आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंवारजान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगप्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर, लहानपणी तिच्यावर झालेल्या पुरुषी जुलमाचा परिणाम म्हणून आजही तिला रस्त्यावरच्या एखाद्या पुरुषाला किती वाजलेत इतकेही विचारण्यास धाडस जमवावे लागते, असे सांगते तेव्हा आपल्या कर्माला काय म्हणावे? ती तिच्या वडिलांकडून कला शिकली, तिचे साथीदार काही सारेच स्त्री कलाकार असल्याचे ऐकिवात नाही. तिचे बोल खरे असतील तर मग गुरू किंवा साथी पुरुष असताना ती एका मानसिक भयाशी सामना करतच साधना करत आली आहे असे होईल.

परदेशात पोपमहाराजांच्या राजीनाम्याची बातमी गाजते आहे. धर्मगुरूंची अनैतिक प्रकरणे, एकंदरीतच पारंपरिक ख्रिश्चनतेच्या तुलनेत आधुनिक चर्चला वाढता प्रतिसाद असे आणखीही चिंतेचे विषय आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोणी एक लेखिका म्हणते, कुमारी मेरी कुमारी नव्हतीच! काही भुवया उंचावलेल्या, काहींच्या डोळ्यांत मिस्किल चमक. पण या लेखिकेला कुणी खोडून नाही काढलेले.
वार्तेत धक्कादायक काही नाही. कुंतीचे कुंवारपण जपून पुत्राला जन्म देणे किंवा गांधारीचे अगदी शंभरांना एकत्र जन्म देणे हे सुशिक्षितांना असंभवच वाटते. मग कौरवांचा जन्म हा जगातला पहिला टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग असे कुणीतरी मांडतो, किंवा पंडूच्या क्षमता वंशवृद्धीस पुरेशा नव्हत्या म्हणून कुंतीसाठी ती योजना, प्रत्यक्ष देवांद्वारा अर्थात अ-व्यभिचारी पुत्रप्राप्ती, संसार मोडण्याचे भय नाही असे तर्क कुणी लढवतो, तेव्हा असंभव वाटले तरी त्यातला नैसर्गिक सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न बघून असे विचार उचलून धरले जातात.
एकीच्या होऊ घातलेल्या सास-या ंचा आग्रह की लग्नाआधी मुलीची वैद्यकीय चाचणी व्हावी, योनिशुचिता हवी. वधूचे भावविश्व तिच्यावर अविश्वास दाखवून आपण उधळून लावतो आहोत याचा विचार? कुणी हट्टासाठी म्हणूनसुद्धा वरानेही अशा प्रकारच्या दिव्याला सामोरे जावे म्हणणार नाही. एकदा का दुग्धपानक्षम बनले की त्या स्तनांचा आकार बदलतोच. पंडूला काय एवढे कळले नसेल होय? एक जाणकार मला म्हणाले. सौभाग्यकांक्षिणीचे कौमार्य हा इतका महत्त्वाचा मुद्दा? पुरुषांसाठी अशी काही चाचणी असते? या माझ्या प्रश्नांना त्यांनी साळसूदपणे बगल दिली तत्क्षणी माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. पुरुष स्त्रीचे करतात तितके निरीक्षण स्त्रियांनी पुरुषांचे केलेले आढळते का? माझ्या एका अभ्यासू मित्राने स्त्रीचे ओठ ही पुरुषासाठी आव्हानात्मक चीज असतेच या मताचा पुरावा म्हणून पाचपन्नास मदालसांच्या ओठांची छायाचित्रे माझ्याकडे निरीक्षणार्थ पाठवली. त्यात आव्हानात्मक काय ते मला कळले नाही. संगणकीकृत विश्लेषण करावे असे म्हटले तेव्हा बहुतेक ‘ते’ आव्हान पुरुषांसाठी असल्याने मला जाणवणारच नाही, किंवा स्त्रीला तसा अनुभव शक्य नसल्याने मी ‘ती’ भावना अनुभवू शकणार नाही असे म्हणाला. म्हणजे स्त्रियांकडे बघून असं होतं नि तसं वाटतं हा अनुभव तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून घेता. मग ती भावना तुमच्यात निवासाला येते. पुरुषांनी असे अनुभव घेण्यास समाज अनुकूल. स्त्रीवर अनुरक्त होण्याची भावना पुरुषावर राज्य करते तेव्हा तिकडेही लोक अभिमानाने पाहणार. त्या स्त्रीसाठी तो अभिमानविषय असे बिंबवणार. मग एखादीला हे मान्य होत नाही तेव्हा बळजबरी उफाळून येते असे तर नसेल? स्त्रीने पुरुषविषयक असे अनुभवसमृद्ध बनण्यात समाजाची भूमिका काय असते? परखड शब्दांत आत्मचरित्र मांडणा-या नंदा-उज्ज्वलांनी काय नोंदवलेय? मिलनाच्या पहिल्या रात्रीनंतर, ‘तुझ्यात अजिबातच जोश नव्हता, मीच पुढाकार घेतला,’ असे पुरुष सांगतो तेव्हा एका परीने ती अनभिज्ञ आहे म्हणून तो सुखावलेलाही. अकलंकिता असण्याची खात्री पटवण्यासाठी त्याच्यासोबत असताना काय होत होतं ते खरंखरं आवेगाने व्यक्त करण्यापेक्षा त्याचा अहंकार सुखावण्यास पूरक अशीच ती वागलेली असते. स्त्रीविषयक जाणीव-जागृतीला केवढा तरी वाव आहे. तिला काय होतं हे त्याने ठरवण्याऐवजी तिला बोलू दिलं नि ते समाजाने मान्य केलं तर संयमाचे नि बचावाचे हात स्त्री-पुरुष दोघांनाही शिकणं-शिकवणं सोपं होईल असं नाही वाटत? स्वत:चं लग्न ठरत असताना सोन्याच्या चार बांगड्या घालणं माझ्या वडिलांना जड जाईल, मलाही काही दागिन्यांचं वेड नाही तेव्हा हा आग्रह नको, असं एखादी सांगते तेव्हा तिची आई तिला आगाऊपणा करू नकोस म्हणून डोळ्यांनी झापते. अंथरूण पाहून पाय पसरणारी म्हणून मुलाची आई मुलीचं कौतुक करते, तेव्हा मला बळ मिळतं. मुलाने किंवा दोन्हीकडच्या वडिलांनी इथे सोयीस्कर मौन पाळून पुढे सासरी पोहोचल्यावर वाद-मतभेदांत मुलीला समजून न घेता त्या प्रसंगाची आठवण देत ‘तशीच आहे ही, आपलंच खरं करणारी,’ असे ताशेरे ओढत राहणं किती योग्य? मावस-चुलत घरांतही दैनंदिन रिवाजात बराच फरक दिसतो तिथे दुस-या घरी भिन्नता स्वाभाविक नाही? ‘इतकंसंही तुला शिकवलं नाही?’ असा उद्धार मुलीला सासरच्यांनी ऐकवायचा. मुलीने मुलाचे तिला पटलेले नसते तेव्हा असे वाग्बाण सोडलेले आपण कल्पनेत तरी आणावेत. त्या वेदनेची जाणीव एक क्रांती घडवेल बघा. जगप्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर, लहानपणी तिच्यावर झालेल्या पुरुषी जुलमाचा परिणाम म्हणून आजही तिला रस्त्यावरच्या एखाद्या पुरुषाला किती वाजलेत इतकेही विचारण्यास धाडस जमवावे लागते, असे सांगते तेव्हा आपल्या कर्माला काय म्हणावे? ती तिच्या वडिलांकडून कला शिकली, तिचे साथीदार काही सारेच स्त्री कलाकार असल्याचे ऐकिवात नाही. मग बातमीला वा आंदोलनाला वजन मिळावे म्हणून ती असे काही म्हणाली का? अन्यथा तिचे बोल खरे असतील तर मग गुरू किंवा साथी पुरुष असताना ती एका मानसिक भयाशी सामना करतच साधना करत आली आहे असे होईल.
कनिष्ठ सहका-या ंचे स्त्रियांशी अनैतिक वर्तन लक्षात आल्यावर वरिष्ठांकरवी प्रकरण न्यायप्रविष्ट करून धसास न लावल्याबद्दल अमेरिकेतल्या एका वृद्ध, व्यासंगी नि विद्यार्थिप्रिय प्राध्यापकावर चाहत्यांकडून स्वत:च्या पुतळ्याची विटंबना पाहण्याचे आले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सहकारीशी साधलेला विवाहबाह्य संबंध मान्य न केल्याने त्यांच्याविरुद्ध टीकेचे मोहोळ उठले. भारतात काय घडते? ब्रह्मचर्याचा पुरस्कार करणा-या कृष्णमूर्तींनी शारीरिक संबंध ठेवून आपल्याला अनेक गर्भपातांना भाग पाडले हे एका वलयांकितेचे विधान वाचून माझ्यासारखीला वाटतं, सामान्य माणसातले धाडस आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणा-या बाबत असूं नये? कृष्णमूर्तींच्या मला भेटलेल्या काही चेल्यांनी ‘मधुराभक्ती म्हणजे काय कळत नाही तर गप्प बैस,’ असा प्रतिवाद केला. ‘यावर ऊहापोह करण्यात अर्थ नसतो, समजून घेणा-या मला तो करावा लागत नाही, न समजणा-या समोर त्याचा उपयोग नाही,’ अशी गुरुवाणी पेश करत सुटका करून घेतली. अशा माझ्या अतिसमंजस देशात मुलींनीच स्वत:ला संभाळावे, सातच्या आत घरात येण्याचे वळण अंगी बाणावे. शाळेत स्कर्ट नाही, सलवार-कुर्ता घालावा. इतर नरांपासून स्वत:स सुरक्षा मिळवण्यासाठी घराबाहेर पडताना गळ्यात काळी पोत अडकवावी. पुरुष पुरुषार्थ दाखवण्यात का कमी पडेल? स्त्रीने स्वत:चा देह सांभाळावा, प्रसंगी स्वत:च्या जबाबदारीवर तांबीसारखी साधने अवलंबून पुढचे अनर्थ (!) टाळावेत. प्राध्यापिका, नर्स असे व्यवसाय लग्नाच्या बाजारात उभे राहण्यास अयोग्य समजून सहसा टाळावेत इत्यादी इत्यादी... अन्यथा, अगदी लताबार्इंसारख्या रत्नाचीही कुठून कुठून शोधलेली दोन कुलंगडी यूट्यूबच्या चव्हाट्यावर येतात नि ‘व्यक्तिमत्त्वाला कलंक’ अशा शीर्षकाखाली त्यांवर अनेकानेक बारीकरावांकडून मुक्ताफळांची खैरात होते. आहात कुठे?