आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहीण-भावांचे मैत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक जणींसाठी त्यांचा भाऊच त्यांचा पहिला नि खूप जवळचा मित्र असतो. विशेषत: त्या दोघांमध्ये दीड-दोन वर्षांचे अंतर असेल तर ही मैत्री खूप घट्ट असते. जेव्हा दोघा भावंडांच्या वयात चारपेक्षा अधिक वर्षांचं अंतर असतं तेव्हा मोठं मूल आई किंवा बाबाच्या भूमिकेतच वावरत असतं खूप काळ. त्या दोघांमध्ये भावंडांच्या नात्यापेक्षा मोठ्यावर लहान्याला सांभाळण्याची जबाबदारी आल्याने मूल व पालक असं नातंच अनेकदा दिसून येतं. पूर्वी जेव्हा एका घरात सहा- सात मुलं सर्रास असत, तेव्हा तर सगळ्यात मोठी मुलगी असेल तर ती दुसरी आईच होऊन जायची धाकट्या भावंडांची. मुलगा असेल तर बाप होऊन जायचा. जेव्हा हे वयातलं अंतर कमी असतं तेव्हा मात्र दोघं भावंडं खरेखुरे मित्र/मैत्रीण होतात एकमेकांचे, त्यांच्या नात्यात लहानमोठं कुणी नसतं. पण अशी, कमी अंतर असलेली मुलं जन्माला येणं हा ब-याचदा अपघात असतो, फार कमी वेळा ती ‘सुनियोजित’ असतात. अर्थात नियोजनबाह्य असली तरीही या मुलांना लहानपणापासून त्यांच्याच वयाची छान कंपनी मिळते आणि आईबापांसाठी दोन्ही मुलं एकदम मोठी होतात. तुमचा आहे का असा जवळचा घरातला मित्र किंवा घरातलीच जिवाभावाची मैत्रीण? की तुम्ही झाला होता तुमच्या भावंडांची आई किंवा वडील? कोणत्याच परिस्थितीत चूक किंवा बरोबर नाही, चांगलं किंवा वाईट नाही; पण वेगळेपणा नक्की आहे, नाही का?
‘तुझ्या डोळ्यांनी शोध’ वाचून ‘मधुरिमा’च्या दोन मैत्रिणींनी छान प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. एक म्हणते, आमच्या घरी हे नेहमीचंच आहे. त्यामुळे मी हल्ली सरळ दंड घेते ज्याची वस्तू मी शोधून देते त्याच्याकडून. आणि दुसरी म्हणते, वस्तू हरवली की ती मला सापडणारच हे गृहीत धरून नवरा व मुली मला मस्का मारतात तुलाच सगळं सापडतं म्हणून. पण आपली हरवलेली वस्तू शोधून द्यायला कोणी नसतं, हे दोघीही मान्य करतात.