आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलबाग बनविणारा जादूचा मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोक हो! तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे
तुम्ही तरी मला न्याय द्याल का?
स्वत:च्याच घरात निर्वासित असलेली मी
उपेक्षेची जन्मठेप भोगतेय जन्मोजन्मी
माझा पिता, भाऊ, पती
या गोंडस, भारदस्त नात्यांच्या भाराखाली
माझं अस्तित्व दबलं जातंय
दाबलं जातंय पावलापावलांवर
माझं स्वातंत्र्य, हक्क, मत
सारं सारं कसं परतंत्र झालंय
माझ्याच घरात, समाजात नि देशात
कुणीच नसलेली मी कोण?
याचं उत्तर तुम्ही द्याल ना?
समाजवर्तनाने व्यथित मनाची फिर्याद मांडणारी ही अतिशय गाजलेली कविता आहे हिरा बनसोडे यांची. म्युनिसिपल कामगाराच्या घरात जन्मलेल्या या मुलीला जन्मताच ‘अस्पृश्य’ या शब्दाची पदवी मिळाली. पुढे आयुष्यभर हा शब्द त्यांना छळत राहिला, बोचकारून रक्तबंबाळ करीत राहिला. समज आल्यावर त्या शब्दाचे अन्वयार्थ कळले आणि त्याचे व्रण काळजावर (कायमचे) उमटले. त्याची ठसठसती वेदना इतक्या-तितक्याने अधूनमधून सलत आहे; अगदी आजही. मोलमजुरी करून परिस्थितीनुसार आईवडिलांनी लाड केले. पण वंशाला दिवा नाही म्हणून वडलांनी दुसरे लग्न केले. आयुष्य अजूनच दु:खीकष्टी आणि केविलवाणे झाले. नववीतच हिराबाईंचे लग्न झाले आणि वडिलांनी अर्धवट सोडलेले मुलीच्या शिक्षणाचे काम सास-यांनी पूर्ण केले. मोठ्या प्रेमाने त्यांनी सुनेच्या वैचारिक जडणघडणीसाठी मदत केली. आपली सून शिकावी, मोठी विदुषी व्हावी, तिनं खूप लिहावं, म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यामुळेच हिराताईंच्या आयुष्यात सास-यांचे स्थान फार आदरणीय आहे. त्यांची कृतज्ञता म्हणून ‘फिर्याद’ कवितासंग्रह त्यांच्या पश्चात त्यांना अर्पण करताना त्या लिहितात, ‘अवघड वाटेवरील काटेकुटे वेचून ज्यांनी माझ्या प्रगतीचा मार्ग सुलभ केला त्या माझ्या मामंजींना... माझ्या कवितेची विनम्र फुले.’
हिराताईंचे ‘पौर्णिमा’, ‘फिर्याद’, ‘फिनिक्स’ हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. ‘पौर्णिमा’मधील कविता म्हणजे तारुण्यसुलभ हळव्या भावभावनांचा कल्लोळ. कधी प्रेमाची नजाकत, विरहाची अवीट हुरहूर, तर कधी जीव गुदमरून टाकणा-या प्राणांतिक वेदना. भावविभोर अशा या उत्कट भावना मृगजळाचा भाववेल्हाळपणा घेऊन त्यात वाचायला मिळतात; पण केवळ सौंदर्यनिर्मिती आणि रंजकत्व निर्माण करणे हे साहित्याचे उद्दिष्ट नसते; तर समाजाच्या वास्तवाचे भान ठेवून मानवी मनाचे, वृत्ती-प्रवृत्तीचे, न्याय-अन्यायाचे विविधांगी दर्शन घडवणे ही साहित्यनिर्मितीची भूमिका असते. रूढ चौकटीत राहून हे करता येत नाही. तेव्हा त्याची मोडतोड होते, दृढ ठोकताळे बाजूला सरकवावे लागतात. तेव्हाच कुठे ख-या अर्थाने स्वतंत्र शैली निर्माण होते. पुढे समज-उमज वाढल्यावर प्रगल्भ जाणिवांची परिपक्व कविता हिराताईंनी लिहिली आणि त्यांची स्वतंत्र शैली त्यांना निर्माण करता आली.
स्त्रियांच्या दु:खाची जातकुळी वरवर पाहता एकच आहे, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. दलित वस्तीवरील स्त्रियांचे व त्यासम भटके आयुष्य जगणा-या समाजातील स्त्रियांचे अवघे जगणे संघर्षमय आणि हालअपेष्टांनी भरलेले आहे; वेदनेची परिसीमा काय असते, याची प्रचिती देणारे. अज्ञान, दारिद्र्य, दैन्य, लाचारी, व्यसनाधीनता, सतत आरोपीच्या पिंज-यात उभ्या करणा-या शंकेखोर नजरा आणि हे सगळं झेलताना मेटाकुटीला आलेली, थकून गेलेली स्त्री. हे चित्र स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातही कुठल्याही वस्तीवरचं होतं. याचा जीवघेणा अनुभव घेतल्यामुळे त्याविषयी कवयित्री म्हणते,
या देशाच्या महान संस्कृती
तुला कोपरापासून नमस्कार
अनाथपणाच्या आर्त दु:खात
कधी झाली नाहीस तू आमची मायमावली
ग्रीष्माच्या उन्हात पोळताना
कर्ण स्वरूपात तू आमचे मातृत्वच नाकारीत आलीस
‘स्व’ अस्तित्वाच्या जाणिवा शिक्षित वर्गात रुजू लागल्यावर स्वातंत्र्याचा, समतेचा विचार आग्रहाने येऊ लागला त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी कविता हिरा बनसोडे यांनी लिहिली. त्याच काळात ऊर्मिला पवार, दया पवार, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, नारायण सुर्वे अशी मातब्बर मंडळी एक भूमिका घेऊन लेखन करीत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर चळवळ विभागली गेली. सर्व समाजबांधवांना घेऊन चालण्यासाठी कुठलाच नेता समर्थ ठरत नसल्याने, ज्याने-त्याने चळवळ वाटून घेतली आणि कुठल्याही चळवळीचा शेवट होतो त्याच भरकटलेल्या स्थितीत आज दलित चळवळसुद्धा येऊन पोहोचली आहे. याच त्राग्यातून आपल्या बांधवांना संबोधित करताना त्या लिहितात-
मित्रांनो, अंगणात शालवृक्ष लावल्याने
सिद्धार्थ जन्म घेत नसतो
त्यासाठी पेरावी लागतात
शांतीची मंगल बीजे
अरे, त्या महात्म्यांनी अन्यायाशी झगडून
नि:स्वार्थतेने लावलेली ही समतेची पवित्र झाडं
कुणी त्याचे एकेक सुवर्णपान
झोळीत दडवून नेल्याने
फुले-आंबेडकर आणि तथागत
होता येत नाही.
गेली 40-45 वर्षे त्या तटस्थपणे, तर कधी सहभागी होऊन चळवळीचं काम पाहत आहेत. कविता लिहीत आहेत. ‘जिथे-जिथे सांडलेत तुझ्या रक्ताचे थेंब तिथल्या मंगल भूमीत मी लावीन एकेक कविता,’ असं म्हणत साहित्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा विचार संवेदनशील मनांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करत आहे. मृदू स्वभावाच्या, गोड गळ्याच्या प्रेमळ हिराताई सर्वांसाठी मनात प्रेमळ भावना घेऊन सर्वांच्या भल्यासाठी अंत:करणातून प्रार्थना करतात. ‘सगळ्यांनाच दु:ख होतं, आहे नि राहणार. त्याला घाबरून कुणी जगणं थोडंच सोडून देतं? याचा बोध घेऊन स्त्रियांनीही त्याला न घाबरता सामोरं जाऊन ते पचवायला शिकलं पाहिजे. नव्या जाणिवा घेऊन समृद्ध जीवनासाठी सज्ज व्हायला हवं,’ असा आशावाद व्यक्त करताना समाजाकडून काही अपेक्षा व्यक्त करत आहेत. या मातीच्या निष्प्राण मूर्तीतून
चैतन्याने सळसळणारा
जिवंत माणसाचा जन्म मला हवा आहे.
माझ्या पुनरुज्जीवनासाठी बंधूंनो,
मला शब्द हवा आहे
पण शब्द देताना सौदा करू नका
उजाड वाळवंट झालेल्या या पराधीन जन्माला
फुलबाग बनविणारा जादूचा मंत्र तुम्ही तरी द्याल का?
नवा मंत्र घेऊन आयुष्याची फुलबाग बहरण्यासाठी समाजाच्या अंधारून आलेल्या हृदयात आशेची दिवेलागण करूया!