आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालैंगिक संबंध ठेवण्यासाठी किमान वय 16 वर्षे करणारे विधेयक संसदेसमोर आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी हे विधेयक आणण्याची सरकारची भूमिका आहे, तर यामुळे समाजात अनाचार माजेल, अशी भीती मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आजची कव्हर स्टोरी. लेखक मुंबईस्थित सेक्सॉलॉजिस्ट असून ‘निरामय कामजीवन’ हे त्यांचे पुस्तक सुपरिचित आहे.
संस्कारक्षम वयात मुलांच्या लैंगिक प्रेरणांकडे दुर्लक्ष झाल्याने बलात्कारासारख्या घटना घडतात. बलात्कार ही मानसिक विकृती आहे, हे समाजाला पटले पाहिजे. भिन्नलिंगी व्यक्तीवर शारीरिक बळाचा वापर करावासा वाटण्याचा अर्थच त्या मुलावर चांगले संस्कार झालेले नाहीत, असा आहे. संस्कारात एवढे सामर्थ्य असते की घरात आईबहीण असताना मुले त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत नाहीत; पण ते अन्य स्त्रीवर बलात्कार करण्यास धजावतात. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये ग्रहणशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती चांगली असते. याचा करिअरसाठी वापर करण्यास पालकांनी सांगितले पाहिजे. एखादी चांगली नोकरी, योग्य करिअर मिळाल्यास आयुष्यभर लैंगिकतेचा अनुभव घेता येतो. हा अनुभव आपल्या सहचरीशी एकनिष्ठ राहिल्याने द्विगुणित होतो असे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. केवळ सेक्सचे वय 16 करून हा प्रश्न सुटणार नाही. या विषयावर समाजाचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
आजची स्त्री शिकलेली, प्रगत विचारांची, नोकरी-व्यवसाय करणारी असली तरी तिला पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेच्या चौकटी उधळता आलेल्या नाहीत. याची काही साधी दैनंदिन उदाहरणे मी तुम्हाला देतो. आपल्या समाजात पुरुषांसाठी वेश्यालये आहेत, तशी ती स्त्रियांसाठी आहेत का? आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये स्त्री नाचते आहे व पुरुष पैसे उधळताहेत असे चित्रण सर्रास दिसते; पण पुरुष नाचताहेत आणि स्त्री त्याच्यावर पैसे फेकते आहे, असे चित्रण दिसते का? किंवा चित्रपटांमध्ये पुरुष स्त्रीचा मुका घेताना दिसतो आणि स्त्री त्याला नकार देताना दिसते, पण स्त्री मुका घेतेय व पुरुष त्याला नकार देतोय असे प्रसंग असतात का? अर्थात नाही. कारण आपल्या वर्तनाचे ओरिएंटेशन नेहमीच पुरुषी नजरेतून झाले आहे. गेले काही महिने दिल्लीतील बलात्कार प्रकरणामुळे देशभर स्त्री अत्याचाराविरोधात जनमताची लाट उसळली होती. बलात्कार करणा-या ंना अगदी फाशीची शिक्षा दिली जावी इथपर्यंत चर्चा झाली होती. याच विषयाच्या अनुषंगाने मुले आणि मुलींना वयाच्या 16 व्या वर्षानंतर लैंगिक संबंध ठेवण्यास कायद्याने परवानगी दिल्यास बलात्कारासारख्या घटना कमी होतील, असा एक मतप्रवाह आला होता.
न्या. वर्मा समितीच्या शिफारशी स्वीकारण्याअगोदर आपण एका गंभीर विषयावर फार घाईघाईत निष्कर्ष काढत आहोत, असे मला वाटते. त्याचे कारण असे की, न्या. वर्मा यांनी काही मानवी वर्तनाचा, लैंगिकतेचा अभ्यास केलेला नाही. मानवी लैंगिक प्रेरणा हा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून नेहमीच महत्त्वाचा विषय ठरला असल्याने विज्ञान यावर काय म्हणते हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लिंग (सेक्स), लैंगिकता (सेक्शुअॅलिटी) आणि संभोग (इंटरकोर्स) यांच्यातील फरक समजून घेण्याची गरज आहे व हा फरक समजून घेताना तो केवळ पुरुषी नजरेतून-दृष्टिकोनातून नव्हे, तर स्त्रियांच्याही नजरेतून समजून घेतला पाहिजे.
आपला समाज स्त्रीच्या लैंगिकतेबाबत नेहमीच अज्ञानी आणि पूर्वग्रहदूषित असा राहिलेला आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा स्त्रियांची मानसिकता व्यक्त करणारा निबंध लिहिला. त्यांनी स्त्रीजातीवर घेतल्या जाणा-या आक्षेपांचे खंडन करण्यासाठी एक जळजळीत लेख लिहिला. त्यात त्या म्हणतात, ‘बाईचे पाऊल वाकडे पडले तर याला पुरुष जबाबदार असतो. स्त्रियांना कामवासना अधिक असते असे म्हणतात ते खरे नाही. पुरुषांना कनकापेक्षा कांतेचे आकर्षण अधिक असते. स्त्री कितीही निर्लज्ज असली तरी ती होऊन कधी परपुरुषाच्या गळ्यात पडणार नाही. स्त्रियांना सांसारिक सुख म्हणजे काय? एक तर प्रथम मनासारखा नवरा, अत्यंत प्रीती करणारा.’ ताराबाई शिंदे यांच्या या पुस्तकात त्यांची वैचारिक प्रगल्भता दिसून येते. तसेच त्यांना स्त्रीच्या लैंगिकतेचीही जाणीव होती व ती त्यांनी व्यक्त केली होती. त्या काळी आतासारखे विज्ञान प्रगत नव्हते किंवा स्त्री स्वातंत्र्याची लाट नव्हती; पण या पुस्तकात त्यांनी स्त्रीच्या लैंगिक सुखाबाबत पुरुषी समजांना चांगलाच छेद दिला.
वास्तविक निसर्गामध्ये सजीवांच्या दोन प्रेरणा असतात. एक आहाराची आणि दुसरी प्रजोत्पादनाची. आहाराच्या प्रेरणेमुळे सजीवांचे अस्तित्व राहते, तर प्रजोत्पादनाच्या प्रेरणेतून वंशसातत्य राहते. आहार नसेल तर सजीव मरतो; पण सेक्सचे तसे नसते. सेक्स अनुभवला नाही तर सजीव मरत नाही. निसर्गात स्त्रीला अधिकतर प्रजोत्पादनाचे काम दिले आहे, तर पुरुषाला अधिकतर आनंदाचे. पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन या हार्माेनमुळे लैंगिक इच्छा वाढते व शुक्राणू तयार होतात. स्त्रियांमध्ये निसर्गत: कामेच्छा कमी असते.
प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ आल्फ्रेड किन्से यांनी गेल्या शतकाच्या पन्नासच्या दशकात ‘सेक्शुअल बिहेवियर इन द ह्युमन मेल’ व ‘सेक्शुअल बिहेवियर इन द ह्युमन फीमेल’ असे दोन प्रबंध लिहून प्रचंड खळबळ माजवली होती. या प्रबंधात त्यांनी आकडेवारीनुसार सिद्ध करून दाखवले की, ‘पुरुषांची जननेंद्रिये पाहून स्त्री कामोद्दीपित होत नाही. कामविचार नुसता मनात आला तरी पुरुष कामोद्दीपित होतो; पण स्त्रीत तसे घडत नाही. तिला प्रेम व संपूर्ण शारीरिक स्पर्शाची गरज असते. स्त्रीला कामपूर्तीचा अनुभव लाभतो तेव्हा ती वयाच्या विशीत किंवा तिशीत असते (षोडशवर्षा सुंदर दिसत असली तरी ती कामजीवनाबाबतीत अनभिज्ञ असते.) साधारण 18 ते 35 वयोगटातील पुरुषामध्ये दर महिन्याला 12 ते 15 वेळा कामेच्छा निर्माण होते. हेच प्रमाण याच वयोगटातील स्त्रियांमध्ये केवळ दोन ते तीन वेळा असते.’ किन्से यांच्या या खळबळजनक निष्कर्षामुळे त्या वेळी अमेरिकेत प्रचंड गदारोळ माजला. जर्मन वंशाची अमेरिकन शास्त्रज्ञ शेरी हाइट यांनी 1970च्या दशकात ‘सेक्शुअल आॅनेस्टी बाय वुमेन, फॉर वुमेन’, ‘वुमेन अँड लव्ह’ व ‘द हाइट रिपोर्ट’ या प्रबंधांमधून स्त्रियांच्या कामेच्छांवर प्रकाश टाकला. शेरी हाइट यांच्या मते संभोगादरम्यान बहुसंख्य स्त्रियांना कामपूर्ती लाभत नाही. प्रेम व जवळीक याकरिता स्त्रियांना संभोग आवडतो; कामपूर्तीसाठी नव्हे. संभोगातून कामपूर्ती व्हावी हे स्त्रीचे उद्दिष्ट नसते. स्त्रीचे समाधान सर्वांगीण असते, जननेंद्रिय-निगडित नव्हे. शिश्निकेच्या उद्दीपनाद्वारे स्त्रीला हटकून कामपूर्ती प्राप्त होते. कामपूर्ती शारीरिक समाधान देणारी असली तरी मानसिक समाधान लाभत नाही. स्त्रीला पुुरुषाच्या शरीराची ऊब व स्पर्र्श महत्त्वाचा वाटतो.’ ज्यून रेनिश या शास्त्रज्ञानेही आणखी एक खळबळजनक विचार पुढे ठेवला. तिने असे म्हटले, ‘स्त्रीला पुरुषाच्या शिश्नाच्या लांबी-रुंदीचे आकर्षण नसते. त्याच्या शिश्नाच्या लांबीवर तिची कामपूर्ती अवलंबून नसते. तिला भावनिक संबंध, निष्ठा, प्रेम, शृंगार यांचे महत्त्व वाटते. स्त्री कामपूर्तीसाठी कोणतीही वस्तू योनिमार्गात घालीत नाही. संभोगादरम्यान स्त्रीची कामपूर्ती न होणे स्वाभाविक मानले जाते. काही स्त्रियांना संभोगावेळी शिश्निकेचे उद्दीपन केल्यास कामपूर्ती लाभते. काही स्त्रियांना कोणत्याही पद्धतीने कधीच कामपूर्ती लाभत नाही, तरीही त्या समाधानी असतात.’
आपल्याकडे शांताबाई किर्लाेस्कर यांनीही ‘प्राजक्ताची फुले’ या पुस्तकात लैंगिक सुख आणि प्रजोत्पादन यावर लिहिताना लैंगिक सुखाबाबत स्त्रीही पुरुषापेक्षा भिन्न आहे असे म्हटले आहे. त्या म्हणतात, ‘लैंगिक सुख आणि प्रजोत्पादनाची जबाबदारी पुरुष एकाच क्रियेत साधतात. स्त्रीच्या वाट्याला प्रजोत्पादनातील जी जबाबदारी आहे, तिच्याशी लैंगिक सुखाचा संबंध नाही. संभोगक्रियेतील उत्कट सुखाचा अनुभव न घेता स्त्रिया आई व आजीदेखील होतात. विवाहामुळे स्त्रीच्या लैंगिक जीवनाला प्रतिष्ठा मिळते असे म्हणतात, पण माझ्या मते विवाहसंबंधातील अपरिवर्तनीय सक्तीमुळे स्त्रीचे लैंगिक जीवन दडपलेच जाते.’ वर उल्लेख केलेला शास्त्रीय अभ्यास हा स्त्रीच्या दृष्टिकोनातून केल्याने त्याचा फायदा स्त्रीवादी चळवळीला मोठ्या प्रमाणात झाला. पण आपल्याकडे स्त्रीवादी चळवळ फारशी क्रांतिकारक ठरली नाही. कारण स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न माध्यमांनी केले नाहीत. शिवाय पुरुषी मानसिकतेवर, संवेदनांवर आघात होतील, असे स्त्रीवादी साहित्य निर्माण झाले नाही.
अशा परिस्थितीत जे वय करिअर करण्याचे, अभ्यास करण्याचे असते अशा वयात लैंगिक संबंधांना परवानगी देणे हा संपूर्णपणे पुरुषी मानसिकतेचा प्रयत्न आहे. एवढ्या लहान वयात स्त्रियांचे शरीर गर्भारपणासाठी तयार नसताना आपण एक नवी समस्या तयार करत आहोत. कायद्यामध्ये बलात्कार करणा-या ंसाठी फाशीची शिक्षा असली तरी हे गुन्हे थांबणार नाहीत. मूळ प्रश्न आहे संस्काराचा, मुलांना शारीरिक अवयवांविषयी वैज्ञानिकदृष्ट्या वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा. या बाबतीत आपले समाजमन कितपत तयार आहे हे पाहिले पाहिजे. साधारणपणे 12-13 वयोगटातील मुलांना हस्तमैथुनाबाबत माहिती दिल्यास बलात्कारासारख्या घटना टाळता येऊ शकतात.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या आरोग्यमंत्री जोसलिन एल्डर्स यांनी युनोमध्ये भाषण देताना असे म्हटले होते की, ‘मुलांनी हस्तमैथुन केल्यास एड्ससारखे रोग पसरणार नाहीत.’ वास्तविक एल्डर्स यांचे वक्तव्य शास्त्रीय कसोट्यांवर आधारित होते पण या वक्तव्याने अमेरिकेत त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाली. पण आज अनेक लैंगिक विषयावरील तज्ज्ञ बलात्कार रोखण्यासाठी हस्तमैथुनाचा पर्याय सांगतात. पौगंडावस्थेतील मुलांमधील निसर्गरूप कामप्रेरणा दाबण्याऐवजी तिला योग्य वाट करून द्यायची असेल तर हस्तमैथुनाशिवाय अन्य चांगला मार्ग नाही, असे या तज्ज्ञांचे मत आहे.
प्रतिक्रिया-
मुलांच्या आयुष्याशी खेळ- शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सरकारने मुलांना संधी उपलब्ध करून द्यावी. इतर ज्वलंत प्रश्न असताना विकृत मनोवृत्तीच्या मुलांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे इतर मुलांना याचा फटका का?- सोनाली मुळे, सोलापूर
लैंगिक शिक्षण गरजेचे- विधेयक संमत करून वगैरे काहीच होणार नाही. शालेय वयातल्या विद्यार्थ्यांना प्रॉपर लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणजे मग त्यांना अशा गोष्टींचे विनाकारण आकर्षण वाटणार नाही. - रमेश शेळके, औरंगाबाद
निर्णय अयोग्य- विवाहपूर्व संबंधांचे वय घटवल्याने गुन्हे कमी होणार नाहीत. अशा प्रकारचे गुन्हे लहान मुलांपेक्षा 18 वर्षांवरील तरुणांकडून जास्त होतात. सरकारचा हा निर्णय अयोग्य आहे.- अनिता जाधव, सोलापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.