आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhurima Cover Story About The Racism, Indians, Fairness Creams And Abhay Deol.

आपण रेसिस्‍ट नाही? की आहोत?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळ्यासावळ्या कृष्णावर आपण प्रेम करतो, पण नवरा वा बायकाे शोधताना हट्टाने गोऱ्या रंगालाच प्राधान्य देतो. काय विचार असतो यामागे? किती आयुष्यांचं या हट्टापायी नुकसान झालंय, याची जाणीव तरी आहे का आपल्याला? या संदर्भात फेसबुकवर अभिनेता अभय देओलने  गाजवलेल्या अभियानाविषयी ही कव्हर स्टोरी, त्याच्याच शब्दांवर आधारित.

भारतात, विशेषकरून मुंबई, पुणे व दिल्ली या शहरांमध्ये शिक्षणासाठी हजारो परदेशी विद्यार्थी राहतात. हे गोरे, काळे, पिवळे, सावळे आणि इतर रंगांचे वा वर्णांचे आहेत. खुद्द भारतात गोऱ्या ते काळ्या यामधल्या लाखो छटांच्या वर्णाची माणसं राहतात, राहात आली आहेत. तरीही अनेक वर्षांपासून गोरा रंग आणि सौंदर्याची एक संगत घातली गेली आहे.

पिढ्यान‌्पिढ्या आपल्या मनावर गोरा चांगला, सुंदर व सकारात्मक; तर काळा वाईट, कुरूप, नकारात्मक असे संस्कार झाले आहेत. पदोपदी हे असं नाही, गोऱ्या रंगाची व्यक्ती काळी कृत्यं करते, काळ्या रंगाची व्यक्ती चांगली असते, हे आपण अनुभवत असतो; तरीही रंगांवर आधारित वर्तणूक आपण बदलू शकत नाही. या सगळ्याला जाहिराती, चित्रपट, कथाकादंबऱ्या खतपाणीच घालत असतात. हे बदलायला हवं, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले आहेत.

आपण असं वागतो, ते अन्यायकारक, अमानुष, क्रूर आहे, हे जाणवलेल्या काही व्यक्ती व संस्था यासंबंधी काम करत आहेत. फेअरनेस क्रीम्सच्या जाहिरातींमुळे आपल्या मनातल्या गोरेपणाचं वेड अधिक फोफावतं, हा सर्वात मोठा आक्षेप. या क्रीम्समुळे त्वचेवर व शरीरावर किती दुष्परिणाम होतात, हा आणखीनच वेगळा मुद्दा. (याविषयी मधुरिमाची १४ जून २०१६च्या अंकातली ‘गोरं बनवण्याचा काळा धंदा’ ही कव्हर स्टोरी वाचकांच्या लक्षात असेलच.) पण ‘गोरा रंग चांगला/हवासा आणि काळा रंग वाईट/नकोसा’ हा या सगळ्याच्या मुळाशी असलेला आपला गंड, विचार, विश्वास, अट्टाहास तोच चुकीचा आहे. तो बदलायला हवा.

भारतात शिकत असलेल्या विशेषकरून परदेशी कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना अतिशय मानहानीकारक वागवलं जातं, त्यांना भाड्याने घरं दिली जात नाहीत, त्यांना शिव्या घातल्या जातात, प्रसंगी शारीरिक हिंसाही सहन करावी लागते. दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या अशा मारहाणीच्या प्रकरणामुळे हा विषय नव्याने चर्चेला आला. त्यात, एका मंत्रीमहोदयांनी ‘आम्ही वर्णद्वेषी नाहीच, आम्ही नाही का त्या काळ्या दाक्षिणात्यांना आनंदाने स्वीकारत,’ असा सवाल करून वर्णद्वेषी असल्यावर शिक्कामोर्तबच केलं. या सगळ्यावर अभिनेता अभय देओलनं त्याच्या फेसबुक पेजवर एक अभियान सुरू केलं. त्याच्याच व्यवसायातील त्याच्या सहकाऱ्यांवर, जे फेअरनेस क्रीम्सच्या जाहिरातींच्या माध्यमातून गोरेपणाचा अट्टाहास विकतात, टीकेची झोड उठवली. त्याने ही टीकाही मुद्देसूद केलीय, ती नेमकं काय चुकतंय यावर बोट ठेवणारी आहे. अभिनेत्यांनी अक्कल शिकवू नये आम्हाला, असं आपण म्हणूही शकतो. पण मग ते जाहिरातींमधनं जे सांगू/विकू पाहतात, ते आपण स्वीकारतोच ना?
 
अभय देओलने त्याच्या फेसबुक पेजवर मांडलेल्या विचारांचा हा मराठी अनुवाद त्याच्या विचारांतली स्पष्टता दाखवतोच, परंतु माॅडेलिंग करणाऱ्या अभिनेत्यांविषयीही टिप्पणी करतो.
काय लिहितो तो?
आपला देश रेसिस्ट अर्थात वंशवादाला विरोध करणारा नाही.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कदाचित; पण मी हे सिद्ध करतो पाहा.
जॉन अब्राहमची ती जाहिरात तुम्ही बघितली असेलच. ज्यात त्याच्या हातात एक शेडकार्ड अाहे. गोऱ्या रंगाकडून काळ्या रंगाकडे जाणाऱ्या सगळ्या शेड्स त्यात दिसतात. तुम्हाला गोरं बनवण्याचं प्रॉमिस करत जॉन तुम्हाला डार्क रंगाकडून उजळ रंगाकडे जाण्यासाठी संबंधित कंपनीचं क्रीम कसं योग्य आहे, हे पटवून देतो. आणि त्या क्रीमच्या बॉक्सवर ते क्रीम त्वचेतली आर्द्रता टिकवण्यासाठी आहे, असा उल्लेख केलेला असतो.
 
ग्राहकांना गोऱ्या रंगाची भुरळ घालणाऱ्या अशा अनेक जाहिराती आजकाल निघालेल्या आहेत. अनेक वधूवरसूचक मंडळांच्या जाहिरातीसुद्धा याच वर्गात मोडणाऱ्या आहेत. उजळ वर्णाला जाणीवपूर्वक झुकतं माप देणारी ही मानसिकता आपण झुगारून द्यायला हवी. वर्णभेदाला खतपाणी घालणाऱ्या अशा उत्पादनांचा लोकांनीही आंधळेपणानं स्वीकार केलेला दिसतो. मग मला सांगा, आपला देश वर्णभेदाला, वंशभेदाला विरोध करतो असं आपण म्हणू शकतो?
तुम्ही स्वत:शीच याचा सारासार आणि प्रामाणिकपणे विचार करा. वास्तविक लोकांनीच अशी उत्पादनं विकत घेणं थांबवायला हवं. कारण कुणीही तुम्हाला येऊन सांगणार नाही की, अमुक एक आश्वासन खोटं आणि फसवणारं आहे म्हणून. एखाद्याच्या रंगाबद्दल बोलताना डस्ट (धूळ) या शब्दाचा किती सहजपणे वापर केला जातो, हे जरा आठवून पाहा. अर्थात एखाद्याच्या दिसण्यावरून, त्याच्या रंगरूपावरून त्याचं मूल्यमापन करणं थांबायला हवं. हे कुणा एकट्याचं काम नाहीच. पण आपण प्रत्येक जण आपल्या कुटुंबापासून तर त्याची सुरुवात नक्कीच करू शकतो नं?
 
नंदिता दास ही अभिनेत्री काही वर्षांपासून या गोरेपणाच्या हट्टाच्या विरोधात बोलतेय. तिचा उल्लेख अभय कौतुकाने करतो, पण उपहासात्मक.
‘सध्या प्रत्येक जण जिथे गोरं होण्यासाठीच्या शर्यतीत पळतो आहे तिथं एक बिचारी नंदिता दासच अशी आहे की जी म्हणतेय, काळं-सावळं असण्यातही सौंदर्य आहे. मग तिला आपण काय म्हणणार? तिला हे माहीतच नाही का की, आपल्याला याची जाणीव आधीपासूनच आहे. म्हणूनच आपण दक्षिणात्य लोकांनाही स्वीकारलंय, याची तिला कल्पना नाहीये का?’
 
तर, शाहरूख खानच्या जाहिरातीचं उदाहरण देत, अभय गोरेपणासाठीची उत्पादनं जेंडर बायस्ड कशी असू शकतात, असा सवाल करतो. एक पुरुष असूनही तुम्ही अजून महिलांसाठीची फेअरनेस क्रीम वापरता का, असं म्हणण्यातून आपल्याला काय दर्शवायचंय? गोरी आणि उजळ त्वचा म्हणजेच सुंदर त्वचा, या खुळचट कल्पनेतून आपण कधी बाहेर येणार आहोत, असं तो विचारतो. कलाकार मंडळींनी अशा जाहिराती करण्याबद्दलही अभयने आपल्या पोस्टमध्ये खेद व्यक्त केला आहे. तो म्हणतो, कलाकार त्यांच्या चाहत्यांसाठी आदर्श असतात. त्यामुळे कलाकारांनी कुठल्याही विषयाबाबत वक्तव्य करताना, जाहिरात निवडताना सामाजिक भान ठेवायला हवं. त्यांनी अशा फसवणूक करणाऱ्या उत्पादनांचा प्रचार करू नये.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, फसव्‍या फेअरनेस क्रिम्‍सच्‍या जाहीरातींबद्दल...
 
बातम्या आणखी आहेत...