आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास : जगण्याचं प्रतिबिंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानदुखीमुळे स्मरणीय
—संगीता हिरेमठ, सोलापूर
दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या सुटीत मुलांबरोबर कोल्हापूरला जायचे ठरवले. तिथून गणपती पुळ्याला जाण्यासाठी एसटीमधून प्रवास करू लागलो. अंबा घाट चढताना गाडी वळणामुळे हेलकावे खाऊ लागली. त्यात माझ्या पतीच्या खांद्यावर वरून एक बॅग पडली. मग थोड्या वेळातच त्यांचा कान खूप दुखायला लागला. त्यांना ती वेदना सहन होईना. बसमध्ये काय करावे हे मला सुचेना. आम्ही रत्नागिरीला उतरून दवाखान्यात जायचे ठरवले. भीतीने एव्हाना माझ्या पोटात दुखायला लागले. माझ्या पर्समध्ये दातदुखीवर असलेली वेदनाशामक गोळी होती. डाॅक्टर मेव्हण्यांना फोन करून विचारलं आणि ती गोळी पतीला दिली. अर्ध्या तासाने त्यांचा कान दुखायचा थांबला. या सगळ्या गडबडीत माझी पोटदुखी कधी थांबली हे माझे मलाच कळाले नाही. त्यानंतर पुढचा सर्व प्रवास व्यवस्थित पार पडला.गणपतीपुळ्याला बाप्पाचे दर्शन घेऊन परतलो.

... आणि रेल्वे घसरली
—स्नेहल दीक्षित, औरंगाबाद
मागच्या मेमध्ये मी माझा मुलगा, मुलगी व नातीसह जगन्नाथ पुरीला जात होते. पुरी दोन तासांवर आलेले असताना रेल्वेचा वेग अचानक वाढला. प्रचंड खडखडाटात रेल्वे अगदी नावेसारखी डोलत होती. डब्यात अचानक खूप धूळ आली. काही तरी वेगळे होत असल्याचा अंदाज आल्याने, मी माझ्या मुलास साखळी ओढून रेल्वे थांबवण्यास सांगितले. गाडी थांबताच खाली उतरून पाहतो तर काय, आम्ही बसलो होतो तो डबा व आणखी एक डबा असे दोन डबे रुळांवरून घसरले होते. साखळी ओढून रेल्वे थांबवल्याने मोठा अनर्थ टळला होता. सुदैवाने कोणी जखमी झाले नव्हते. घटनेबाबत कळताच काही सामाजिक कार्यकर्ते पाणी पाउचसह धावून आले. घसरलेले डबे घटनास्थळी सोडून थोड्या वेळाने रेल्वे जवळच्या अनुगुल स्थानकावर पोहोचली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सर्वांची आस्थेने चौकशी करून दुसऱ्या रेल्वेने सर्वांना पुरीकडे रवाना केले. पुढचा दहा दिवसांचा प्रवास निर्विघ्न पार पडला. अवघ्या चार तासांच्या त्या नाट्यमय घटनेमुळे ओडिशातील अनुगुल हे छोटेसे गाव व गावकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी सदैव लक्षात राहील.
एकमेकां साह्य करू
—रुख्मिणीबाई साबू, सोलापूर
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे माहेर इंदूरला आहे. मी माझ्या तीन मुलींना घेऊन सोलापूरहून तिथे चालले होते. तेव्हा पोहोचायला तीन दिवस लागत होते. सोलापूर ते दौंड, दौंड ते मनमाड, मनमाड ते खांडवा, खांडवा ते इंदूर अशा चार ट्रेन बदलून जावे लागत असे. मी खांडव्याहून इंदूरच्या ट्रेनमध्ये बसले होते. अचानक माझ्या लहान मुलीची तब्येत बिघडली. तिला उलट्या होऊ लागल्या. मला काय करावे सुचत नव्हते. मी आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात एक व्यक्ती देवदूतासारखा मदतीला धावून आला. तो मिल्ट्रीमॅन होता. त्याने माझ्या मुलीसाठी मीठ, साखर पाण्यात घालून दिले. मला धीर दिला. ताई, तुम्ही काळजी करू नका, ती ठीक होईल, असं म्हणत मला धीर दिला. त्याला दिल्लीला जायचे होते. आमच्यासाठी त्याने स्वत:ची गाडी चुकवली. त्याच्यामुळे आम्ही घरी सुखरूप पोहोचलो होतो.
उमेद देणारा प्रवास
—मंगेश जाधव-पाटील, यवतमाळ
सुट्या सुरू झाल्यानंतर मी आणि मित्र महाबळेश्वरला निघालो. माझे लक्ष माझ्या जवळ बसलेल्या माणसाकडे गेले. तो १६-१७ वर्षांचा व अंध होता. तो सध्या एका अंध विद्यालयात अकरावीत शिकत होता. त्याच्या विद्यालयात सुमारे साडेचारशे अंध विद्यार्थी होते. ही अंध माणसं कशी जगत असतील या विचारानं माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. मी ठरवलं की, या विद्यालयाला आणि तेथील विद्यार्थ्यांना भेट द्यायची. मी विद्यालयात गेलो, तेव्हा सर्व विद्यार्थी अभंग म्हणत होते. मी त्यांच्यात रमलो, पण अचानक वीज गेल्यानं अंधार झाला. मी म्हणालो, ‘अरे! लाइट गेली वाटतं.’ माझ्या या वाक्यानंतर जवळच बसलेला एक मुलगा म्हणाला, ‘काय करणार, आम्हाला तर आयुष्यभर अंधारच आहे. आम्हाला प्रकाश कसा असतो तेही माहीत नाही.’ तो मुलगा केविलवाण्या चेहऱ्याने हसू लागला. पण ते हास्य दु:खाचं होतं. हा प्रसंग माझ्या मनाला भावला. हे शरीरच आपली संपत्ती आहे. मग कशाला मृगजळामागे धावायचे? दु:ख येणारच आहे. पण हे दु:ख उराशी कवटाळायचे नाही. हा धडा मी शिकलो. आजही जेव्हा दु:खी होतो तेव्हा ‘त्या’ अंध मुलांना आठवतो. त्यामुळे मला जगण्याची उमेद मिळते. मी केलेला प्रवास आगळा होता.

हरवलेले गुहागर
—मधुरा उटगीकर, सोलापूर
मी, माझा नवरा, ८-९ वर्षांचा मुलगा आणि माझे आई-वडील, कोल्हापूरहून कार भाड्याने घेऊन कोकणात गेलो होतो. रत्नागिरी, पावस करून गुहागरला मुक्कामाला जाणार होतो. आमचा ड्रायव्हर कोल्हापूरचा असल्याने आम्हाला वाटलं त्याला रस्ते माहीत असतील. म्हणून आम्ही शाॅर्टकट निवडला. सूर्यास्त नुकताच झाल्याने अजून संधिप्रकाश होता. मजेत प्रवास चालला होता. बराच वेळ झाला वाटेत एकही गाव, वस्ती लागली नाही. माणसांची वर्दळ नाही. खूप वेळात एकही गाडी पास झाली नव्हती. मैलाचे दगड नव्हते. त्यामुळे गुहागर अजून किती लांब आहे, आमचा रस्ता बरोबर आहे की नाही, काहीच कळत नव्हतं.
आता गुडूप अंधार पडला होता. गाडीच्या लाइटमध्ये दिसत होता तेवढाच रस्ता. आमचे गाडीतले आवाज बंद झाले. आम्हाला टेन्शन आलं. त्यात ड्रायव्हरने भर घातली. तो म्हणाला, ‘कोकणात चोऱ्यामाऱ्या होत नाहीत. पण इथे चकवा लागतो. चकवा लागला तर आपण सकाळपर्यंत इथेच चकरा मारत राहू.’ आणि अचानक एक वळण घेतल्यावर रस्त्यावर मिणमिणते दिवे दिसले. एक-दोन बंद दुकानं दिसली. जिवात जीव आला. चार-दोन माणसं दिसली. त्यांना विचारलं, ‘भाऊ, गुहागर अजून किती लांब आहे?’ तो म्हणाला, ‘हे काय, हे गुहागरच आहे.’ घ्या! आम्ही कल्पना केली होती की गुहागर बऱ्यापैकी मोठं गाव असेल. आणि हे तर छोटं खेडेगाव वाटत होतं. आम्हाला अंधारात हरवलेलं गुहागर शोधून काढेपर्यंत घाम फुटला होता!

बहुजन सुखाय (?) एसटी
—स्मिता जोशी, औरंगाबाद
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुटीत ओंकारेश्वरला जाण्याचा बेत अचानक ठरला. ऐन वेळी खासगी गाडी, रेल्वे आरक्षण न मिळाल्याने एसटीने भुसावळ, खांडवा मार्गे ओंकारेश्वरला जाण्याचे ठरले. बसस्थानकावर पोहोचलो, तो भुसावळची बस लागलेली दिसली. जागाही मिळाली. पण बस सुटत असताना, थेट बुऱ्हाणपूरची बस लागलेली दिसली. त्यामुळे बसमधून उतरून त्या थेट बसमध्ये बसलो. कंडक्टर तिकीट घ्यायला येईपर्यंत बस औरंगाबादच्या बाहेर पडली होती. कंडक्टरला बु‍ऱ्हाणपूरचे तिकीट मागितले तर तो म्हणे की बस बुऱ्हाणपूरला नाही, जळगावला जाते आहे. जळगावची पाटी नव्हती, म्हणून बुऱ्हाणपूरची पाटी लावली. अखेर सिल्लोडला उतरून बस बदलायचे ठरवले. भुसावळची बस मिळाली. पण भुसावळ अर्ध्या तासावर असताना ही बस फेल झाली.
कंडक्टरने मागून येणाऱ्या बसमध्ये सगळ्या प्रवाशांना बसवून दिले. भुसावळला पोहोचताच रेल्वेस्थानक गाठले आणि पुढचा सगळा प्रवास रेल्वेने विनाअडथळा पूर्ण केला. अवघ्या चार तासांच्या प्रवासात चार वेळा एस टी बदलावी लागल्याने हा प्रवास चांगलाच लक्षात राहिला.

तो भयकंपित करणारा क्षण
— वैशाली शेंड, अमरावती
नगरहून पुण्याला जाताना संध्याकाळी ६.४५ला गाडी नगरवरून सुटली. ड्रायव्हरला नवीन हायवेच्या पुलाजवळ (छत्री तलाव) येथे थांबवाल, असे सुचवून आम्ही झोपलो. सकाळी ३.५०ला गाडी पुलाजवळ थांबली. चला पूल आलाय, उतरा. आम्ही त्या काळोखात नीट बघू शकत नव्हतो. शंका वाटली. आम्ही उतरलो. उतरून दिल्यानंतर गाडी भरधाव वेगाने निघून गेली. त्या अंधारात मी आणि माझा मुलगा घराकडे जाण्याचा रस्ता शोधू लागलो. तर लक्षात आले की, छत्री तलाव पुलापासून १० किमी दूर उतरलोय.
पुलाचे काम चालू असल्यामुळे कामगारांच्या झोपड्या होत्या. कुणी आपल्याला काही करणार तर नाही ना. सारं अंग भयाने थरथरू लागलं. मुलगा रडवेला झाला. हिंमत एकवटून १० मिनिटं त्याच हायवेवर देवाचे नाव घेत उभे राहिलो. तेवढ्यातच तिथून जाणाऱ्या एका दुसऱ्या कंपनीच्या बसला हात दाखवून थांबवले. झालेली हकीकत सांगून छत्री तलावाजवळ उतरून देण्याची विनंती केली. त्यांनी आम्हाला जिथे उतरायचे होते तिथे सुखरूप उतरवून दिले. हा अनुभव आठवला की ‘जगात चांगली माणसं आहेत अजून,’ यावरचा विश्वास आणखीनच दृढ होतो.

गाडी सुटली, पण...
— रेवा जोशी, औरंगाबाद
तीन वर्षांपूर्वी उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही गुजरातच्या सहलीला गेलो होतो. आठ दिवसांची मस्त सहल करून आम्ही रेल्वेने औरंगाबादकडे परत निघालो. गप्पांमध्ये आमच्या जवळचे पाणी कधी संपले ते कळलेच नाही. सुरत स्थानकावर रेल्वे थांबली, तेव्हा मामा पाणी आणण्यासाठी उतरला. पण तो पाण्याच्या बाटल्या विकत घेत असतानाच रेल्वे सुरू झाली. रेल्वे सुटली पण मामा आला नाही म्हणून मी खूप घाबरले. रेल्वेचे डबे आतून जोडलेले असतात, हे त्या वेळी मला मुळी ठाऊकच नव्हते. आई, आजी सोबत होत्या, त्या मला समजावत होत्या. तोच मामा आला आणि माझे मलाच हसू आले.

अचानक घडलेला प्रवास
— जया सानप ¿ बीड
६ एप्रिल २०१४ चा तो दिवस. आईशी फोनवर बोलत होते. ‘आई, तू कधी येणार आहेस बाळाला बघायला? आता दोन महिन्यांची झाली आहे छकुली.’ त्यावर आई म्हणाली, ‘कशी दिसते गं ती. ितला पाहण्याची खूप इच्छा होतेय.’ आई किडनीच्या त्रासाने ग्रासलेली असल्याने तिला त्या वेळी माझ्याकडे येणे जमत नव्हते. असं बोलणं झाल्यावर मी फोन ठेवला. दोनच तासांनी आई गेल्याचा फोन आला. दोन मुलांचे दिसतील ते कपडे बॅगेत भरून आम्ही निघालो. दु:खाचा डोंगर कोसळला होता. तीन तासांचा प्रवास तीन वर्षांसारखा वाटू लागला. बालपणापासून सकाळच्या बोलण्यापर्यंतच्या सगळ्या आठवणी चलचित्रपटासारख्या डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. या अंधकारमय प्रवासातील प्रत्येक क्षण मला आठवतो. हा अनुभव मी कधीच िवसरणार नाही. मनाच्या एका कोपऱ्यात त्यानं कायमचं घर केलं आहे. मधुरिमाने विषय दिल्यामुळे हा दुखरा कोपरा कागदावर उतरवता आला. यामुळे मनही थोडे हलके झाल्यासारखे वाटतेय. शतश: आभार.

मधुरिमा कट्टा आजचा विषय—
लग्नानंतर अनेक मुली सासूला आई म्हणू लागतात. ते ‘अहो आई’ असतं अनेकदा, अगदी क्वचित ते ‘अगं आई’ असंही असू शकतं. सासूला आई हाक मारल्याने नातं अधिक प्रेमाचं होतं का? त्यात अधिक जवळीक निर्माण होते का? काय वाटतंय तुम्हाला? पुढच्या शुक्रवारच्या आत लिहून पाठवा, शब्दमर्यादा आहे १५०.

आमचा पत्ता—
मधुरिमा, दैनिक दिव्य मराठी, १५२९५, मोतीवाला काॅम्प्लेक्स, जालना रोड, औरंगाबाद - मेल आयडी आहे madhurimadm@gmail.com, फॅक्स क्रमांक - ०२४०-२४५३५०३