आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madhvi Kulkarni Article About Periods And Mother Role

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अळीचं होतयं फुलपाखरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती शाळेतून येता घरी, लगेच गप्पा फोनवरी
गंमत बघू का कान धरू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
उलट उत्तरे, वाद घालणे, कारण नसता चिडणे, रुसणे
आवर म्हणू का गृहीत धरू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
दोस्त मंडळी अवतीभवती, गंमत खोड्या दंगा करती
सामील होऊ का बंदी घालू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
आधी दिसत नसे फारसा, आता सतत हवा आरसा
दटावू का कौतुक करू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
मैत्रिणींची कुजबुज कानी, असेल काही गुपित मनी
सोडून देऊ का विचारू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
छोटासा पण कोष सुरक्षित, जग नसेल तसे कदाचित
भीती घालू का सक्षम करू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
बाहेर पडता या कोषातून, हुरहूर वाटे फार मनातून
काळजी करू का धीर धरू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
तयार व्हावे तिने मनाने, पेलण्यास नवी आव्हाने
मोकळं सोडू का पकडून धरू, अळीचं होतंय फुलपाखरू।।
जाणत्या होणा-या मुलीच्या आईच्या मनातली ही भावना संवेदनशील असते. आपल्या मुलीला मार्गदर्शन करायला, आयुष्यात योग्य मार्ग दाखवायला, वेळप्रसंगी तिला दटावायला, कधी समजूत घालायला आईला किती भूमिका साकारायला लागतात. मोठ्या होणा-या मुलीच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात त्या प्रश्नांना जर योग्य ती उत्तरे आईने दिली नाहीत तर ती उत्तरे शोधण्याचा दुसरा मार्ग मुली स्वीकारतात. काही वेळा तो धोकादायकही असू शकतो. मुली साधारण १२व्या वर्षी मोठ्या होतात, म्हणजे त्यांची मासिक पाळी सुरू होते. त्यांना त्या आधी जर शरीरात होणारे बदल, मानसिक स्थिती, शरीर रचना याविषयी माहिती दिली तर मुली भांबावून जाणार नाहीत. शरीरात होणारा एक बदल सहजतेने स्वीकारतील. यासाठी आईने घाबरून न जाता समंजसपणे या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. लहान मूल जसे पालथे पडते, रांगू लागते, चालू लागते तितक्याच सहजतेने मुलींच्या शरीरात होणारा हा बदल असल्याची जाणीव करून दिल्यास त्याचा बाऊ होणार नाही. या वयात मुलीच्या मनात अपराधीपणाची, न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ नये यासाठी तिला विश्वासात घ्यावे, सुरक्षित असल्याची जाणीव करून द्यावी. इतर व्यक्तींसमोर तिच्यावर टीका न करता तिचा आत्मविश्वास वाढवता येईल असे बोलणे ठेवावे, असे बालमानसशास्त्रज्ञ डॉ. राजश्री मेरू सांगतात.
या वयात मुलांचे वाटणारे आकर्षण हे साहजिक असते. परंतु मुलांशी बोलू नको, त्यांच्यात खेळू नको अशी बंधने त्यांच्यावर न घालता त्यांना लैंगिक शिक्षण दिले पाहजे. त्यामुळे वाटणारे आकर्षण हे शरीरातील बदलानुसार असून त्यामुळे होणारे धोकेही मुलींना समजावून सांगा. मुलांशी बोलताना योग्य अंतर ठेवून वागावे, त्या भावनांना आता तरी जास्त महत्त्व न देणे योग्य असून तिच्यासमोर आयुष्यात असलेल्या ध्येयाची जाणीव करून द्यावी. त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागणार आहेत, शिक्षणासाठी किती परिश्रम घ्यावे लागणार आहेत, हे आईने समजावून सांगावे.
या वयात मुली एक तर जास्त चिडचिड्या होतात अथवा जास्त गप्प होतात. आपल्याच कोषात जातात. काहींचे आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही. आपले म्हणणे सर्वांनी ऐकावे असे तिला वाटते. कोणी काही सांगितलेले तिला आवडत नाही, पटत नाही. यासाठी तिच्यावर रागराग न करता तिला सुरक्षिततेची जाणीव करून द्या. मुलींना कोणत्याही गाेष्टीला नाही म्हणण्यापेक्षा योग्य वाटतील असे दोनतीन पर्याय तिला द्या. मुलींना व्यायाम करायला लावा, त्यांच्या कलागुणांना वाव द्या. इतर छंद जोपासायला शिकवा. त्यांच्यातील ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्यास शिकवा. स्वत:ला सिद्ध करण्याची त्यांची धडपड असते. त्यासाठी मदत करा. सकाळी उठल्यावर एखादा श्लोक म्हणायला लावा, मोठ्या व्यक्तींची, यशस्वी महिलांची वाक्ये, श्लोक, संतवचने यांचे स्टिकर्स बनवून तिच्या खोलीत लावा. म्हणजे तिला ते जातायेता वाचता येतील. जास्त बंबार्डिंग न करता तिच्यावर कळत नकळत संस्कार होतील यासाठी आईने, आजीने प्रयत्न करावेत. घरात थोडेफार धार्मिक वातावरण असेल तर चिडचिडेपणा कमी होऊन मन शांत ठेवण्यास मदत होते. योग, प्राणायाम, व्यायाम यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.
आईवडील हे मुलांचे रोल माॅडेल असतात. त्यामुळे आईवडील एकमेकांशी कसे वागतात याचा परिणामही मुलांवर होत असतो. आईवडिलांचे न ऐकणे, आपलेच म्हणणे खरे करणे यामुळे या वयात मुलींची घरात जास्त भांडणे होतात. याचा परिणाम मुलींच्या जेवणावर होतो. चिडचिड वाढते. काही वेळा घर सोडून जाणे, आत्महत्या करणे असे पर्यायही मुली स्वीकारतात. यामुळे आईने मुलींशी मैत्रिणीचे नाते ठेवले तर वाद टोकाला जात नाहीत. घरात एकमेकांशी होणारा संवाद ताण कमी करतो. मुलामुलींशी आईवडिलांनी बोलणे, संवाद साधणे गरजेचे आहे. मुलांनी बाहेर घडलेली कोणतीही गोष्ट आईवडिलांकडे सांगावी एवढे आईवडिलांनी नाते खेळीमेळीचे ठेवले पाहिजे. घरात मिळणारे प्रेम मुलामुलींना बाहेरच्या आकर्षणांपासून दूर ठेवू शकते.
m.kulkarni@dbcorp.in