आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhusudan Pataki Artical On Books Festivel In Satara

ग्रंथमहोत्सवच नव्हे, तर प्रतिसाहित्य संमेलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा येथील ग्रंथ महोत्सवाने अक्षर पालखीचे वारकरी होत यंदा पंधरा वर्षे पूर्ण केली. ग्रंथमित्र कै. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे अनुकरण अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रंथ महोत्सवाची साता-यात यशस्वी संकल्पना म्हणून जशी रुजवणूक झाली तशी ती इतरत्र झाली नाही. कोलकाता येथे आंतरराष्टीय पातळीवर पुस्तकांची यात्रा भरते. हजारो प्रकाशक, लेखक आणि वाचक या यात्रेत भक्तिभावाने सहभागी होतात. हीच संकल्पना आपण आपल्या जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरावी यासाठी डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्याला सातारा आणि जिल्ह्यातील ग्रंथवेड्या अनेकांनी साथ दिली.
० सातारकरांचे पुस्तक खरेदीचे, महोत्सवासाठीचे वार्षिक बजेट : सुरुवातीची तीन, चार वर्षे चुकत, प्रयोग करत हा महोत्सव सुरू ठेवण्यात डॉ. चव्हाणांना यश आले. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद आणि ग्रंथ महोत्सव समितीने एकत्र येऊन योजनाबद्ध आराखडा केला. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि वाचक या महोत्सवाला जोडले गेले आणि आज सातारकर पुस्तक खरेदीसाठी वार्षिक बजेट बाजूला काढून ठेवतात.
० जमा निधी त्याच वर्षी खर्च करण्याची परंपरा : सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर 100 पुस्तक विक्रीचे स्टॉल लावले जातात. प्रत्येकी पाच हजार रुपये भाडे आकारले जाते. या स्टॉलशिवाय कार्यक्रमासाठी व्यासपीठ एवढा जामानिमा कार्यक्रमस्थळाचा असतो. मंडपासाठी सुमारे पावणेतीन ते तीन लाख रुपये आणि मानधन, छपाई, जेवण, प्रवास, निवास असा बाकीचा सुमारे दोन ते सव्वादोन लाखांचा खर्च मिळून पाच ते साडेपाच लाख रुपये महोत्सवासाठी जमवले जातात. जमा किंवा पुढच्या वर्षी शिल्लक, देणग्या जमा करणे हा प्रकार केला जात नाही पाच लाख रुपये जमवायचे आणि त्याच वर्षी खर्च करायचे. पैशावरून वाद नको; हा डॉ.चव्हाण यांचा मंत्र त्यांच्या पश्चात ही कसोशीने पाळला जातोय. शिवाय वर्षभरात हा एकच कार्यक्रम केल्याने संयोजकही उत्साहात कार्यक्रम पार पाडतात. हिरिरीने सहभागी होतात. गेल्यावर्षी पाच लाख रुपयांच्या या ग्रंथ महोत्सवात सुमारे चार कोटी रुपयांची पुस्तकांची उलाढाल झाली.
० अ. भा. मराठी साहित्य संमेलनातही होत नाही एवढी पुस्तक विक्री : आश्चर्यचकीत करायला लवणारा हा आकडा अ. भा. मराठी साहित्य संमेलनातही ऐकायला येत नाही. केवळ वाचक नव्हे तर मोठी प्रकाशने या महोत्सवाची वाट त्यासाठी वर्षभर आवर्जून पाहात असतात. महोत्सव भरवण्याचा कालवधी गेली पंधरावर्षे निश्चित केला आहे. सर्वसाधारण जानेवारीच्या पहिल्याच आठवड्याच्या शुक्रवार ते रविवार असे दिवस ठरवले जातात. यंदा सासवड येथे साहित्य संमेलन याच दिवसात असल्याने महोत्सव दुस-या आठवड्यात घेतला गेला. विक्रत्यांची यात सोय होते. संमेलनानंतर लगेच सातारा गाठायची तयारी ही मंडळी करतात हा त्यांचा आजवरचा अनुभव आणि संयोजकांनी त्यांची केलेली सोय आहे.
० ग्रंथखरेदीसाठी पुण्याला जाणे टळते शिवाय सर्व पुस्तके एकाच छताखाली सवलतीत मिळतात : सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा, महविद्यालये, वाचनालये आणि सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला वाचक या ग्रंथमहोत्सवात आवर्जून खरेदी करतो. शाळा आणि वाचनालये यांच्या ग्रंथपालांना कोल्हापूर किंवा पुण्यास जाणे तिथे दिवसभर पळापळी करणे यापेक्षा एका ठिकाणी पाहिजेत ती पुस्तके सवलतीच्या किमतीत आणि प्रत्यक्ष पाहून खरेदी करता येतात. मुख्याध्यापक आणि शिक्षक यासाठी मदतीला येतात. हा आनंद मोठा असतो ही अनेक ग्रंथपालांची प्रतिक्रिया आहे. या महोत्सवाच्या यशाचे दुसरे एक कारण म्हणजे साता-यांत पुस्तकांची उत्तम दुकाने नाहीत. ग्रंथ खरेदी पुण्यात होते. आणि सध्या पुण्यास जाणे अगदी सोपे झाल्याने दुकानांची गुंतवणूक कोणी करत नाही. मात्र या महोत्सवाने पुण्याचे प्रकाशक, विक्रेते साता-यात आणल्याने खरेदीसाठी महोत्सवाचे नवे दालन उघडले आहे.
० प्रकाशक, विक्रेत्यांच्या मते साता-यासारखा प्रतिसाद कुठेही नाही : साता-यात नुकतेच विभागीय साहित्य संमेलन झाले त्याचा अदमासे खर्च 12 लाख रुपये होता. नगरपालिकेची यंत्रणा, मोठे प्रायोजक साहित्य परिषदेचे आर्थिक बळ असे असून, विभागीय साहित्य संमेलनाला नगण्य प्रतिसाद मिळाला. तेथे लाखो रुपये खर्चून जे साध्य झाले नाही ते महोत्सवात पारदर्शकतेमुळे साध्य झाले आहे. इतर ठिकाणी या महोत्सवाचे प्रयोग केले गेले पण ते या प्रमाणात सफल झाले नाहीत. कोल्हापूर येथे ही असाच ग्रंथ महोत्सव होतो. त्याची वाटचाल सुरू आहे मात्र विक्रेत्यांच्या मते साता-यांत जो व्यवसाय होतो, वाचक प्रतिसाद देतो तो इतर कुठे मिळत नाही. कोलकाता ग्रंथ यात्रेच्या धर्तीवर डॉ. शिवाजीराव चव्हाण आणि त्यांच्या सहका-यांनी जो प्रयोग केला तो आज यशाची चढती कमान तयार करत आहे. सातारकरांनी अक्षरांची ही पालखी प्रयत्नपूर्वक, निष्ठेने पंधरावर्षे मिरवली आहे. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या पश्चात प्रख्यात समीक्षक, लेखक शंकर सारडा यांनी या महोत्सवाचे नेतृत्व केले आहे. आजही ते तरुणाच्या उत्साहाने कार्यक्रम ठरवण्यापासून समारोपाचे पाहुणे मार्गस्थ होईपर्यंत मैदानावर हजर असतात. त्यांच्या उत्साहालाही सलाम केला पाहिजे.
तीनदिवसीय महोत्सव नव्हे तर साहित्य व सांस्कृतिक संमेलनच
वसंत बापट यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किंवा तोलामोलाचा साहित्यिक उद्घाटनासाठी येतो. समारोपालाही अनेक ज्येष्ठ कवी, लेखक, शास्त्रज्ञ येथे आले आहेत. नाटककार, चित्रपट निर्माते, पटकथा-संवाद लेखक किंवा सचिनसारखा कलाकार या महोत्सवात आवर्जून आला आहे. मुलांच्यात वाचनाची आवड रुजावी यासाठी डॉ.चव्हाण यांनी तीन दिवस हा महोत्सव सुरू करताना परिसंवाद,कविसंमेलन,कथाकथन त्याच बारोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धा ठेवल्या.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा-लेखक, विचारवंतांशी संवादही
मला आवडलेले पुस्तक यासारखी स्पर्धा ठेवत शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाचनाची केवळ सवय नाही तर, त्यातून आनंद कसा मिळतो हे शिकवले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ग्रंथमहोत्सवाच्या मैदानावर एकत्र येतात. त्यांना कवी. लेखक, विचारवंत पाहायला मिळतात त्यांचे विचार एकायला मिळतात.त्यांच्याशी संवाद साधता येतो हे सगळ अ.भा.मराठी साहित्य संमेलनात होते मात्र, हे चित्र साता-यांत दरवर्षी दिसत असते आणि आज सातारकरांच्या जीवनाचा हा अविभाज्य भाग झाला आहे.