आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका शिल्प-चित्रकाराची दुनिया ‘मग’ची...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मग’चा वापर तुम्ही चहा, कॉफी पिण्यासाठी करीत असाल; पण काही मग ‘बोधामृत’ही पाजू शकतात! एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण मग जपू शकतो तसंच हसवूही शकतो! याचा अनुभव घ्यायचा असेल तर अहमदनगर येथील प्रमोद कांबळे यांच्या घरी जावं लागेल. प्रमोद हे शिल्पकार आणि चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर ते उत्तम संग्राहकही आहेत. जगावेगळा सहाशेहून अधिक मगांचा संग्रह त्यांनी केला आहे. घोटभर चहापासून लिटरभर कॉफी मावेल असा ‘थिंक बिग’ सांगणारा मग त्यांच्याकडे आहे. वाघ, सिंह, हरिण व माशाचा आकार असलेले मग आहेत. आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व. पु. काळे हे लेखक आणि आइनस्टाइनसारख्या शास्त्रज्ञांच्या प्रतिमा तसंच समर्थ रामदासांचे श्लोक असलेले मगही त्यांच्याकडे आहेत.
प्रमोद यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाची सुरुवात झाली काही वर्षांपूर्वी मुंबईत भरलेल्या पिकासोच्या प्रदर्शनापासून. पिकासोची चित्रं असलेले दोन मग प्रमोद यांनी तिथून आणले. नंतर एक-एका मगची भर पडू लागली. कुठेही गेलं की, त्यांची नजर मगकडे जाऊ लागली. काही वैशिष्ट्यपूर्ण मग मॉल्समध्ये, तर काही जुन्या बाजारात मिळाले. या छंदाविषयी मित्रांना समजल्यावर तेही वेगळा मग दिसला की, प्रमोदला आणून देऊ लागले. दुबई, आफ्रिका आणि युरोपातूनही काही मग आले. कॅलिग्राफीसाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार अच्युत पालव यांनी त्यांचं क्रिएशन असलेले मग पाठवले. प्रमोद शिल्प घडवत आहे, असं चित्र असलेला खास तयार करून घेतलेला जादुई मग जामखेडच्या पोपटलाल हळपावत यांनी दिला. या मगमध्ये गरम पेय भरलं की, त्यावर चित्र प्रकट होतं. पेय संपलं की चित्र अदृश्य! ‘हाफ चिनी’, ‘दो चिनी’, ‘नो चिनी’ अशी गमतीशीर चित्रमालिका असलेले तीन मग आहेत. ‘हाफ चिनी’ म्हणजे अर्धा चमचा साखर, ‘नो चिनी’ म्हणजे बिनसाखरेचा चहा! सिरॅमिक्स, काच, स्टील, कागद, क्रिस्टलप्रमाणेच काही मग टेराकोटा म्हणजे भाजलेल्या मातीचे, तर काही चक्क बांबूपासून बनवलेले आहेत. एक मग दगडात (कोलस्टोन) तयार केलेला आहे. मगच्या आकारांबरोबर त्यांचे कानही वेगवेगळे आहेत. हत्तीचे चित्र असलेल्या मगचा कान सोंडेसारखा आहे. लहान मुलांना आवडतील अशा चेंडू, आकड्यांचा ठोकळा या आकारांबरोबरच प्रेमिकांना आवडेल असा बदामचा आकार असलेली मगची जोडी प्रमोद यांच्या संग्रहात आहे. त्यांच्या शिल्प-चित्र स्टुडिओला भेट देणाºया मान्यवर पाहुण्यांच्या स्वाक्षºया घेतलेले अनेक मग या संग्रहाची शोभा वाढवत आहेत. देशी-विदेशी पर्यटकांना हा जगावेगळा संग्रह पाहता यावा यासाठी लवकरच ‘मग’च्याच आकाराचं संग्रहालय प्रमोद तयार करणार आहे.