आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देणा-याचे हात घ्यावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी लग्न करून सासरी नगर येथे आले तेव्हाची म्हणजे अठरा - एकोणीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा या गावाचा म्हणावा तसा परिचय नव्हता. सारं काही अपरिचित, नवखंच होतं. कुठेही जाताना आम्ही दोघे प्रवास करत असल्याने कुठली नावं, पत्ते लक्षात ठेवण्याची गरज भासली नाही. एके दिवशी माझ्या माहेरहून पत्र आलं, आईची अचानक तब्येत बिघडली असून तिला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलंय अन् तुझी खूप आठवण काढतेय. आता मी इतक्या दूर. पत्र वाचताच आईच्या आठवणीने डोळ्यात पाणीच तरळले. केव्हा एकदा तिला भेटेन असे झाले.
दुस-या दिवशी मी एकटीच माहेरी निघाले. स्टँडवर पोचले. एकटीने प्रवास करण्याचा प्रसंग पहिल्यांदाच माझ्यावर आला. नाशिक गाडीची (व्हाया नगर - सोलापूर) वाट न पाहता पुढे मिळेल त्या गाडीने जाऊ पण वेळ नको वाया घालवायला, या उद्देशाने मी पंढरपूर गाडीत बसले, अन् टेंभुर्णीपर्यंतचे तिकीट काढले. सकाळी फक्त एक कपभर चहा घेऊन बाहेर पडलेली मी. तशातच मला दिवस गेलेले. तेव्हा सतत भोवळ यायची. पण मन घट्ट करून सारं काही सहन करत होते. केवळ आईला भेटण्याच्या ओढीने, धाडसाने एसटीत बसले. माझी सहप्रवासी असलेली बाई दोन छोट्या मुलांना घेऊन माझ्या शेजारी बसलेली. गाडी सुरू होऊन अर्धा-पाऊण तास झाला नसेल तोच या बाईने स्वत:जवळील शिदोरी उघडली. सकाळी दहाची वेळ असल्याने बहुतेक मुलांना भूक लागली असावी. स्वच्छ पांढ-या फडक्यात भाकरी, लाल मिरचीचे वाटण, अर्धीकच्ची शिजवलेली डाळ असा गावरान बेत. ही शिदोरी उघडून अर्धीअधिक भाकरी अन् कालवण मुलांच्या हातावर ठेवत माझ्याकडे पाहत म्हणाली, घ्या ना ताई, भाकर खाऊन घ्या. बाई अशिक्षितच पण दुस-याला देऊन खाण्याचा मोठा गुण तिच्यात होता. मनाचा मोठेपणाही होता. मला सतत चक्कर येत होती. जाम भूकही लागली होती. मी बाहेरचे पदार्थही खात नसल्याने काही घेण्याचा प्रश्नच नव्हता. माझा डबाही गडबडीत घरी विसरलेला. माझं चित्तच था-यावर नव्हतं. केव्हा एकदा आईला पाहीन असं झालेलं. डाळीच्या डब्याच्या झाकणात भाकरी अन् डाळ माझ्या हातात देत म्हणाली, पोटुशी हायेस न्हवं, मग तर तुला लेकरासाठी दोन घास खाल्लंच पाहिजे. एकलीच निघालीस जणू! सांभाळून जा बरं, तिच्या वात्सल्यरूपी शब्दांनी माझे मन भरून आले. डोळ्यातून अश्रू नकळत गालावर ओघळत होते. नको नको, मी घरून खाऊन आलेय, मला एसटी लागते, मी खोटंच सांगितलं. पण माझ्या चेह-यावरचे भाव जाणकार बाईने अचूक टिपले. भुकेल्याला अन्न देऊन दोन जिवांचा दुवा साधला तिने. तिने तिचा शेजारधर्म पाळला. तिला कड्याला (आष्टी) उतरायचं होतं. गाव यायला लागल्याबरोबर उतरण्याच्या गडबडीत असतानासुद्धा ती मला सतत बजावून सांगत होती, हळूच उतर हो, पायरीवर जपून पाय ठेव. तुला घरी पोचायला सांजचं सहा तर नक्कीच वाजतील बघ. तवा सुखरूप घरी पोच, आठवण ठेव. मी पण तिचे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केला. छोट्या मुलांच्या खाऊसाठी पैसे देऊ केले.
तिचे अनुभवी शब्द अजूनही माझ्या काळजाचा ठाव घेतात. जेव्हा जेव्हा मी माहेरी निघते तेव्हा एसटीत बसल्यावर तिची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. अगदी ताजा. ती कोण होती माझी? मी काय दिलं तिला? तिच्या मुलांशी मावशीच नातं जोडलं तिनं. लगेच आपलंसं केलं. काही तासांत जीव लावला. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी, दोघा पुन्हा नाही गाठ. असंच काहीसं झालं आमच्यात. आजतागायत तिची नि माझी भेट नाही. परंतु तिची क्षणिक सोबत मला बरंच काही शिकवून गेली. ती सोबत असताना एकटेपण नाही भासलं अन् ती निघून गेली तरी तिच्या आठवणीने ते जाणवू नाही दिलं. माझं गाव केव्हा आलं ते समजलं नाही. संध्याकाळचे सहा वाजले घरी पोचायला.
आईला पाहताच डोळे गच्च भरून आले. धावतच तिच्या कुशीत शिरले अन् इतके वेळ दाबून धरलेल्या अश्रूंना वाट मोकळी केली. तिला खूप आनंद झाला. माझं बाळ गं ते, म्हणून घट्ट मिठी मारली. अजूनही हा प्रसंग आठवला की गलबलून येतं, डोळे पाणावतात. आज आई या जगात नाही, अन् मायेने दोन शब्द बोलून प्रेमाने दिलासा देणारी ती बाईसुद्धा दृष्टीस पडली नाही. ती कुठे असेल तिथे सुखी राहू देत बिचारी, हीच प्रार्थना. संतांनी म्हटल्याप्रमाणे - सदासर्वदा देव सन्निध आहे।कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे।हेच खरं!