आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भान स्वातंत्र्याचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छ भारत घडवूया
— सना नदीम सय्यद? नाशिक
आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. झेंडे घेऊन मिरवतोसुद्धा. पण त्यानंतर वर्षभर आपण स्वातंत्र्याचा विचार करतो का? आपण नेहमी म्हणतो आपले शासन काही कामाचे नाही, आपले कायदे फार जुनाट झाले आहेत, महानगरपालिका कामे व्यवस्थित करत नाही. शासनाने देशाचा सत्यानाश केला आहे, असं नेहमी बोलतो. पण हे होऊ नये म्हणून आपण स्वत: काय करतो? श्रीमंत माणसाच्या कुत्र्याने रस्त्यावर घाण केली तरी ते महानगरपालिकेला दोष देतात की, तुम्ही रस्ते व फुटपाथ स्वच्छ ठेवत नाही. अमेरिकेत व जपानमध्ये कुत्र्याच्या मालकाला घाण साफ करावी लागते, असे नियम भारतात कधी लागू होतील. आपला हातभार शून्य असताना देशात सुधारणा कशा घडतील? म्हणूनच या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपण देशसेवा काय करणार आहोत हे स्वत:ला विचारा आिण चांगला भारत घडवण्यासाठी लागा कामाला!
ही तर केवळ

औपचारिकता
— भारती गुळवे? नाशिक
स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवला जातो, अमर ज्योतीपाशी राज्यकर्ते नतमस्तक होतात, स्वातंत्र्यसेनानींच्या फोटोला हार घातला जातो व स्वातंत्र्य दिन यंत्रवत साजरा केला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झालीत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची प्रखर राष्ट्रभक्ती, आशीर्वाद, ध्येयवाद, त्याग, नैतिकता आजच्या राज्यकर्त्यंामध्ये दिसते का? भारतात लोकशाही आहे. राज्यकर्त्यांना निवडून देणारी जनता आहे तरी जनतेत वावरताना त्यांना सुरक्षा लागते. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान बुलेटप्रूफ सुरक्षेतून देशाला संबोधतात. हे स्वातंत्र्य मिळाल्याचे लक्षण मानायचे का? देशांत सर्वत्र बोकाळलेला भष्टाचार, जनतेच्या पैशाची लूट, स्वार्थी संधिसाधू राज्यकर्ते, महिलांची असुरक्षितता, मरणपंथाला लागलेला बळीराजा, दहशतवाद, कुपोषण इ. कशाचे द्योतक आहेत? यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. केवळ खादीचे कपडे व तिरंगी कपडे घालून स्वातंत्र्यदिन साजरा करणे ही आैपचारिकता आहे. त्याएेवजी देशभक्ती, सर्वधर्मसमभाव, त्याग, पारदर्शकता, चारित्र्यसंपन्नता, नैतिकता या गुणांचा अंगीकार करून देशाला समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होणे नितांत गरजेचे आहे.
सर्वांच्या स्वातंत्र्याचा विचार व्हावा
— अरुणा पवार? अहमदनगर
आपल्या मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्यास मुक्तता असणे, फक्त ती गोष्ट माणुसकीच्या दृष्टीने, संविधानाच्या दृष्टीने चुकीची असायला नको, यालाच स्वातंत्र्य म्हणतात. समाजात अशा व्यक्ती आहेत त्यांचा दबदबा, भीती समाजाला आहे. आिण जिथे भीती आहे तेथे कसले स्वातंत्र्य? स्वातंत्र्यदिन तिरंगी कपडे घालून साजरा करुनये कारण आपण ते कपडे घालतो, ते कपडे चुरगळतात.

शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं...
— मीना फटिंग? यवतमाळ.
स्वातंत्र्य म्हणजे सर्व नागरिकांना आनंदी जीवन जगता आले पाहिजे. सर्वांनाच पोटभर अन्न, उत्तम शिक्षण, चांगले आरोग्य आणि निवारा मिळायला पाहिजे. यातील काय मिळालं सामान्य जनतेला? पोटभर अन्न, उत्तम शिक्षण, की चांगले आरोग्य? मग देशाला स्वातंत्र्य मिळाले कशावरून‌? अजूनही देशातील अनेक मुलांना चांगले शिक्षण घेता येत नाही, शिक्षणाचे खासगीकरण झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे पालकावर ओझे झाले. प्रीप्रायमरी शाळेत प्रवेश घेण्याकरिता पालकांना हजारोंनी रुपये मोजावे लागतात. उच्च शिक्षणाचा गोंधळ तर विचारूच नका! लक्षाधीश पालकच मुलांना उच्च शिक्षण देऊ शकते. नोकरदार वर्ग पैसा गोळा करून थोडेफार शिक्षण देऊ शकतो, परंतु मजूर, शेतकरी यांचे काय? जेव्हा शिक्षणाचे खाजगीकरण थांबवून सरकारीकरण होईल प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळेल त्याच दिवशी आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्याचा आनंद होईल.
सुजाण नागरिक व्हावे
— स्नेहा शिंपी? नाशिक
१५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिन साजरा करताना, भारतासारख्या विकासाकडे वाटचाल करणाऱ्या देशाचे सच्चे नागरिक म्हणून अभिमानाने न मिरवता देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडले पाहिजे. उदा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना, चोरीची वीज वापरताना, बेफाम वाहन चालवताना, आपण विचार केला पाहिजे. आता ६८ वर्षे पूर्ण होतील स्वातंत्र्य मिळून तरी महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न येतोच. नुसते झेंडावंदन करून त्यावर मोठमोठी भाषणे नकोत.
तेव्हाच देश स्वतंत्र होईल...
— प्रिया निकुम? नाशिक.
फक्त इंग्रजांच्या जाचातून, छळातून आपल्या वीर क्रांतिकारकांनी आपल्याला मुक्त केले म्हणून ते स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. आणि म्हणूनच आपण हा दिवस साजरा करतो. पण, अजूनही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, आपल्याला ते नीट मिळालं आहे का खरंच? जरी आपण विविध तंत्रज्ञानात प्रगती केलेली असली तरीसुध्दा स्त्रियांच्या बाबतीत साक्षरतेच्या बाबतीत अजूनही मागेच आहोत. शिक्षणाची सोयही अनेक खेड्यांपर्यंत अजून पोहोचलेली नाही. म्हणूनच नुसता तिरंगा हातात धरून, एक फॅशन म्हणून त्याच्यासारखे कपडे घालून काही होत नाही. ज्या दिवशी स्त्रिया सुरक्षित होतील आणि शिक्षण सर्वाथाने सगळ्या लोकांपर्यत पोहोचेल तेव्हाच देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला म्हणता येईल.
नागरिकत्वाची जाणीव प्रत्येकाला असावी
— संगीता चौधरी ? हिंगोली
आज भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. पण सध्याची परिस्थिती पाहून मनात प्रश्न येतो की आपण खरंच परकियांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत का? देशातली संपूर्ण बाजारपेठ परकीय ब्रँडच्या वस्तूंनी व्यापली आहे. देशातील तरुणाईलाही अशाच वस्तूंचे, कपड्यांचे आकर्षण आहे. शिवाय अनेक उपवरांनाही एनआरआय स्थळाचं आकर्षण असतं. आपल्या भौतिक सुखाच्या मोहापायी आपण आजही गुलामगिरीत असल्याप्रमाणे जगतो आहोत. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. नुसते तिरंगी कपडे घालून, गाल आणि कपाळाला टॅटू लावून स्वतंत्रता दिवस साजरा करणं म्हणजे देशभक्ती नव्हे. आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची धडपड, तळमळ, तरुण पिढीला वाटायला हवी. देशाला सुजलाम, सुफलाम करण्याचे कर्तव्य एकट्या सरकारचे नाही. तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि याची प्रत्येक नागरिकाला जाणीव असायला हवी.
या विषयावर दत्तात्रय उमाळे (अकोला), वसंत बिवरे (बीड), गौरव श्रीखंडे (भुसावळ) यांच्याही प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.
आजचा विषय—
पूर्वी, म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यात निखळ मैत्री स्वीकारली जायची नाही. मग तो मुलगा जबरदस्तीने तिचा मानलेला भाऊ व्हायचा. रक्षाबंधन जवळ येतंय, त्या निमित्ताने विचारावंसं वाटतं की, अजूनही असा जुलमाचा रामराम करावा लागतो का? की आता काळ बदललाय? तुमचं होतं का असं मानलेलं नातं? शब्दमर्यादा : १५०. आठ दिवसांच्या आत प्रतिक्रिया पाठवा.

आमचा पत्ता—
मधुरिमा, दैनिक दिव्य मराठी, १५२९५, मोतीवाला
काॅम्प्लेक्स, जालना रोड, औरंगाबाद - ४३१००३
ईमेल: madhurimadm@gmail.com
फॅक्स क्रमांक - ०२४०-२४५३५०३