आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टहासी 'सुपरवुमन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी नोकरी करत असले तरी घराकडे दुर्लक्ष करत नाही. घरातली सर्व कामेसुद्धा मीच करते. मुलांवर संस्कार करणे माझे कर्तव्य आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना सकाळ, संध्याकाळ गरमगरम, पौष्टिक खायला देणे, त्यांची सेवा, शुश्रूषा माझी जबाबदारी आहे. घरची सर्व जबाबदारी असतानाही मी माझ्या आॅफिसमध्ये प्रामाणिक व कामसू कर्मचारी आहे. आॅफिसमधील सर्व सहकारी मला नावाजतात. मी एक दिवस गावाला गेले तर सर्व घराची व्यवस्था डळमळीत होते.

हे वर्णन आहे नोकरदार स्त्रियांमध्ये वाढीला लागलेल्या सुपर वुमन सिंड्रोमचे. मी जे करीन तेच योग्य, मलाच सगळे नीट जमते, माझ्यावाचून सगळ्यांचे अडले पाहिजे या अट्टहासी वृत्तीची ही लक्षणे.
आपल्या कामांमध्ये मुले, पती, कुटुंबातल्या इतर सदस्यांना थोडे सहभागी करून घेतले तर काय बिघडले? पतीला बाहेरून येताना काही काम सांगितले तर काय होते? मी एक आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श गृहिणी, आदर्श कर्मचारी, आदर्श मुलगी, आदर्श बहीण आहे हे सिद्ध करण्याचा एवढा खटाटोप कशासाठी? घर, आॅफिस, मुले, बाजारहाट हे सर्व करताना स्वत:साठी किती वेळ असतो?
मीच सर्व कामे करणार हा अट्टहास सोडला तर काम करताना येणारा ताण नक्कीच कमी होईल. घरातले वातावरणही खेळीमेळीचे राहील.
एका वेळी दहा गोष्टी ‘मॅनेज’ करण्यासाठी या सुपरविमेनची धडपड सुरू असते. मग एखादे काम जमले नाही, ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही किंवा हातातून निसटले, तर मनाला हुरहूर लागून या ‘सुपरवुमन’ काही अंशी मानसिक ताणाला बळी पडतात. त्यातून चिडचिड आणि हे काम जमले नाही या निराशेपोटी स्वतःला दोष दिला जातो. कालांतराने हीच मानसिक अवस्था ‘सिंड्रोम’चे रूप घेते.
ठरवल्याप्रमाणे गोष्टी ‘मॅनेज’ झाल्या नाहीत, तर मन बैचेन होऊ लागते. सतत ध्येय गाठण्याचे मनात विचार असतात. त्यामुळे फरपट होते. एखादे काम मी करू शकत नाही ही भावना मान्य करणे, स्वीकारणे त्यांना अवघड जातं. कोणी आपल्याला नावे ठेवू नये यासाठी सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची एकटीचीच शर्यत जिंकण्यासाठी तिची धडपड चाललेली असते. जबाबदाऱ्या वाढत जातात, तसे हा सुपरवुमन सिंड्रोम मनाचा अधिकाधिक ताबा घेतो.
अवंतीचंच उदाहरण घ्या. ती आयटी कंपनीत कामाला. घरी सुबत्ता. नवरा परदेशात असल्याने एका मुलीची जबाबदारी पूर्णतः तिच्यावरच. तिने घरात कोणत्याही कामाला मदतनीस लावली नव्हती. का, तर दोघींसाठी म्हणून गरज नाही. आणि मी सगळी कामे हातावेगळी करू शकते हा कमालीचा आत्मविश्वास. त्यामुळे रोज सकाळपासूनच तिची धावपळ. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना पुरती दमछाक व्हायची. हे कमी म्हणून की काय, आपण केवळ नोकरी आणि घरापुरतेच मर्यादित राहू नये म्हणून तिनं वीकेंडला स्वतःसाठी छंदवर्गही लावला होता. यातले एक जरी तिच्या हातातून निसटले, तर ती स्वतःला दोष द्यायची!

मधुराचीही तीच गोष्ट. फक्त ती नोकरी करत नाही, घर सांभाळते. कोणत्याच कामासाठी मदतनीस नाही. स्वतःकडे लक्ष न देता सतत घरातल्या सदस्यांच्या गरजा भागवायला ती हजर! रोज रात्री तिची उद्याची टू डू लिस्ट तयार असते! कोणत्याही मैत्रिणीकडे जाणे-येणे नाही. बाहेर गेलं तरी घरचेच विचार. एखादे काम नाही झाली की ती स्वतःच्याच नजरेत उतरायची. सतत ताणात राहायची. गेल्या कित्येक वर्षांत तिला आम्ही हसती-खेळती पाहिलेलीच नाही.
लहानपणापासून आई, आजी मुलींना सांगत असतात, ‘अगं, पटपट करा कामं. मुलींचं लक्ष कसं चौफेर असलं पाहिजे.’ त्यामुळे एका वेळी अनेक कामे करण्याची सवय खरे तर लहानपणापासूनच लागते. हातात वेळ कमी असतो म्हणून एका वेळी अनेक गोष्टी केल्या जात नाहीत, तर एका वेळी एकच गोष्ट करण्यासाठी मन तयार होत नाही. असे मल्टिटास्किंग सातत्याने यशस्वी होत असेल, तर ही सवय लागते आणि ही सवय मोठेपणीही सुटत नाही. एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या ध्यासापाेटी मनावर ताण वाढत जातो. एखादी गोष्ट झाली नाही की, चिडचिड वाढते.

समान लिंगभाव अथवा gender sensitivity या विषयावर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांनी पुण्यात नुकतीच एक कार्यशाळा घेतली. त्यामध्ये त्यांनी महिलांना सुपरवुमन सिंड्रोम असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. ते म्हणतात, ‘परंपरागत काम करण्यासाठी महिलांची धडपड दिसून येते आहे. ठरवलेलं काम पूर्ण झालं नाही, तर त्यांना अपराधीही वाटतं. पितृसत्ताक पद्धतीचा पगडा इतका मनावर बिंबलेला असतो की घरातल्या पुरुषांना काम सांगणे म्हणजे त्यांना अनादर केल्याची भावना त्यांच्या मनात येते. अनेक महिला नोकरीतून रजा घेऊन उन्हाळ्यात पापड, लोणची करण्याचा घाट घालतात. तसंच, दिवाळी फराळाचे पदार्थही त्यांना घरीच करायचे असतात. यात भर म्हणून घरातल्या पुरुषांच्या मानसिकतेचीही भर पडते. त्यांना एकीकडे सुगरण बायको आणि दुसरीकडे नोकरी करून अद्ययावत जीवनशैली जगणारी आधुनिक बायकोही हवी असते. हे कुठंतरी बदलायला हवं.’

यासाठी महिलांनीच आपल्यात बदल घडवून आणले तर हे चित्र कालांतराने बदलण्यास मदत होईल. नोकरी करताना घराकडे जास्त लक्ष न दिल्याची अपराधीपणाची भावना तिच्या मनात येणार नाही. साहजिकच तिला आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याचा निखळ आनंद उपभोगता येईल. तुमच्यात नाहीत ना ही सुपरवुमनची लक्षणं?
बातम्या आणखी आहेत...