आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhurima Guest Editor Chandatai Tiwadi Life Experence Madhurima Guest Editor Chandatai Tiwadi Life Experience

भारुडाचा पहिला कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या सासऱ्यांचे तीसएक वर्षांपूर्वी निधन झाले. कमीत कमी सहा महिने तरी घराच्या बाहेर पडण्याची मुभा त्या काळी नव्हती; परंतु सासरे गेल्यानंतर सव्वा महिन्याच्या आतच आषाढी यात्रेच्या वेळी कोपरगाव (रुई) येथील बाबुराव साळुंखे आणि नामदेव बावळे या ज्येष्ठ व्यक्ती भजन- भारुडाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा मी घरची परिस्थिती सांगून कार्यक्रमास नकार दिला. बराच वेळ टाळाटाळ करत होते; पण मग माझ्या सासूबाई मध्ये पडल्या. जुन्या चालीरीतींना मुरड घालत त्या म्हणाल्या, ‘अगं, एका धार्मिक कार्यक्रमासाठी ते बोलावत आहेत ना तुला, मग का तू नकार देतेस. तू कुणाच्या लग्नसमारंभाला तर जात नाहीयेस. परमेश्वराचे नामस्मरण कुठेही केले तरी ते पवित्र आहे.’ त्यामुळे ‘ती कार्यक्रमाला अवश्य येईल, तुम्ही चिंता करू नका, निर्धास्त तयारीला लागा,’ असेही त्यांनी या पाहुण्यांना आश्वस्त केले.
श्रावणात कार्यक्रमाची तारीख जवळ आली. भजनी मंडळातील सर्व महिलांनी शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जायला मिळेल या उत्साहाने तयारी केली. एसटीचा प्रवास करून आम्ही सगळ्या नगर जिल्ह्यातल्या रुई या गावी मुक्कामी पोहोचलो. रात्री नऊच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली. समोर दहा हजार श्रोत्यांची उपस्थिती आणि जिल्ह्याबाहेरचा पहिलाच कार्यक्रम असल्याने आमच्यावर थोडे दडपण होते.
श्री विठ्ठलाच्या नामस्मरणाचा गजर करत पंचपदी व एक तास भजनाची सेवा केली. ज्या वेळी भारुडासाठी उभी राहिले तेव्हा ग्रामस्थांनी डोक्यापासून पायापर्यंत उंचीचा विविध फळांचा समावेश असलेला हार माझ्या गळ्यात घातला. तेव्हा डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार या भारुडाने सुरुवात केली. त्यानंतर विंचू चावला, दादुला, बुरगुंडा, वेडी, भूत अशा भारुडांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
त्यानंतर आजवर चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक ठिकाणी कार्यक्रमाची संधी मिळाली. मध्य प्रदेश, उत्तर भारत, हरियाणा, आंध्र प्रदेश, राजस्थान गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा आदी राज्यांतूनही कार्यक्रम केले. नुकतीच मी मलेशिया, सिंगापूर व दुबई येथेदेखील जाऊन आले.

लेखिका भारूडसम्राज्ञी आहेत.
(शब्दांकन - महेश भंडारकवठेकर)
बातम्या आणखी आहेत...