे नमूद केली की आय-पिल वा तत्सम गोळ्या फक्त तातडीच्या वेळी उपयोगी आणलेल्याच ब-या असतात.
पुढचा प्रश्न होता की प्रणयाच्या कल्पनांनी होणा-या पांढ-या स्त्रावाने काही अपाय होतो का? पांढ-या स्त्रावाने शरीराला अजिबात अपाय होत नाही. डोळ्यातून ओघळणारे अश्रू, पोटाला लागणारी भूक या सर्व गोष्टींइतकेच ते नैसर्गिक आहे. परंतु स्रावाचा रंग बदलला तर मात्र स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक ठरते. पुढची बाब म्हणजे लग्न. भारतात अजूनही अनेक मागासलेल्या भागात मुलींची लवकर लग्ने केली जातात, ब-याचदा अशा मुलींना लैंगिकतेबद्दल चुकीची किंवा अपूर्ण माहिती असते. त्यातच गर्भधारणा झाली तर घेतल्या जाणा-या काळजीच्या अभावाने बाळात दोष असू शकतात किंवा आई शारीरिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्याचे परिणाम बाळातही दिसू शकतात. एका मुलीचा प्रश्न होता की सोनोग्राफीने गर्भाला त्रास होतो का? डॉ. अश्विनींच्या उत्तरानुसार त्रास होत नाही, परंतु औषधे, क्ष-किरण यांचा गर्भावर परिणाम होतो. त्यामुळे गरोदर असताना डॉक्टरकडे जाताना नेहमी डॉक्टरांना गरोदर असल्याची माहिती द्यावी. वेदनारहित बाळंतपण हाही एक पर्याय आहे व तो जास्त खर्चीकही नसतो. भारत सरकारच्या नियमांनुसार लग्नासाठी मुलीला 18 वर्षे व मुलाला 21 वर्षे ही वयोमर्यादा आहे. मुलींसाठी हे वय कमी असते. कारण त्यांची शारीरिक व मानसिक परिपक्वता मुलांपेक्षा लवकर होते. साधारणत: 20 ते 30 वर्षे हे बाळंतपणासाठी योग्य वय आहे.
लैंगिक संबंध, गरोदरपणा, प्रसूती, बालसंगोपन या सगळ्या गोष्टींची भीती न वाटता तितक्याच आनंदाने या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले. जाता जाता डॉ. अश्विनी यांनी एक चतु:सूत्री पाळायला सांगितली ती म्हणजे ABCD
A अ‍ॅबस्टिनन्स म्हणजेच संयम
B जोडीदारासोबत विश्वासाचे नाते [बी फेथफुल टू युवर पार्टनर],
c कंडोमचा वापर
d स्वत: पण तितकीच काळजी घ्या [डू इट टू युवरसेल्फ]
या सल्ल्याने डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी आपले व्याख्यान संपविले. ‘स्त्रीत्व : शारीरिक बदल व आव्हाने’ या विषयाबाबत अनेक मुलींच्या मनात चुकीच्या कल्पना, भीती असते, परंतु डॉक्टरांनी तो सोप्या आणि साध्या शब्दात समजावून सांगितला.
मुलींना पडलेले काही प्रश्न
- एखादी स्त्री गरोदर आहे हे तुम्ही कसे निश्चित करता?
-काही बाळांचे लिंग स्त्री वा पुरुष निश्चित करता येत नाही, त्यांच्यात दोन्हींची कमीअधिक प्रमाणात लक्षणे आढळतात. हे बाळ जन्माला येण्याची प्रक्रिया काय असते?
-मासिक पाळी अनियमित का येते? ती नियमित कशी करता येते?
-अनेक स्त्रिया वयाच्या पंचविशीपर्यंत गर्भारपण निकराने टाळत असतात. आणि तिशीनंतर त्या मूल होण्यासाठी निकराने प्रयत्न करताना दिसतात. काय योग्य आहे व का हे आपण कसे ठरवावे?
-प्रसूतीच्या कळा मोजण्याचे काही माप आहे का? त्या वेळी किती वेदना होतात?
-नुकत्याच जन्मलेल्या बाळाला बांधून का ठेवतात?
-अंतराळात जाणा-या स्त्रियांना तिकडे पाळी येते का, की त्या पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधे घेतात?
-टीनएजमध्ये आम्हाला मुलांविषयी आकर्षण वाटते. त्याचा आमच्या अभ्यासावर/करिअरवर परिणाम होतो. हे कसे टाळावे?
-प्युबिक केस काढून टाकणे योग्य आहे का?
-पोटावर झोपल्याने वा इतर दबाव आल्याने स्तनांचा आकार वाढतो का?
‘मधुरिमा’च्या तरुण मैत्रिणी व मित्रांनो, तुम्हालाही असे काही प्रश्न आहेत का? ते कोणाला विचारावे असा प्रश्न पडलाय का? मग ते आम्हाला पाठवा, आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकरवी त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.