आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भस्रिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भस्रिका प्राणायाम हा दोन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे तंत्र वापरलेले आहे त्यावरून या प्राणायामाला ‘भस्रिका प्राणायाम’ नाव पडले. यामध्ये लोहाराच्या भात्याप्रमाणे पोटाच्या हालचालीने अत्यंत वेगाने व घर्षणयुक्त आवाजाने उच्छ्वास व श्वासक्रिया करावी लागते. ‘भस्रिका’ म्हणजे लोहाराचा भाता. उदरश्वसन व वक्षश्वसन या दोन्ही क्रियांना लाभदायक असा हा प्राणायाम आहे. म्हणूनच योगाभ्यास करताना हा प्राणायाम आवर्जून करावा, कारण ‘कपालभाती क्रिया’ व ‘उज्जयी प्राणायाम’ या दोघांचेही फायदे या एकाच प्राणायामामध्ये मिळतात.
सावधानता : नाकपुड्या चोंदलेल्या असल्यास, घसा, हृदय, फुप्फुसाशी निगडित गंभीर आजार असल्यास हा प्राणायाम करू नये किंवा तीव्रतेनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
पूर्वस्थिती:तळहातांनी गुडघे पकडा.पद्मासनात बसा.
कृती : पूर्ण श्वास घेऊन छाती फुगवावी. ती स्थिर करून पोट झटक्याने आत घेऊन उच्छ्वास करावा. पोट ढिले करून पुन्हा श्वास आत घ्यावा. अशी वेगवान वर्तुळे दमेपर्यंत करावी. नंतर साधारण 8 ते 10 श्वासांचा पूरक करावा. येथे दुसरा टप्पा सुरू होतो. पूरकाच्या शेवटी जिव्हाबंध व जालंधर बंद लावावा. नंतर लगेच नाभीखालील पोटाचा भाग आत खेचावा. सहजतेने ठेवता येईल तोपर्यंत या स्थितीमध्ये राहावे. नंतर जालंधरबंध, जिव्हाबंध सोडावे. डोके वर न्यावे व डाव्या नाकपुडीने सावकाशपणे श्वास सोडावा. येथे भस्रिकेचे एक आवर्तन संपते.
आवर्तने - पहिल्या भागामध्ये 20 उच्छ्वास श्वासांचे झटके देऊन नंतर पूरक, कुंभक (बंध लावलेली स्थिती) व रेचक (संथ उच्छ्वास) करावा. हे भस्रिका प्राणायामाचे 1 आवर्तन होते. सुरुवातीला 3 आवर्तने करावीत. हळूहळू सरावाने 30पर्यंत आवर्तने करावीत. पहिल्या टप्प्यामध्ये पोटांच्या हालचालींवर व दुस-या भागात पूरक रेचकाच्या वेळी श्वासावर व कुंभकामध्ये ओटीपोटावर लक्ष केंद्रित करावे व पापण्या बंद करून बुबुळे स्थिर ठेवावीत.
लाभ - कपालभाती व उज्जयी यांचे सर्व लाभ अंशत: याच्या अभ्यासाने मिळतात. एकाच वेळी वक्षश्वसन व उदरश्वसन यांची क्षमता वाढते. त्यामुळे दम लागणे, दमा, फुप्फुसांची कमजोरी इ. श्वसनासंबंधीचे दोष नाहीसे होतात.
हा प्राणायाम सर्व ऋतूंत करण्यास योग्य असून त्याच्या नित्य अभ्यासाने वात, पित्त व कफ दोष नाहीसे होतात. यकृत, प्लीहा, स्वादुपिंड आणि उदर पोकळीतले स्नायू बळकट होतात व पचनक्रिया सुधारते.