आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर गुंतवणुकीचा सेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युच्युअल फंडावरील माझी ही लेखमाला सध्या सुरू आहे. अनेक गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंडाबद्दल अनेक गैरसमज आहेत. काही जणांचे अनुभव वाईट आहेत आणि त्यामुळे बरेच गुंतवणूकदार म्युचुअल फंडाचे नाव काढले तरी घाबरतात. म्युच्युअल फंडात किंवा मार्केटमध्ये काही वाईट आहे का?
काही समस्या आहेत का? अजिबात नाही, जी काही समस्या आहे ती तुमच्या/ माझ्यात आहे. म्युच्युअल फंडाला नीट समजून घेतले तर यासारखी कुठलीच चांगली गुंतवणूक नाही आणि जर न समजता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर यासारखी वाईट गुंतवणूक कोणती असू शकत नाही.
मागील दोन लेखात आपण लिक्विड फंड आणि म्युच्युअल फंडची ऋऊ म्हणजेच फिक्स मॅच्युरिटी प्लॅन्स FD बद्दल माहिती घेतली. मी आशा करतो की बचत खात्यात पडून असलेला आपला पैसा आपण लिक्विड फंडात आणि ऋऊ ला पर्याय म्हणून FD ला प्राधान्य देण्यास प्रारंभ केला असेल. अजूनही नसेल केला तर नुकसान तुमचेच आहे. FD लाही पर्याय आहेत, जसे बाँड फंड, मीडियम टर्म प्लॅन इ. FMP 1 वर्ष - 3 वर्षं अशा निश्चित अवधीची असते. बाँड फंड किंवा मीडियम टर्म प्लॅनमध्ये 1 ते 3 वर्षांचा पैसा गुंतवायची सोय आहे. व्याज बँकेच्या बरोबरीने किंवा थोडे जास्तच मिळेल, परंतु TDSची कटकट न राहता कॅपिटल गेन टॅक्सची सूट मिळत असल्यामुळे परतावा खूप छान मिळेल.

आता यानंतरच्या ज्या योजना आहेत, त्यामध्ये 25% पासून 100% शेअर्सच्या योजना आहेत. त्यामुळे त्यातील जोखीम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बर्‍याच गुंतवणूकदारांची अपेक्षा अशी असते की व्याजदर तर बँकेपेक्षा चांगला मिळावा परंतु रिस्क काहीच नको. जगात अशी कोणतीही योजना नाही. तुम्हाला व्याजदर / रिटर्न्स चांगले पाहिजेत तर जोखीम घ्यावीच लागेल आणि यासाठीच गुंतवणूक सल्लागार अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीशिवाय पैसे गुंतविले तर श्री सूर्यासारखी योजना आपल्या नशिबी येते. माझ्या कित्येक गुंतवणूकदारांना मी श्री सूर्यापासून वाचविले. काहींनी नाही ऐकले, ते आता पश्चात्ताप करतात. काही लोकांची मजल तर इथपर्यंत गेली की ते मलाच सल्ला द्यायला लागले होते. तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये दम नाही, तुम्हीपण श्री सूर्यामध्ये गुंतवणूक करा. मला हसावे की रडावे समजेना. असो.

जोखीम घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे? पैसा बुडणार का? अजिबात नाही. जोखीम ही फक्त वेळेची घ्यायची असते. शेअर्सवाल्या फंडात 1 वर्षात - 3 वर्षांत चांगला परतावा मिळेल का? अजिबात नाही. तो पैसा तुमचा FD/FMP मध्येच असला पाहिजे. मग 10 वर्षांचा पैसा FDमध्ये असावा का? कधीच नाही. तुमचा 10 वर्षं -20 वर्षं -30 वर्षांचा पैसा हा 100% शेअर्सच्या म्युच्युअल फंडातच असायला पाहिजे. आपण काही योजनांची ओळख करून घेऊया.

1. MIP- मंथली इन्कम प्लॅन - नावाप्रमाणेच मासिक उत्पन्न देणारी या योजनेची गुंतवणूक ही 25% शेअर्स व 75% फिक्स इन्कमच्या प्रकारात होते. त्यामुळे बाँडपेक्षा या योजनेत जोखीम जास्त असते. साधारण 3 ते 5 वर्षांच्या अवधीकरिता योजना चांगली आहे. 25% शेअर्सच्या योजनेत भाग घेऊन आपण जी जोखीम घेणार आहोत त्याचे फळ 5 वर्षांत नक्कीच मिळू शकेल.
2. बॅलन्स फंड - या गुंतवणूक प्रकारात साधारणपणे 50 ते 75 % गुंतवणूक ही शेअर्समध्ये आणि बाकी गुंतवणूक बाँडमध्ये होते. शेअर्सचे प्रमाण वाढल्यामुळे साहजिकच जोखीम वाढेल, परंतु फळही मोठे मिळेल. साधारणपणे 5 ते 10 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगली व आदर्श योजना. परंतु जोखीम समजून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कमी अवधीचा पैसा या योजनेत गुंतवणे घातक ठरू शकेल.
3. इक्विटी योजना - या योजनांमधील जोखीमही सर्वोच्च राहील. कारण 100% गुंतवणूक शेअर्समध्ये होणार आहे व सर्वात चांगले रिटर्न्स पण तुम्हाला याच योजनेत दिसतील. मी माझ्या याआधीच्या लेखामध्ये समस्त भगिनीवर्गाला विनंती केली होती की तुम्ही सर्वच क्षेत्रांत पुढे-पुढे जात आहात. तसेच गुंतवणूक या क्षेत्रात पण जरा आवड निर्माण करा. समोर येईल त्या फॉर्मवर फक्त सहीपुरताच आपला रोल मर्यादित न ठेवता तुम्ही पण या सर्व गोष्टी छान समजून घ्या. कारण महिलावर्गाने या गुंतवणूक प्रकाराला नीट समजून घेतले तर त्यांचे आणि एकूणच संपूर्ण समाजाचे भले होणार आहे. कसे काय? आमच्या या 100% शेअर्सच्या गुंतवणुकीच्या योजनांवर दर 2-4 वर्षांनी मोठा सेल लागत असतो आणि महिला वर्गाला जेवढे सेलचे महत्त्व आहे ते काही आमच्या भाऊबंदांना अजिबात समजत नाही. त्यामुळे भगिनीवर्गाने जर हा सेल छान समजून घेतला तर इतका जास्त लाभ तुमच्या पदरात पडणार आहे की त्याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. आणि हो, इतका खराखुरा, कुठेही जराही बदमाशी नसलेला हा सेल तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही.

sunilchitale 16@yahoo.com