आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणीव अधिकारांची-5 यशोदेचा हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनघा आणि अरुण यांच्या लग्नाला बारा वर्षे झाली तरी त्यांना मूल होत नव्हते. तपासण्यांमध्ये कोणातच दोष सापडला नव्हता; परंतु मूल होत नव्हते. दोघांच्याही मनात मूल दत्तक घ्यावे, असे विचार येऊ लागले. आपल्याला मूल दत्तक घेण्यासाठी काय करावे लागेल? कुठे जावे लागेल? आपण कोणाचे मूल दत्तक घेऊ शकू? कुठलेही मूल दत्तक घेता येईल का? नात्यातलेच मूल दत्तक घेता येते का असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते.
हिंदू दत्तक व निर्वाह कायदा 1956 या कायद्यामध्ये वरील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली. कोणतेही हिंदू दांपत्य, हिंदू पुरुष अथवा हिंदू स्त्री मूल दत्तक घेऊ शकतो / शकते. यासाठी असलेल्या अटी अशा आहेत. दत्तक घेणा-या चे वय किमान 18 वर्षे असावे. तो मनाने निकोप असावा. विवाहित असल्यास मूल दत्तक घेण्यासाठी पतीची संमती आवश्यक आहे. पत्नीची संमती आवश्यक आहेच; पण पत्नी मनोरुग्ण असेल, तिने संन्यास घेतला असेल तर संमतीची गरज नाही.
हिंदू दत्तक व निर्वाह कायदा, 1956 अंतर्गत महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. 1956पूर्वी महिलांना दत्तक घेण्याचा, दत्तक देण्याचा किंवा दत्तक म्हणून जाण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार या कायद्याने त्यांना दिला आहे. आज कुठलीही स्त्री, मग ती विवाहित असो वा अविवाहित, घटस्फोटित असो वा विधवा, तिला मूल दत्तक घेता येते. विवाहित स्त्रीला पतीच्या संमतीने मूल दत्तक घेता येते, पण जर नव-या ने संन्यास घेतला असेल, त्याने हिंदू धर्म बदलून दुसरा धर्म पत्करला असेल तर संमतीची आवश्यकता नाही.
तसेच मुलाचे वडील मुलाला अथवा मुलीला दत्तक घेऊ शकतात; पण त्यासाठी पत्नीची संमती आवश्यक आहे. मुलाला वडील नसतील तर आई दत्तक देऊ शकते. आई आणि वडील दोघेही नसतील तर मुलाचे पालक दत्तक न्यायालयाच्या संमतीने दत्तक देऊ शकतात. जर मूल अनाथ असेल तर अनाथालयाचे जबाबदार अधिकारी किंवा चालक मुलाचे पालक मानले जाऊन ते मुलाला दत्तक देऊ शकतात.
मूल अनाथालयातून दत्तक घ्यावयाचे असेल तर त्यासाठी अर्ज केल्यानंतर समाजकल्याण विभागाचे आणि अनाथालयाचे कार्यकर्ते दत्तक घेणा-या दांपत्याकडे जाऊन ते कुटुंबाची तसेच त्यांच्या सांपत्तिक परिस्थितीची पाहणी करतात. खात्री करून मगच मूल दत्तक देण्यास तयार होतील. त्यानंतर दत्तक विधान स्टॅम्प पेपरवर तयार करून ती कागदपत्रे रजिस्टर करावी लागतील.
सर्वप्रथम आपण वैध दत्तक ग्रहणाचे आवश्यक नियम पाहू.
या कायद्याच्या कलम 6 नुसार -
दत्तक घेणा-या मनुष्याला दत्तक घेण्याची योग्यता आणि अधिकार असावयास पाहिजे. दत्तक देणा-या मनुष्यास दत्तक देण्याची योग्यता हवी. दत्तक मुलाची योग्यता हवी.
येथे योग्यता याचा अर्थ कायद्याने घालून दिलेल्या अटींत असावयास हवे. जेथे दत्तक घ्यावयाचे अथवा द्यावयाचे आहे तेथे दत्तक देणा-या / घेणा-या पालकाचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावयास हवे आणि मानसिकरीत्या तो स्वस्थ असावयास हवा. मुलीला अथवा मुलाला दत्तक म्हणून जावयाचे असल्यास त्याचे किंवा तिचे वय 15 वर्षांपेक्षा जास्त नको. तसेच - कलम 11नुसार दत्तक घेणा-या आई किंवा वडील यांना मुलगा, मुलाचा मुलगा, मुलाच्या मुलाचा मुलगा - रक्त नात्याने अथवा दत्तक नात्याने नसावा. दत्तक ग्रहण मुलीचे असेल तर दत्तक घेणा-या आई किंवा वडील यांना मुलगी किंवा मुलाची मुलगी नसावी.
जर दत्तक घेणारा पुरुष असेल आणि दत्तक ग्रहण मुलीचे असले तर या दोघांमध्ये कमीत कमी 21 वर्षांचे अंतर हवे म्हणजेच दत्तक घेणारा दत्तक पुत्रीच्या कमीत कमी 21 वर्षांनी मोठा असावा. जर दत्तक घेणारी स्त्री असेल आणि दत्तक ग्रहण मुलाचे असेल तर तिच्यात आणि मुलात कमीत कमी 21 वर्षांचे अंतर असणे आवश्यक आहे. एकच मुलगा दोन किंवा जास्त लोक एकाच वेळी दत्तक जाऊ शकत नाही. सिनेतारका सुष्मिता सेनने मुलीला दत्तक घेतले असे आपण वाचतो. अविवाहित मुलगी / महिला दत्तक घेऊ शकते का असा प्रश्न मनात येतो. या कायद्यानुसार हिंदू स्त्री जी मानसिकरीत्या स्वस्थ आहे, जी वयाने 18 वर्षांपेक्षा अधिक आहे, ती मुलाला अथवा मुलीला दत्तक घेऊ शकते. ती अविवाहित असेल तरीही ती दत्तक घेऊ शकते. याचाच अर्थ कोणत्याही स्त्रीला अविवाहित, विवाहित अथवा विधवा, मुलगा-मुलगी दत्तक घ्यावयाची असल्यास कायद्याने, कायदेशीर अटी पूर्ण करून ती दत्तक घेऊ शकते. या कायद्याच्या कलम 9 नुसार मुलाचे वडील, आई किंवा पालक यांच्याशिवाय कोणीही दत्तक देऊ शकत नाही. मुलाचे वडील असतील तर त्यांना एकट्यालाच दत्तक देण्याचा अधिकार आहे, पण आई असल्यास आईची अनुमती आवश्यक आहे. मुलाची आई एकटीच असल्यास, ती मुलाला दत्तक देऊ शकते. मुलाला आईवडील नसतील तर अशा मुलाला / मुलीला त्याचे पालक / पालनकर्ते कोर्टाच्या संमतीने दत्तक देऊ शकतील. कुठल्या मुलाला / मुलीला दत्तक म्हणून देता / घेता येईल ?
मुलगा किंवा मुलगी हिंदू असावयास हवे. तो / ती कुणाचाही दत्तक पुत्र / पुत्री नकोत, त्यांचे लग्न झालेले नसावे आणि त्यांचे वय 15 वर्षांच्या वर नको. वरील अटीप्रमाणे जर एखाद्या मुलाचे / मुलीचे दत्तक ग्रहण झाले तर ते कायदेशीर दत्तक ग्रहण मानले जाईल आणि दत्तक पुत्रास / मुलीस कायद्याने सर्व अधिकार प्राप्त होतील. दत्तक ग्रहणाची नोंदणी आवश्यक आहे. तसेच दत्तक देते वेळी ज्या घरात मुलगा / मुलगी दत्तक म्हणून जाणार आहे त्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती यांचा विचार लक्षात घेतला जाईल. मुलाच्या कल्याण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील आणि या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालय दत्तक घेण्याची परवानगी देईल.